देशातल्या सर्वात विद्वान माणसामुळे महाराष्ट्रात पहिलं संस्कृत विद्यापीठ उभं राहिलं..

श्रीकांत रामचंद्र जिचकार, यांना महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देश भारताचा सगळ्यात क्वालिफाईड व्यक्ती म्हणून ओळखतो. नागपूर जिल्ह्यातील आजानगाव येथे शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या श्रीकांत जिचकार यांनी आपल्या आयुष्यात एकूण ४२ पदव्या मिळवल्या .

त्यांनी आपल्या पहिल्या पदवीची सुरवात सर्वात अवघड समजल्या जाणाऱ्या वैद्यकीय शिक्षणापासून केली. ते एम.बी.बी.एस. व एम.डी. तर होतेच, त्याबरोबरच त्यांनी आंतरराष्ट्रीय कायद्याचा अभ्यासक्रम घेऊन एल.एल.एम. पदवी घेतली. 

जिचकरांनी १० विषयांत एम ए केले. यामध्ये लोकप्रशासन, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, संस्कृत, इतिहास, इंग्रजी साहित्य, फिलॉसॉफी, राज्यशास्त्र, भारताचा प्राचीन इतिहास संस्कृती आणि पुरातत्त्व व मानसशास्त्र यांचा समावेश आहे. जिचकारांनी संस्कृतमध्ये मानाची डी.लिट ही पदवी मिळवली.

त्यांनी इ.स. १९९० पर्यंत एकूण ४२ विद्यापीठाच्या परीक्षा दिल्या व यातील २८ परीक्षांमध्ये सुवर्णपदक, इतर परीक्षांमध्ये प्रथम वर्ग मिळवला. त्यांचे नाव हे भारतामधील सर्वांत जास्त शिक्षित व्यक्ती म्हणून घेतले जाते.

या शिवाय १९७८ मध्ये यूपीएससीची परीक्षा उत्तम गुणांनी उत्तीर्ण होऊन आयपीएस अधिकारी बनले, पुढच्या वर्षी पुन्हा परीक्षा दिली आणि आयएएसची पोस्ट पटकावली. ४ च महिने नोकरी केली आणि विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा दिला.

याचा अर्थ असा नव्हे कि ते आयएएस अधिकारी होते म्हणून राजकारणात आले.

विद्यार्थी दशेत असल्यापासून त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. महाविद्यालयात असताना त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली होती. त्याच काळात ते नागपूर विद्यापीठाच्या विद्यार्थी संसदेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले होते.

पुढे काँग्रेस पक्षाकडून आग्रह झाल्यामुळे जिचकार यांनी १९८० साली विधानसभेची निवडणूक लढवली आणि भरघोस मतांनी आमदार म्हणून निवडून गेले. इ.स. १९८५ पर्यंतची त्यांची ही कारकीर्द प्रचंड लोकाभिमुख व लोकप्रिय ठरली होती. एकाच वेळी चौदा खात्यांचा कार्यक्षम मंत्री म्हणून त्यांनी लौकिक मिळविला होता.

पुढे १९८६ ते १९९२ ह्या कालखंडात महाराष्ट्र विधान परिषदेवर आमदार होते. त्यानंतर त्यांची तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांनी राज्यसभेत खासदार म्हणून निवड केली. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध समित्यांचा कार्यभार त्यांनी अत्यंत कुशलतेने सांभाळला. अर्थ, शोध संपदा, विविध स्रोत, कर, पाटबंधारे, दळणवळण ह्या संबंधीच्या शासकीय समित्यांवर स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला.

राजकारणात रमणारे डॉ. जिचकार चित्रकला, छायाचित्रण, वाचन, प्रवास, व्याख्यान ह्यातही तेवढाच रस घेत. अर्थशास्त्र आणि अध्यात्म ह्या विषयांवरच्या त्यांच्या विद्वत्तापूर्ण आणि रसाळ व्याख्यानांना होणारी गर्दी अचंब्यात टाकणारी असे.

सध्या प्रसिद्ध असणाऱ्या दीक्षित डायटची संकल्पना देखील त्यांचीच होती.

तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही.नरसिंह राव यांचा जिचकार यांच्यावर मोठा विश्वास होता. नरसिंह राव मूळचे आंध्र प्रदेशचे असले तरी ते लोकसभा निवडणूक नागपूरजवळच्या रामटेक येथून लढवायचे. जिचकार यांच्याप्रमाणेच नरसिंह राव यांची अनेक भाषा जाणणारे विद्वान अशी ओळख होती. दोघांचे विचार त्यामुळे जुळायचे.

एक दिवस नरसिंह राव आणि श्रीकांत जिचकार यांच्या चर्चेत महान कवी कालिदास यांचं स्मरणार्थ एखादे संस्कृत विद्यापीठ उभे करायची संकल्पना पुढे आली. महाराष्ट्रात तोपर्यंत संस्कृतचा अभ्यास करण्यासाठी एक विशेष विद्यापीठ नव्हते. जिचकार यांनी पंतप्रधानांना सांगितले कि हे

विद्यापीठ महाराष्ट्रात तेही रामटेक येथेच उभारावे, कारण असे सांगितले जाते की संस्कृत साहित्यातील अनमोल ठेवा मानले जाणारे मेघदूत हे महाकाव्य कवी कालिदासाने रामटेक तेथेच लिहिले.

नरसिंहराव यांना ही कल्पना प्रचंड आवडली. शिवाय रामटेक हा त्यांचा लोकसभा मतदारसंघ होता. तिथल्या मातीचे पार फेडण्यासाठी काही तरी करायची त्यांची इच्छा होती. त्यांनी जिचकार यांना या विद्यापीठासाठी प्रयत्न करावेत असे आदेश दिले.

त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते सुधाकरराव नाईक. डॉ.श्रीकांत जिचकार त्यांच्याकडे विद्यापीठाची मागणी मिळवण्यासाठी गेले. पंतप्रधानांचा सातत्याचा आग्रह यामुळे मुख्यमंत्र्यानी डॉ. श्रीकांत जिचकार यांची एक सदस्यीय समिती गठीत केली आणि संस्कृत विद्यापीठाचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले.

डॉ. जिचकार यांनी भारतातील सर्व विद्यापीठांचे अध्ययन करून शासनाला एक विस्तृत अहवाल सादर केला.

सदर अहवालाच्या अनुषंगाने व इतर शिक्षण शास्त्रज्ञांच्या अभ्यासाआधारे महाराष्ट्र शासनाने दि. १८ सप्टेंबर १९९७ रोजी नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथे रामगिरीच्या पायथ्याशी महाकवी कालिदासाच्या चिरस्मरणार्थ कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना केली.

संस्कृत विद्यापीठात संस्कृत, पाली, प्राकृत, योग, आयुर्वेद, वेदांग ज्योतिष, भारतीय संस्कृती आणि मूल्ये, हस्तलिखीतशास्त्र, कीर्तनशास्त्र, ललितकला, जनसंज्ञापन आणि पत्रकारिता, ग्रंथालयशास्त्र, परकीय भाषा अशा विविध विषयांवर पदविका ते पदव्युत्तर पदवी तसेच आचार्य पदवीपर्यंतचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

या संस्कृत विद्यापीठाने आधुनिकतेशी नाळ जोडून विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. जसे कॉम्प्युटर ऍप्लिकेशन पदविका, पर्यावरण व्यवस्थापन पदविका इत्यादी. पारंपरिक पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणाबरोबरच पौरोहित्य तसेच कीर्तनशास्त्र या विषयांवरील रोजगाराभिमुख अभ्यासक्रम तसेच केंद्रीय तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करवून घेणारे सिव्हील सर्व्हीसेस पदवी अभ्यासक्रमही विद्यापीठात उपलब्ध आहे.

किंबहुना असे सृजनशील अभ्यासक्रम राबविणारे संस्कृत विद्यापीठ हे संपूर्ण महाराष्ट्रात एकमेव आहे.

विद्यापीठातील विविध पाच प्रमुख संकायांतर्गत आठ विविध विभागाद्वारे भारतीय संस्कृतीच्या विविध अंगांचा परिचय करून देणारे सर्वांगसुंदर असे प्रमाणपत्र, पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी मिळून सुमारे ८० अभ्यासक्रम राबविले जातात. याशिवाय संस्कृत तसेच साहित्य, व्याकरण, दर्शन, योगशास्त्र, शिक्षणशास्त्र, वेदांग ज्योतिष या विषयांमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमांप्रमाणे आचार्य पदवी व डीलिट करण्याची सोयही विद्यापीठात उपलब्ध आहे.

विद्यार्थ्यांबरोबरच संस्कृत शिक्षक घडविण्याचे सामाजिक उत्तरदायित्व पार पाडण्यासाठी विद्यापीठाचे स्वतंत्र बी.एड. महाविद्यालय आहे. संपूर्ण महाराष्ट्रात संस्कृत विषयाचे शिक्षक घडविणारे हे एकमेव महाविद्यालय आहे हे विशेष !

गेल्याच महिन्यात राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते डॉ. श्रीकांत जिचकार ज्ञानस्त्रोत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. ज्या महान नेत्याने त्याची उभारणी केली त्याचं स्मरण या जागतिक दर्जाच्या विद्यापीठाने जपलंय हे विशेष.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.