श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी तिथल्या सैन्याला आता कांदे आणि बटाट्यावर लक्ष ठेवायला सांगितलयं…

कोणत्याही देशाच्या सैन्याचं मुख्य कर्तव्य असते ते देशाच्या सीमांचे रक्षण करणे. शत्रूवर लक्ष ठेवणे. मात्र श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी तिथल्या सैन्याला या कर्तव्यासोबतच देशातील कांदे आणि बटाटे या वस्तूंवर आणि वस्तूंच्या साठ्यावर लक्ष ठेवायला सांगितले आहे. त्याच कारण आहे तिथं लावण्यात आलेली आर्थिक आणीबाणी.

श्रीलंकेमध्ये सध्या सातत्यानं वाढत जाणारी महागाई लक्षात घेऊन आर्थिक आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसांपासून लंकेच्या रुपयांच्या दरामध्ये वेगाने घट होतं आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर अक्षरशः गगनाला भिडले आहेत. यावर उपाय म्हणून सरकारने पब्लिक सिक्‍युरिटी ऑर्डीनन्स काढला आहे. त्यानुसार आता जीवनावश्यक वस्तूंचा साठा करता येणार नाही. यात तांदूळ, साखर, कांदे आणि बटाटे अशा गोष्टींचा देखील समावेश आहे.

देशाच्या सरकारने आणीबाणी लागू झाल्यानंतर एका माजी आर्मी जनरल यांना कमिश्नर म्हणून नियुक्त केलयं. त्यानुसार सैन्याला काही विशेष अधिकार मिळाले आहेत. कमिश्‍नर म्हणून आता त्यांच्याकडे ज्या व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी मालाची साठवणूक केलीय त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार प्राप्त झालाय.

सोबतचं जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रित करण्याचे अधिकार देखील मिळाले आहेत. म्हणजे काय तर सरकारने जे दर ठरवले आहेत, त्याच किंमतीने वस्तूंची विक्री होत आहे का? किंवा जी किंमत वस्तू आयात होतेवेळी कस्टमवर ठरवली जात आहे त्याच किंमतीवर वस्तूंची विक्री होतीय का? यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी आहे.

कांदे आणि बटाट्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ

श्रीलंकेमध्ये मागच्या काही दिवसांमध्ये साखर, तांदूळ, कांदे, बटाटे अशा जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. दूध पावडर, रॉकेल, गॅस अशा वस्तूंच्या तुटवड्यामुळे स्टोअर्सच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं पहायला मिळत आहे. चलन दरातील घटासोबतच कोरोना काळात जगभरात वस्तूंच्या किंमती वेगाने वाढल्या आहेत. सरकारकडून या परिस्थितीला साठेबाजांना देखील जबाबदार धरण्यात आलं आहे.

७.५ टक्क्यांपर्यंत रुपया घसरला….

श्रीलंकाई रुपयांमध्ये यावर्षी अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७.५ टक्के घसरण झाली आहे.

सेंट्रल बँक ऑफ श्रीलंकाने अलीकडेच हि घसरण रोखण्यासाठी व्याज दरांमध्ये देखील वाढ केली होती. बँकेकडून माध्यमांना देण्यात आलेल्या माहितीनुसार, श्रीलंकेची परकीय गंगाजळी जुलै महिन्याच्या शेवटीपर्यंत २.८ बिलियन डॉलर पर्यंत खाली आली होती. हीच परकीय गंगाजळी नोव्हेंबर २०१९ पर्यंत ७.५ बिलियन डॉलर इतकी होती.

त्यावेळी श्रीलंकेमध्ये नवीन सरकार सत्तेमध्ये आले होते, आणि तेव्हापासून आजपर्यंत रुपयाच्या किमतीमध्ये तब्बल २० टक्क्यांची घसरण झालीय.

पर्यटन उद्योग देखील डबघाईला….

श्रीलंका खाद्य पदार्थ आणि इतर सामानाची निर्यात करतो. सोबतच भली मोठी लाभलेली किनारपट्टी आणि त्या माध्यमातून चालणारे पर्यटन हा श्रीलंकेच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. यातूनच श्रीलंकेला मोठ्या प्रमाणावर परदेशी चलन देखील मिळत असते. मात्र मागच्या जवळपास दीड वर्षांपासून आलेला कोरोना आणि त्यातून आलेले निर्बंध यामुळे श्रीलंकेमधील पर्यटन उद्योग पूर्णपणे डबघाईला आला आहे.

या क्षेत्रात मोठा फटका बसल्यामुळे लंकेच्या अर्थव्यवस्थेमध्ये मागच्या वर्षी ३.६ टक्के घसरण झाली होती. आता दीड वर्षानंतर देखील श्रीलंकेमधील कोरोनाचे संकट टळलेले नाही. सध्या श्रीलंकेमध्ये कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे १६ दिवसांचा कर्फ्यू लावण्यात आला आहे. त्यामुळे या पुढच्या काळात जनतेला वाढत्या महागाईमुळे त्रास सहन करायला लागू नये म्हणून सरकारकडून पावलं उचलली जात आहेत.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.