मनात आणलं असतं तर या ठाकरेंनी बॉलिवूड संगीतावर राज्य केलं असतं.

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे !

यांच्या एका इशाऱ्यावर धावणारी मुंबई स्तब्ध होऊन जायची. अंडरवर्ल्डमधले डॉनदेखील त्यांच्या नावाने चळचळ कापायचे. मराठी माणसाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोणी करू शकत नव्हतं.

बाळासाहेब ठाकरेंनी हा दरारा सामान्य जनतेमध्ये त्यांच्या बद्दल असलेल्या प्रेमामुळे आणि आदरामुळे कमावला होता. प्रबोधनकारांच्या काळापासून ते आजच्या तिसऱ्या चौथ्या पिढी पर्यंत ठाकरेंच्या रक्तात राजकारण होते.

याच ठाकरे कुटुंबात एकजण होता जो संगीत, व्यंगचित्रे यात रमला मात्र कधी राजकारणाकडे संधी असूनही वळला नाही.

श्रीकांत केशव ठाकरे. बाळासाहेबांचे धाकटे बंधू, राज ठाकरे यांचे वडील.

असं म्हणतात की बाळासाहेब कडाडती तोफ होते तर श्रीकांत ठाकरे एक श्रवणीय गझल

दोघांचे व्यक्तिमत्व जरी वेगवेगळे असले तरी दोघांची जोडगोळी रामलक्ष्मण म्हणूनच ओळखली जायची. श्रीकांत ठाकरेंच्यावर बाळासाहेबांची छाप होती. ते देखील उत्तम व्यंगचित्रकार, पत्रकार होते. मार्मिक या व्यंगचित्र मासिकाची स्थापना या दोन्ही भावांनी मिळून केली होती.

पुढे मार्मिक मधुनच बाळासाहेबांची राजकीय विचारसरणी घडत गेली व त्यांनी शिवसेना या मराठी माणसासाठी लढणाऱ्या राजकीय पक्षाची स्थापना केली.

श्रीकांत ठाकरे हे सुरवातीपासून राजकारणापासून अलिप्त होते.

त्यांचं मन संगीतात रमायच. याची सुरवात अगदी न कळत्या वयात झाली. आपल्या जसं घडलं तसं’ या आत्मचरित्रात त्यांनी या प्रसंगाचा उल्लेख केला आहे. श्रीकांत ठाकरे तेव्हा दीड वर्षांचे होते. ठाकरे कुटूंबीय दादरच्या मिरांडा चाळीत राहायचं. त्यांच्या घरी एका नाटक कंपनीच्या तालमी चालायच्या.

लहानग्या श्रीकांत ठाकरेंना फिट येण्याचा त्रास व्हायचा. अशीच एकदा फिट आल्यावर प्रबोधनकारांनी नाटक कंपनीच्या व्हायोलिन वादकाला राग भैरवचा आलाप वाजवण्यास सांगितलं आणि काय आश्चर्य आईच्या मांडीवर असलेल्या श्रीकांतना शुद्ध आली. या चमत्करावरून डॉक्टर देखील अचंबित झाले.

तेव्हा पासून संगीताशी नाळ जोडली गेली ती कायमचीच.

त्या नाटककंपनीच्या बुलबुल या वाद्याशी ते कायम खेळत राहायचे. प्रबोधनकारांनी त्यांना सी. व्ही. पंतवैद्य यांच्याकडे व्हायोलिन शिकण्यासाठी पाठवलं. त्यांच्या तालमीत श्रीकांत ठाकरे तयार झाले. एकदा संगीतकार अनिल मोहिले यांचे वडील बाबुराव मोहिले यांनी त्यांचं व्हायोलिन वादन ऐकून त्यांना उस्ताद बडे गुलाम अली खां साहेबांच्या समोर व्हायोलिन वाजव असं सांगितलं.

लवकरच तशी संधी आली. दादरच्या धुरू हॉलमध्ये एक कार्यक्रम होता आणि श्रीकांत ठाकरे व्हायोलिन वाजवत होते. अचानक बडे गुलाम अली खां साहेबांचं आगमन झालं. त्यांनी शरीक्लान्त ठाकरेंना वाजवताना ऐकलं. त्यांची तबियत खुश झाली. स्टेजवर जाऊन त्यांचं कौतुक केलं,

“अरे बच्चे बहुत सुरीला बजाते हो और सुनाओ.”

त्यादिवशी ती मैफिल तुफान रंगली. गुलाम अली यांनी त्यांना साथ देखील दिली. श्रीकांत ठाकरे यांच्यासाठी हे कौतुक एकदा मोठा पारितोषिक जिंकल्याप्रमाणे होतं.

पुढील काळात आकाशवाणीवर व्हायोलिनवादनाचा स्वतंत्र कार्यक्रम सादर केला. सुगम गायनाच्या मैफलीमध्ये व्हायोलिनची साथ केली. गजल, ठुमरी या गीतप्रकारांवर त्यांचे विशेष प्रेम होते. सारंगी या वाद्याचं आकर्षण होतं.

याच काळात बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आकार घेत होती. बाळासाहेब राजकारणात बुडाल्यावर श्रीकांत ठाकरे यांनी मार्मिकची सगळी जबाबदारी उचलली. व्यंगचित्रांपासून ते सिनेमा परीक्षणापर्यंत सगळ्या गोष्टी एकहाती ते सांभाळू लागले.

अगदी कमी काळातच बाळासाहेबांनी मराठी तरुणांची नस पकडली. त्यांची जादू तरुणांचा आवाज बनली. सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर शिवसैनिक रस्त्यावर उतरू लागला.

हे सर्व चालू असताना श्रीकांत ठाकरे बाळासाहेबांच्या पाठीशी उभे होते मात्र त्यांनी कटाक्षाने राजकारणापासून स्वतःला बाजूला राखलं.

त्यांना गर्दी आवडायची नाही. डोक्यात सतत संगीत घुमायचं. पुढील काळात त्यांना मराठी सिनेमांसाठी देखील स्वररचना करण्याची संधी मिळाली. त्यांनी भक्तिगीतांपासून ठुमरी, कव्वालीपर्यंत सर्व बाज चालींमध्ये आणले

तेव्हाचे सुपरस्टार सिंगर मोहम्मद रफी यांच्या आवाजाला मराठीत आणणे आणि त्याला योग्य न्याय देणे फक्त श्रीकांत ठाकरे यांना जमलं होत.

rafi thackeray

रफीजींशी त्यांचे खास सूर जुळले. दोघांची मैत्री देखील गाढ होती. राज ठाकरे सांगतात माझ्या लहानपणीच्या आठवणी म्हणजे रफी साब लुंगी आणि कुडता या वेशात भल्या सकाळी आमच्या घरी येत आहेत, आल्या आल्या आईला आजच्या लंचचा मेन्यू काय आहे असं हसत हसत विचारत आहेत. नंतर बाबांच्या सोबत तासनतास पेटी घेऊन गाण्याची तालीम करीत आहेत. हे अगदी काल परवा घडल्यासारखं वाटतं.

‘हा रुसवा सोड सखे! पुरे हा बहाणा सोड ना अबोला!

हे रफी आणि श्रीकांत ठाकरे या जोडगोळीचं तुफान गाजलेलं गाणं. याशिवाय शोधिसी मानवा, छंद जिवाला लावी पिसे, शोधिसी मानवा राऊळी अंतरी, हे मना आज कोणी बघ तुला साद घाली अशी एका पेक्षा एक गाणी या दोघांनी बनवली आणि रसिक प्रेक्षकांनी ती उचलून देखील धरली.

श्रीकांत ठाकरे स्वतः उर्दूचे उत्तम जाणकार होते. रफींच्या साठी ते मराठी गाणी उर्दू मध्ये लिहून द्यायचे. मराठी च चा उच्चार हिंदी गायकांना करता येत नाही म्हणून रफींच्या गाण्यात च हे अक्षर शक्यतो टाळले जायचे.

फक्त रफीचा नाही तर शोभा गुर्टुपासून ते सुरेश वाडकर अशा असंख्य प्रतिभावान गायकांबरोबर त्यांनी काम केलं. मराठीतल्या आघाडीच्या संगीतकारांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी केलेले प्रयोग मराठी संगीतामध्ये अनेक दारे उघडणारे ठरले.

श्रीकांत ठाकरेंनी मनात आणलं असतं तर ते बॉलिवूडमधले मोठे संगीतकार बनले असते, त्यांची उर्दू हिंदी वर पकड होती, रफी सारखा गायक त्यांचा खास मित्र होता. तो त्यांना हिंदीत चलण्याचा आग्रह देखील करायचा पण श्रीकांत ठाकरे यांनी हसून ती गोष्ट टाळली होती.

मराठीतही अगदी मोजके आणि स्वतःला आवडणाऱ्या सिनेमांना त्यांनी संगीत दिले. मोठा संगीतकार होण्याची महत्वाकांक्षा त्यांनी कधी बाळगलीच नाही.  

जेव्हा हिंदीतील एखादा निर्माता दिगदर्शक श्रीकांत ठाकरेंच्या कडे ऑफर घेऊन यायचा तेव्हा ते सरळ नकार देऊन टाकायचे. त्यांना वाटायचं आपला भाऊ मोठा नेता आहे, त्याला खुश करायचं म्हणून हे लोक आपल्याला घेत आहेत. त्यांना हिंदीत जाऊन रफींच्या बरोबर अख्ख बॉलिवूड हलवून टाकता येऊ शकलं असतं पण ते गेलेच नाहीत.

कित्येकजणांनी त्यांना समजावून सांगितलं होतं की तुम्ही तुमचे टॅलेंट वाया घालवत आहात. पण शेवटी ते ठाकरी रक्त होतं. श्रीकांत ठाकरे म्हणायचे,

“भले मला काम मिळालं नाही तरी चालेल पण तत्वांना मुरड घालणे मला जमणार नाही.”

संगीताचं प्रेम त्यांच्या मनात एवढं भरलं होतं की त्यांनी आपल्या पत्नीचं नाव मधुवंती, मुलीचं नाव जयजयवंती आणि मुलाचं नाव स्वरराज असं ठेवलं.

राजला श्रीकांत ठाकरे यांनी लहानपणापासून व्हायोलिन, तबला, गिटार शिकवायला सुरवात केली. पण त्यांना संगीतापेक्षा व्यंगचित्रात जास्त रस होता. काकांच्या पावलावर पाऊल टाकून ते राजकारणात गेले. राजकारणातले मोठे नेते बनले.

पण श्रीकांत ठाकरे अखेरच्या श्वासापर्यंत संगीतासाठी जगले, आपल्या शब्दांवर, तत्वांवर ठाम राहिले. १० डिसेंबर २००३ रोजी त्यांचे निधन झाले.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.