पटोले साहेब, एका हिरोचे शूटिंग बंद पाडण्याच्या नादात तुम्ही किती जणांच्या पोटावर पाय आणता

काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज अभिनेते अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्यावर टीका केली. मनमोहन सिंह सरकारच्या हे दोन्ही अभिनेते टि्वटरच्या माध्यमातून टिव टिव करायचे. सरकारवर ट्विटच्या माध्यमातून टीका करायचे. शेतकऱ्यांच्या बाजूने बोलत होते. मात्र आता त्यांना देखील विसर पडला आहे.

त्यामुळे या दोघांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊन देणार नाही, तसेच त्यांच्या सिनेमांचे प्रदर्शन देखील राज्यात होऊ देणार नाही. असा इशारा दिला.

मात्र पटोले साहेब या अभिनेत्यांचे किंवा एखाद्या दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्याचे चित्रपट शूटिंग बंद पडण्याच्या नादात, त्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याच्या नादात तुम्ही केवळ त्यांचचं नुकसान करत नाही. तर त्याचवेळी किती जणांच्या पोटावर पाय आणताय ते एकदा वाचाच.

चित्रपट निर्मिती हे कोणत्याही गावासाठी, शहरासाठी किंवा त्या जिल्ह्यासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार मिळवून देणारं क्षेत्र आहे. यातून कलाकारांना काम तर मिळतच पण त्यासोबत स्थानिकांच्या हाताला देखील काम मिळतं असतं.

याची सुरुवात जेव्हा चित्रपटाचे निर्माते शूटिंगसाठी गावाकडे येतात तेव्हा. यानंतर स्थानिक मुलं त्या निर्मात्यांना जशी हवी असतात तशी लोकेशन्स शोधून देणे, स्थानिक स्तरावर हवी ती मदत मिळवून देणे यासाठी मदत करतात. काही तरुणांनी तर त्यासाठी स्वतःच्या पातळीवर ‘एक खिडकी योजना’ तयार केली आहे. आणि ही निर्मात्यांना सोयीची पण वाटते.

त्याचसोबत चित्रपटावेळी सगळीच टीम मुंबईवरून घेऊन येणं शक्य नसतं, अशावेळी स्थानिक फोटोग्राफर, कॅमेरा सहाय्यक म्हणून देखील तरुणांना काम मिळतं.

ज्यांच्याकडे ब्युटीची कला आहे अशा स्थानिकांना सहाय्यक वेशभूषाकार, सहाय्यक केशभूषाकार, मेकअपमॅन/वुमॅन म्हणून काम मिळते. ज्यांच्याकडे तांत्रिक ज्ञान आहे त्यांना प्रोडक्शन लेबर, साऊंड हेल्पर, लाईट हेल्पर, टेक्निकल सपोर्ट, डबिंग आर्टिस्ट म्हणून संधी मिळते.

सर्वात महत्वाचं आणि मोठी संधी म्हणजे चित्रपट क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या स्थानिक कलाकारांना संधी मिळते. 

या कलाकरांना शहरापासून शूटिंगच्या लोकेशन पर्यंत दळण-वळणासाठी आवश्यक असलेली वाहतूक व्यवस्था हे स्थानिक लोक पुरवत असतात.

साधारणपणे गावातील वीस-तीस दिवसांच्या चित्रीकरणाच्या शेड्युलमध्ये चित्रपटाच्या संपूर्ण टीमची जेवण्याची सोय गावातच केली जाते. मोठ्या हॉटेल्समधून रोज जेवण मागावण्यापेक्षा गावातील महिलांना किंवा महिला बचत गटांना जेवणाची ऑर्डर दिली जाते. त्यामुळे गावातल्या स्थानिक महिलांसाठी पण रोजगार उपलब्ध होतो.

त्याचसोबत ज्या गावामध्ये चित्रीकरण आहे तेथील स्थानिक विकासाला मदत, चित्रीकरणाच्या मोबदल्यात ग्रामपंचायतीला आर्थिक स्वरूपात मदत देणे, चित्रीकरण स्थळाचं भाडं त्या-त्या गावकऱ्याला दिलं जातं. यामुळे तिथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या उत्पन्नामध्ये देखील वाढ होत असते.

उदाहरण बघायचं झालं तर मध्यंतरी आलेल्या ‘धुरळा’ या चित्रपटाचं चित्रीकरण वाई, भोर, फलटण, रागडोंबानगर आणि आजूबाजूच्या आणखी काही ग्रामीण भागात झालं होतं.

चित्रपट राजकीय पार्श्वभूमीचा असल्यामुळे पटकथेतील अनेक सीन्ससाठी शेकडोच्या संख्येनं ज्युनिअर आर्टीस्ट लागणार होते. विविध राजकीय गटांचे कार्यकर्ते म्हणून ते स्क्रीनवर दिसणार होते. जवळपास तीस दिवस चाललेल्या चित्रीकरणासाठी शेकडोंच्या संख्येनं ज्युनिअर आर्टीस्ट मुंबईहून आणणं आणि बोलावणं शक्य नव्हतं.

त्यावर उपाय म्हणून चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी आयडिया करत गावातल्या ग्रामस्थांना एकत्र केलं. आणि त्यांना आपल्या डोक्यातील संकल्पना सांगितली. योगायोगानं गावात त्यावेळी दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे शेतीतली पण काही काम नव्हती. ग्रामस्थांनी काम करायला लगेच होकार कळवला.

विद्वांस यांनी निवड झालेल्यांची कार्यशाळा घेतली आणि या सगळ्यांना ज्युनिअर आर्टीस्ट म्हणून ‘धुरळा’ चित्रपटात काम करायची संधी दिली.

या निमित्तानं साधारण तीस दिवसांच्या शेड्युलमध्ये आठशे पेक्षा जास्त गावकऱ्यांना रोजगार मिळाला होता.

यापूर्वी ग्रामीण भागात सरगम, मदर इंडिया, ओमकारा, गंगाजल, राजनीति, स्वदेस, मंगल पांडे, बाजीराव मस्तानी, दबंग टू आणि थ्री, चेन्नई एक्सप्रेस, तारे जमीन पर अशा अनेक चित्रपटांचं शूटिंग झालं आहे. त्यावेळी देखील असाचं अनेकांना रोजगार मिळला होता.

आणखी एक सगळ्यात महत्वाचा फायदा होतो तो म्हणजे चित्रीकरणाच्या निमित्ताने जिल्ह्यात येणारे, चित्रीकरण पाहण्यासाठी येणारे प्रेक्षक यामुळे जिल्ह्याच्या पर्यटनामध्ये मध्ये लक्षणील वाढ होत असते.

मागच्या २ वर्षांपूर्वी कोल्हापूरमधील वसगडे या गावात तुझ्यात जीव रंगला मालिकेचं चित्रीकरण चालू होतं. त्यावेळी स्थानिक राजकारण आणि चित्रीकरण पाहायला येणाऱ्या नागरिकांची संख्या हजारोंच्या घरात होती. आता एवढी लोक येणार तर साहजिक गरजा निर्माण होणार, आणि या गरजेमधूनच रोजगार निर्मिती होत असते.

एक वेळ तर अशी आली की येणाऱ्या लोकांची संख्या वाढल्यामुळे गावकऱ्यांना त्रास होऊ लागला, आणि त्यामुळे त्यांनी ‘तुझ्यात जीव रंगला’च चित्रीकरण चक्क ५ दिवस बंद ठेवायला लावलं होतं.

म्हणजेच एका चित्रपट, मालिका, वेब सिरीज यांच्या चित्रीकरणावेळी गावातील पन्नास घरात तर चूल पेटते. त्यामुळे पटोले साहेब तुम्ही अमिताभ, अक्षय यांच्या सारख्या हिरोंचे शूटिंग बंद पडून केवळ त्यांनाच विऱोध करत नाही तर वर सांगितलेल्या अशा अनेक जणांच्या पोटावर पाय आणतं असता.

हे हि वाच भिडू.  

Leave A Reply

Your email address will not be published.