माहितीपटातून ‘बाल नरेंद्र’ येताहेत ‘मतदारांच्या’ भेटीला !
२०१९ च्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु व्हायला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना भाजपने त्यादृष्टीने मोर्चेबांधणी सुरु केलेली बघायला मिळतेय.
भाजप २०१९ च्या निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात लढविणार यात कुणाला काही शंका असण्याचं कारणच नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या ‘लार्जर दॅन लाईफ’ प्रतिमा निर्मितीतील पुढचं पाऊल म्हणून येत्या २९ जुलै रोजी त्यांच्या बालपणावर आधारित ‘चलो जीते है’ नावाचा माहितीपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. नुकतंच राष्ट्रपती भवनात माहितीपटाचं ‘स्पेशल स्क्रीनिंग’ पार पडलंय.
या माहितीपटात बालपणाच्या नरेंद्र मोदी यांचं आयुष्य चित्रित करण्यात आलंय . ‘नरु’ नावाचा मुलगा गुजरातमधील गावात आपल्या आयुष्याचा अर्थ शोधताना फिरतोय. आपण का जगतोय असा प्रश्न तो त्याच्या पालकांना, शेजाऱ्या-पाजाऱ्यांना आणि शिक्षकांना विचारतोय.
नरूच्या या प्रश्नाच्या उत्तरात त्याचे शिक्षक त्याला स्वातंत्र्य संग्रामातील भगतसिंग, राजगुरू या क्रांतीकारकांची उदाहरणं देऊन देशासाठी जगण्याची शिकवण देतात. शिवाय स्वामी विवेकानंद यांच्या पुस्तकातून देखील त्याला “बस वही जीते है, जो दुसरो के लिये जिते है” अशी देशसेवेसाठी आयुष्य समर्पित करण्याची शिकवण मिळते.
हा नरु नावाचा मुलगा रेल्वे स्थानकावर चहा विकत असल्याचे चित्रण या माहितीपटात बघायला मिळतंय. हे चित्रीकरण त्याच वडनगरच्या स्थानकावर करण्यात आलंय, जिथे आपण लहान असताना चहा विकायचो, असा दावा पंतप्रधान मोदी यांच्यामार्फत केला जातो. ‘धैर्य दर्जी’ हा बाल कलाकार या माहितीपटात नरूच्या मुख्य भूमिकेत आहे.
सुरुवातीला २९ जुलै रोजी रात्री ९ वाजता स्टारच्या सर्व वाहिन्यांवर ३२ मिनिटांचा हा माहितीपट रिलीज करण्यात येणार आहे. त्यानंतर देशभरातील गावागावात तो दाखवला जाईल. नरेंद्र मोदी यांनी लिहिलेल्या ‘सामाजिक समरसता’ या पुस्तकावर हा माहितीपट आधारित आहे.
मंगेश हाडावळे यांनी हा माहितीपट दिग्दर्शित केलाय, तर आनंद राय, महावीर जैन आणि भूषण कुमार यांनी माहितीपटाची निर्मिती केलीये. दरम्यान “ ‘चलो जीते है’ हा माहितीपट नरेंद्र मोदी यांच्या धोरणांच्या प्रचारासाठी बनविण्यात आला नसून मला लहान मुलाचं कायमच आकर्षण राहिलेलं आहे, त्यामुळेच नरेंद्र मोदींच्या आयुष्यातील सुरुवातीचे दिवस चित्रित करून माहितीपटाची निर्मिती करण्यात आली आहे” मंगेश हाडवळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय.