वडिलांच्या एका निर्णयामुळं श्रेयस अय्यरचं करिअर वाचू शकलं…
गेल्या तीन चार दिवसांपासून सोशल मीडियावर सगळ्यात हिट असलेला क्रिकेटर कोण? तर श्रेयस अय्यर. कसोटी पदार्पण करताना त्यानं दमदार सेंच्युरी तर ठोकलीच; पण दुसऱ्या डावात भारतीय संघाची पडझड सुरू असताना डावही सावरला. आता आपली पहिलीच टेस्ट मॅच खेळणारा भिडू एवढी खतरनाक बॅटिंग करतोय, म्हणल्यावर तो हिट होणारच की.
मागचे तीन चार दिवस अय्यरला भारी गेले असले, तरी त्याच्या आधीचे दिवस मात्र अय्यरला टेन्शन देणारे होते. म्हणजे आता बघा, आयपीएल तोंडावर असताना त्याच्या खांद्याला दुखापत झाली. त्यामुळं, आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात दिल्ली कॅपिटल्सनं रिषभ पंतकडं नेतृत्व दिलं. आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातही पंतच दिल्लीचा कॅप्टन राहिला. त्यात टी२० वर्ल्डकपसाठी निवड झालेल्या खेळाडूंमध्ये अय्यरला स्थान मिळालं खरं, पण ते राखीव खेळाडूंमध्ये.
आयपीएलच्या नव्या सिझनसाठीही दिल्ली कॅपिटल्सनं अय्यरला रिटेन केलं नाही. त्यामुळं अय्यरच्या करिअरला ब्रेक लागणार का? खांद्याची दुखापत त्याला महागात पडणार का? असे अनेक प्रश्न विचारले जात होते. पण श्रेयस अय्यरनं कानपूर टेस्टमध्ये केलेल्या बॅटिंगमुळं सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत.
तुम्हाला थोडं इतिहासात घेऊन जातो…
अय्यर मूळचा मुंबईचा. खडूस आर्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई क्रिकेटचं बाळकडू त्यानं लहानपणापासून गिरवलं. त्यामुळं अंगात भिनलेला चिवटपणा त्याच्या चांगलाच कामी आला. कसंय ना भिडू भारताच्या मुख्य संघात एन्ट्री मारायची असेल, तर छोटे-मोठे स्कोअर करुन चालत नाही. कायतरी मोठा धमाका केला, तरच तुम्ही ‘लंबी रेस का घोडा’ म्हणून ओळखले जाता.
अय्यरनं हा धमाका केला, २०१५-१६ च्या रणजी सिझनमध्ये. जिथं प्लेअर्स ७००-८०० रन्स केले तरी खुश होतात, तिथं अय्यरनं चोपले १३२१ रन्स. साहजिकच सगळ्यांना वाटलं आता अय्यरचं भारतीय संघात सिलेक्शन होणार असं सगळ्यांनाच वाटत होतं. पण त्याच्या पदरी निराशा आली.
तो काळ असा होता, की अय्यर अक्षरश: हताश झाला होता. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सातत्यानं एवढी भारी कामगिरी करून पण त्याला संघात स्थान मिळत नव्हतं. त्याच्यापेक्षा बरं खेळलेले कार्यकर्ते मात्र टीम इंडियाची कॅप दिमाखात मिरवत होते. त्यामुळं अय्यर पुढं एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं होतं.
त्यामधून तो तरला आणि टीम इंडियात झळकला या मागचं कारण फार खास आहे. अय्यरनं याआधीही अशी परिस्थिती अनुभवली होती. तेही वयाची १६ वर्ष पूर्ण व्हायच्या आधी. त्या परिस्थितीतून त्याला बाहेर काढलं ते त्याच्या वडिलांनी.
मुंबईच्या मैदानांवर अंडर-१६ वयोगटाचं क्रिकेट खेळणाऱ्या अय्यरचा फॉर्म बिघडला होता. त्यात अय्यरच्या एका कोचनं त्याच्या वडिलांना सांगितलं की, असंच सुरू राहिलं, तर तुमच्या मुलाचं क्रिकेटमधलं भवितव्य धोक्यात आहे. आता इतर कुठल्याही वडिलांना वाटेल तशीच सेम भीती, अय्यरच्या वडिलांना वाटली. पोरीचा काही विषय असेल का? आपलं पोरगं चुकीच्या संगतीत आहे का? असं टेन्शन त्यांना आलं.
अय्यरचा फॉर्म गंडलेला होताच, त्यामुळं त्याच्या वडिलांनी एक ट्रिक केली. त्यांनी अय्यरला मानसोपचार तज्ञाकडं नेलं. तिथं अय्यरचं नक्क्की काय गंडतंय? कशावर काम करायला पाहिजे? या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या. मग अय्यरची बॅट बोलायला लागली आणि त्यानं आधी डोमेस्टिक क्रिकेट, मग आयपीएल आणि आता इंटरनॅशनल क्रिकेट सगळीकडं आपला डंका वाजवला.
क्रिकेटमध्ये करिअर करायचं होतं, पण घरच्यांचा सपोर्ट नाही मिळाला रे, असं म्हणणारे अनेक कार्यकर्ते आपल्याला आजूबाजूला दिसतात. बाकीचे कार्यकर्ते असे असतात, की ज्यांना घरून सपोर्ट मिळतो पण त्यांचा मार्ग भरकटतो. अय्यरला सपोर्ट मिळत होताच, पण बिघडलेल्या फॉर्ममुळं त्याचं जहाज गटांगळ्या खायला लागलं होतं.
पण भावानं हिम्मत हरली नाय, डिप्रेशनच काय त्यानं खांद्याच्या दुखापतीलाही हरवलं आणि आता कानपूर टेस्टमध्येही आवाज घुमला,
दो रुपये की पेप्सी, अय्यर भाई सेक्सी!
हे ही वाच भिडू:
- अपघातानं क्रिकेटमध्ये आलेला बापू, आता राडा करायला लागलाय
- गुटखा मॅन म्हणतोय, मी गुटखा नाय सुपारी खात होतो
- १०० टेस्ट मॅचेस खेळणारा नेथन लायन आधी साधा ग्राऊंड्समन होता