मराठी माणसाला धंदा जमत नाही, अहो हॉवर्ड बिझनेस स्कुलचे डिन एक मराठी व्यक्ती आहेत.. 

बिझनेस हा शब्द जरी कोणी उच्चारला तरी मराठी माणसाला तो जमणार नाही अस शेलक्या भाषेत बोलणारा कोणतरी सापडतोच. एखादं दुसरं निवडक उदाहरण देवून ती व्यक्ती एखाद्याचं धंद्यात चुकलेलं गणित मांडून आपलं वाक्य पटवून देण्याचा प्रयत्न देखील करत असते. 

पण कसाय ना, आपलेच लोक आपले पाय ओढण्यात पुढे असतात. पण अशा दोषारोपांकडे न पहाता खूप सारी माणसं जगभरात काम करत आहेत.

असेच एक व्यक्ती म्हणजे श्रीकांत दातार. 

श्रीकांत दातार हे जगप्रसिद्ध असणाऱ्या हॉवर्ड बिझनेस स्कूलचे डीन आहे. यापूर्वी ही जबाबदारी देखील एका भारतीय वंशाच्या व्यक्तीकडे होती. त्यांच नाव नितीन नोहरीया. त्यांच्यानंतर ही जबाबदारी आली ती श्रीकांत दातार यांच्याकडे.

हॉवर्ड बिझनेस स्कूलच्या स्थापनेपासून ते आजपर्यन्तच्या एकूण ११२ वर्षांच्या इतिहासात एकूण ११ डीन झाले त्यापैकी दोन भारतीय आणि त्यातील एक मराठी… 

श्रीकांत दातार यांच शिक्षण मुंबईत झालं. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झालं ते मुंबईतल्या कॅथेड्रल आणि जॉन कॅनोन या शाळेमधून. त्यानंतर ते मुंबई विद्यापीठाच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून मॅथेमेटिक्स आणि इकॉनॉमिक्सची पदवी घेवून पास झाले. नुसतेच पास झाले नाहीत तर गोल्ड मेडल घेवून पास झाले.

त्यानंतर सीए. लागलीच अहमदाबादच्या प्रसिद्ध अशा IIM मधून पासआऊट झाले. इथेही गोल्ड मिडेल मिळाले. 

शिक्षणाचा हा आलेख असाच वाढत राहिला. स्टॅनफर्ड विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली. त्यानंतर ते कार्नेगी मेलॉन ग्रज्युएट स्कूल ऑफ इंडस्ट्रएल ॲडमिनिस्ट्रेशन संस्थेत सहयोगी प्राध्यापक म्हणून काम पाहू लागले. 

१९८९ साली ते स्टॅनफर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. दरम्यानच्या काळात शिक्षणतज्ञ म्हणून त्यांचा गौरव होवू लागला. पुढे १९९६ साली ते हॉवर्ड बिझनेस स्कूलमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. 

आपल्या कारकिर्दीत त्यांनी MS-MBA IN BIOTECH सारखे कोर्सेस उपलब्ध करुन दिले. जगभरात त्यांचे शोधनिबंध व लेख अभ्यासले जावू लागले. कलकत्ता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट पासून ते नोवार्टिस एनर्जी, टी मोबाईलयुएसइंक सारख्या संस्थांच्या संचालक मंडळावर देखील ते आहेत. 

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.