श्रीमान योगी डोक्यावर ठेवून वाजत गाजत मिरवणूक काढली व लेखकाला सोन्याचं कडं बक्षीस दिलं

महाराष्ट्राच राजकारण जरी इरसाल म्हणून ओळखलं जात असलं तरी इथले पुढारी साहित्य कला संस्कृतीचे रसिक मानले जातात. अगदी पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांच्या पासून ते विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे यांच्या पर्यंत हि परंपरा चालत आलेली आहे.

याच परंपरेचा भाग होते कराडचे बाळासाहेब देसाई.

बाळासाहेब देसाई म्हणजे स्वातंत्र्यलढ्याच्या काळापासून काँग्रेसमध्ये सक्रिय असणारे नेते. यशवंतराव पहिल्यांदा द्विभाषिक राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात बाळासाहेब देसाई सार्वजनिक बांधकाम मंत्री बनले होते, महाराष्ट्राचे पहिले शिक्षण मंत्री म्हणून त्यांना ओळखलं गेलं. आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत थेट मोरारजी देसाई यांच्या सारख्या तगड्या नेत्याशी भांडून महाराष्ट्राला न्याय मिळवून देणारा नेता म्हणून बाळासाहेबांना ओळखलं जायचं.

वसंतराव नाईक यांच्या ऐवजी त्यांचीच मुख्यमंत्रीपदी निवड होईल अशी चर्चा होती पण विदर्भ मराठवाड्याला न्याय मिळावा म्हणून यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्याकडे शब्द टाकला व बाळासाहेब देसाईंनी पडती बाजू घेत गृह मंत्रिपद स्वीकारलं.

बाळासाहेब देसाई यांना राज्यभरात काँग्रेसची मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखलं जायचं. पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व करणाऱ्या या रांगड्या राजकारण्याच्या मनात मात्र साहित्यिकांबद्दल आस्था व हळवी बाजू होती. आचार्य अत्रे, वि.स.खांडेकर अशा अनेक दिग्गज लेखकांशी त्यांचे मैत्रीचे संबंध होते. मात्र त्यांचे जवळचे सहकारी म्हणून ओळखले जायचे स्वामीकार रणजित देसाई.

रणजित देसाई हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातल्या कोवाड गावचे इनामदार. घरात संपन्नता नांदत होती पण रणजित देसाई यांना मराठेशाहीच्या इतिहासाने भुरळ घातली. त्यांनी श्रीमंत माधवराव पेशवे यांच्यावर लिहिलेली स्वामी ही कादंबरी मराठी साहित्यात मानदंड म्हणून ओळखली गेली. स्वामी नंतर रणजित देसाई कर्णावर राधेय हि कादंबरी लिहीत होते.

एक दिवस त्यांची लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्याशी भेट झाली. बाळासाहेब त्यांना म्हणाले,

“रणजित सध्या काय लिहिताय ? छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचं लेखन आपण करावं ही आमची इच्छा आहे. “

शिवरायांचे चरित्र लिहिणे हि खरं तर प्रचंड मोठी जबाबदारी होती. ती आपल्याला पेलवेल का हीच रणजित देसाई यांना शंका होती. त्यामुळे या आधी मनात विचार येऊनही त्यांनी शिवचरित्र लिहिण्याचं धाडस केलं नव्हतं. कादंबरी लिहिताना आपल्या हातून एखादी आगळीक घडेल का याची त्यांना चिंता वाटत होती. तरी ते गंमतीने बाळासाहेबांना म्हणाले,

मी कादंबरी लिहिली तर तुम्ही मला काय देणार?

तेव्हा क्षणाचाही विलंब न लावता बाळासाहेब देसाई त्यांना म्हणाले,

“रणजित तुमची कादंबरी लिहून झाली कि तिचे हस्तलिखित डोक्यावरून वाजत गाजत मुंबईच्या शिवाजी पार्कवर नेईन आणि तुमच्या हातात सोन्याचं कड घालीन.”

रणजित देसाई यांना जाणवलं कि आपल्या शिरावर कोणती महत्वाची जबाबदारी येऊन पडली आहे. अखेर त्यांनी मनाची तयारी करून शिव चरित्रावरील कादंबरी लिहायला घेतली. तब्बल चार वर्षे लागली. संपूर्ण महाराष्ट्रात फिरून सन्दर्भ गोळा केले, अनेक इतिहासकारांच्या भेटी घेतल्या. शिवकालीन कागदपत्रे तपासली. दरम्यानच्या काळात बाळासाहेब देसाई यांचा पाठपुरावा सुरूच होता.

अखेर चार वर्षांच्या मेहनतीने रणजित देसाई यांनी हि ऐतिहासिक कादंबरी पूर्ण केली.

त्याला नाव दिलं, श्रीमान योगी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर लिहिलेली ही त्याकाळातली पहिलीच कादंबरी असावी. सुप्रसिद्ध लेखक नरहर कुरुन्दकर यांनी या पुस्तकाची प्रस्तावना लिहिली. रणजित देसाई यांनी पुस्तकाच्या सुरवातीला गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांच्या आग्रहामुळे हे साहित्यशिल्प साकार झाले याचा स्पष्ट उल्लेख केला.

जेव्हा या कादंबरीचं हस्तलिखित दाखवण्यासाठी रणजित देसाई बाळासाहेबांच्या घरी गेले. तेव्हा हर्षातिरेकाने बाळासाहेब देसाईंनी त्यांना मिठी मारली. ते म्हणाले,

रणजित आज तू माझ्या घरी आलास, तुझ्या स्वागताला मी आलो. पण मी जर आज राज्याचा मुख्यमंत्री असतो तर हत्तीवरून वाजत गाजत आपली मिरवणूक काढली असती.

बाळासाहेबांना आपले शब्द लक्षात होते. त्यांनी खरोखरच रणजित देसाई यांची मुंबईत मिरवणूक काढली. आपल्या डोक्यावर श्रीमान योगीच हस्तलिखित ठेवून ते शिवाजी पार्क येथे पोहचले. अनेक साहित्यिक इतिहास संशोधक हजर असलेल्या या समारंभात श्रीमान योगींचे प्रकाशन करण्यात आले. रणजित देसाई यांना  गृहमंत्र्यांनी स्वतःच्या हाताने सोन्याचे कडे चढवले व त्यांचा सन्मान करण्यात आला. छत्रपतींचे चरित्र लिहिल्याबद्दल शिवभक्त रसिकांची हि बिदागी होती.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.