लग्न करताना ब्लड ग्रुप चेक केला पाहिजे काय..?

तुम्हाला माहीताय का माहीत नाही पण अरेंज मॅरेज म्हणजे सतराशे साठ भानगडी असतात. पहिले तर मुलगी बघा, कांदेपोहे खा, नंतर एकामागे एक असं पैपाहुण्यांनी पसंतापसंत करा मग कुंडल्या बघा, त्यातले गुण जुळवा आणि मग लग्न करा.

आता यात एक ऍड करा…ते म्हणजे रक्तगट जुळवा.

तर लग्नाच्यावेळी पती किंवा पत्नीचा ब्लड ग्रुप सारखा असू नये असं तुम्ही बऱ्याचदा ऐकलेल असतं. जर दोघांचाही ब्लड ग्रुप सारखा असेल तर बाळाच्या जन्माच्यावेळी अडचणी येतात, किंवा एकापेक्षा जास्तवेळा गर्भापत होण्याचा धोका वाढतो. तर याबाबत अनेक समज-गैरसमज लोकांच्या मनात आहेत.

यात किती तथ्य आहे याचा शोध मी घ्यायचं ठरवलं, कारण याच गोष्टींमुळे माझं लग्न ठरेना..

तर ब्लड ब्लड ग्रुपचे २ कम्पोनेंट्स असतात. A, B, AB आणि O. दुसऱ्या कम्पोनेंट्सला RH फॅक्टर्स असं म्हटलं जातं.

रक्तातील लाल पेशींवर खास प्रकारचं एक प्रोटीन असतं. या प्रोटीनच्या अस्तित्वाचा शोध सर्वप्रथम र्‍हीसस नावाच्या माकडांमध्ये लागल्यामुळे त्याला र्‍हीसस फॅक्टर असं म्हणतात. ज्यांच्या लाल पेशींवर हा र्‍हीसस फॅक्टर असतो, त्यांचा रक्तगट RH पॉझिटिव्ह असतो व ज्यांच्यामध्ये हा नसतो त्यांचा RH निगेटिव्ह. म्हणून प्रत्येक ब्लड ग्रुप पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असतो. उदा, A+, A-, B+, B-, O+, O_.

आता जेव्हा A, B, O, AB यापैकी कोणतेही RH निगेटिव्ह ब्लड शरीरात RH पॉझिटिव्ह ब्लड मध्ये मिसळले, तर त्यातील लाल पेशींवरील र्‍हीसस प्रोटीन, निगेटिव्ह ब्लड ग्रुपच्या माणसाला परके असते. आणि त्यामुळे या प्रोटीनमुळे अशा निगेटिव्ह ब्लड ग्रुपच्या माणसांमध्ये काही संरक्षक प्रथिने तयार होतात, जी अशा र्‍हीसस प्रथिनांनी युक्त असलेल्या लाल पेशींना नष्ट करतात आणि शरीराला सुरक्षित ठेवतात.

आईचा रक्तगट RH निगेटिव्ह आणि वडिलांचा रक्तगट RH पॉझिटिव्ह असेल, तर त्यांना होणाऱ्या बाळाचा रक्तगट RH निगेटिव्ह असण्याची शक्यता 50% असते. बाळाचा रक्तगट RH निगेटिव्ह असण्याने बाळ किंवा आईला कोणताही त्रास होत नाही.

जर बाळाचा रक्तगट RH पॉझिटिव्ह असेल तर गर्भावस्थेत असताना समजा अशा RH पॉझिटिव्ह ब्लड ग्रुपच्या लाल रक्तपेशी गर्भाशयातील रक्तप्रवाहामार्फत आईच्या रक्तात मिसळल्या, तर त्या आईच्या शरीरात वर लिहिल्याप्रमाणे संरक्षक प्रथिने तयार करतात व ही प्रथिने वारेतील रक्तवाहिन्यांमधून RH पॉझिटिव्ह बाळाच्या रक्तात मिसळतात आणि बाळाच्या लाल रक्तपेशी नष्ट करतात.

यामुळे अशा बाळाला हेमोलिटिक अ‍ॅनिमिया होऊ शकतो व त्यामुळे निरनिराळी गुंतागुंतीची लक्षणे निर्माण होऊ शकतात. आई निगेटिव्ह रक्तगटाची आणि गर्भ पॉझिटिव्ह रक्तगटाचा असल्यास त्यांचे रक्त एकमेकांत मिसळण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

जर मूल RH पॉझिटिव्ह असेल, तर अशा RH निगेटिव्ह मातेला प्रसूतीनंतर 48 तासांच्या आत RH अँटी डी इंजेक्शन वैद्यकीय सल्ल्याने दिल्यास तिच्या शरीरात आरएच संरक्षक प्रथिने निर्माण होत नाहीत.

याचाच अर्थ असा की या जोडप्यांचे ब्लड ग्रुपसारखे असतात त्यांच्या होणाऱ्या बाळात ABO Incompability किंवा RH Incompability उद्भवण्याचा धोका नसतो. त्यांची बाळं सुरक्षित असतात. म्हणूनच पती, पत्नीचा ब्लड ग्रुप सारखा असल्यासं घाबरण्याचं काहीही कारण नाही. त्याचबरोबर अर्धवट शास्त्रीय माहितीच्या आधाराने RH निगेटिव्ह रक्तगटाची सून, बायको स्वीकारायला अजिबात घाबरू नका.

जोडप्यांनी hb electrophoresis चाचणी जरूर करून घ्यायला हवी. जेणेकरून बाळाला hemoglobin abnormalities होऊ शकतात की नाही याबाबत कळू शकेल. यावरून लक्षात येतं की बाळाला थालेलिमिया होण्याची शक्यता आहे की नाही.

टीप – विश्वास असल्यास पत्रिका वगैरे बघा; पण ‘रक्तगट जुळवणे’ वगैरे करू नका.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.