शिक्षा म्हणून झालेल्या बदलीत असं काम केलं की अखेर मुख्यमंत्र्यांना येऊन शाबासकी द्यावी लागली

माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील म्हणजे अजातशत्रू व्यक्तिमत्व. सातारच्या राजकारणात उदयन महाराजांचा पराभव करणारे खासदार म्हणून त्यांना ओळखलं जातं. आपल्या रांगड्या भाषणांनी आणि दिलदार स्वभावामुळे जनतेचे ते लाडके नेते म्हणून प्रसिद्ध आहेत.

पण राजकारणातील वादळी इनिंग खेळण्यापूर्वी ते महाराष्ट्रातील एक कर्तबगार सनदी अधिकारी होते याची अनेकांना कल्पना नसते.

मूळचे कराडच असलेले श्रीनिवास पाटील यांचं महाविद्यालयीन शिक्षण पुणे इथे झालं होतं. एसपी कॉलेजमध्ये शिकत असताना त्यांची ओळख विद्यार्थी नेता असलेल्या शरद पवार यांच्याशी झाली. त्यांच्याशी झालेल्या मैत्रीतून श्रीनिवास पाटील विद्यार्थी चळवळीत ओढले गेले. शिक्षणानंतर राजकारणात जाण्याचा त्यांचा विचार होता मात्र यशवंतराव चव्हाण व इतर काही नेत्यांनी त्यांना आधी सरकारी नोकरी करण्याचा सल्ला दिला.

जात्याच स्कॉलर असणाऱ्या श्रीनिवास पाटील यांनी एमपीएसची परीक्षा चांगल्या गुणांनी पास केली आणि थेट डेप्युटी कलेक्टर बनले.

सुरुवातील करवीर, हिंगणघाट, संगमनेर इथे प्रांताधिकारी म्हणून काम केले होते. संगमनेरमध्ये असताना त्यांची संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक ही विशेष जबाबदारी देण्यात आली होती. या कामाचा फायदा त्यांना पुढे होणार होता.

१९७५ साली शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना एकदा नगर जिल्ह्याच्या दौ-यावर आले होते. त्यावेळी संगमनेरमध्ये प्रांत अधिकारी असणाऱ्या श्रीनिवास पाटील यांचा त्यांच्या उत्तम कार्याबद्दल एका जाहीर कार्यक्रमात फेटा बांधून, शाल, श्रीफळ भेट देऊन  विशेष सत्कार केला होता. या तरुण अधिकाऱ्याची कर्तबगारी मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात भरली होती.
शंकरराव चव्हाण मुंबई येथे परतले तेव्हा काही दिवसातच त्यांनी श्रीनिवास पाटलांना “मुख्यमंत्री कार्यालयात काम करणार का?” अशी विचारणा देखील केली पण पाटलांनी त्यांना नम्र पणे नकार कळवला होता.

१९७९ ला भारतीय प्रशासकीय सेवेसाठी त्यांची पदोन्नती झाली आणि MIDC चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे १९८५ पर्यंत ते याच पदावर होते. तेव्हा मुख्यमंत्री असणाऱ्या वसंतदादा पाटील यांनी आग्रहाने श्रीनिवास पाटील यांची नेमणूक साखर आयुक्त म्हणून केली.

महाराष्ट्राच्या साखर उद्योग आणि सहकारी चळवळीच्या दृष्टीने हे अत्यंत महत्वाचे असे पद. खरे तर श्रीनिवास पाटील हे पद सांभाळण्याच्या दृष्टीने अजून ज्युनिअर होते. इतर जेष्ठ अधिकाऱ्यांनी याबद्दल ओरड सुरु केली होती. वसंतदादा स्वतः सहकाराचे जाणते होते. त्यांनी यशवंतराव मोहिते यांच्या सल्ल्याने श्रीनिवास पाटलांची नेमणूक केली.

श्रीनिवास पाटलांनी दादांचा विश्वास सार्थ ठरवला. साखर संचालक पदाची अवघड जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार उचलली.

पण हा काळ राजकीय अस्थिरतेचा होता. प्रदेशाध्यक्षपदाच्या मुद्द्यावरून वसंतदादा पाटलांनी राजीनामा दिला. शिवाजीराव निलंगेकर पाटील यांच्या अल्प कारकिर्दीनंतर शंकरराव चव्हाण पुन्हा सत्तेत आले. खरे तर महाराष्ट्राच्या राजकारणात तेव्हा निरनिराळे गट होते. बंडखोर शरद पवार नुकतेच काँग्रेसमध्ये परतले होते. तर आधीच काँग्रेसमध्ये शंकरराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील असे दोन गट होते.

वसंतदादा आणि शंकरराव चव्हाण यांच्यातील वाद तर खूप जुना होता. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील कारभारावर शंकरराव चव्हाणांचे आक्षेप होते. यातूनच दोन्ही गटांचे वाद टोकाला गेले होते.

याचा फटका साखर संचालक असणाऱ्या श्रीनिवास पाटलांना बसला. ते शरद पवार यांचे कॉलेज जीवनापासूनचे मित्र आहेत हे सर्वाना ठाऊक होतं, शिवाय वसंतदादा पाटलांचे ते दूरचे नातेवाईक देखील होते. यामुळेच श्रीनिवास पाटलांच्याकडे पाहण्याचा शंकरराव चव्हाण गटातील मंडळीचा दृष्टिकोन  वेगळा होता.

एकदा साखर संचालक म्हणून श्रीनिवास पाटलांनी दिलेल्या एका निर्णयावरून वाद झाला. हेच कारण पुढे करून त्यांना साखर संचालक पदावरून हटवावे असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरण्यात आला. अखेर शंकरराव चव्हाण यांनी त्यांची बदली बीडला जिल्हाधिकारी म्हणून केली. साखर संचालक पदावरून बीडला झालेली बदली हि त्याकाळी शिक्षा म्हणून मानली गेली.

श्रीनिवास पाटील ही बदली स्विकारण्यापेक्षा दीर्घकालीन रजेवर जातील किंवा थेट राजीनामा देतील असाच अनेकांचा समज झाला होता.

सनदी नोकरदाराने कुठेही आणि कोणत्याही परिस्थितीत काम करण्याची तयारी ठेवली पाहिजेल ही भूमिका राहिल्याने श्रीनिवास पाटील सगळे समज गैरसमज खोटे ठरवत बीड येथे रुजू झाले.

नियुक्ती झाल्यावर दोन दिवसातच बीडचे तत्कालीन पालकमंत्री अशोकराव पाटील व इतर आमदारांसोबत त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयात  मिटिंग पार पडली. अशोकराव पाटील हे शंकरराव चव्हाण साहेबांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जायचे. मिटिंगमध्येच पालक मंत्र्यांनी सांगितले की,

आम्हाला थेट शंकरराव चव्हाण साहेबांनी निरोप दिला आहे की तुम्हाला उत्तम असा जिल्हाधिकारी दिलेला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांचा योग्य तो उपयोग करून घ्या.

पुढे दोन-तीन महिन्यातच साखर आयुक्तालयाच्या वादग्रस्त प्रकरणात श्रीनिवास पाटलांनी घेतलेला निर्णय योग्य होता याचा निर्वाळा थेट सुप्रीम कोर्टाने दिला आणि सर्व वादावर पडदा देखील पडला. श्रीनिवास पाटील मात्र बीड मध्ये रुळले. तिथे त्यांनी विकासकामांचा धडाका उडवून दिला. अनेक प्रलंबित कामे मार्गी लावली.

मुख्यमंत्र्यानी खरोखर कार्यक्षम अधिकारी दिला आहे याची बीडकरांना खात्री पटली. 

तीन-चार महिन्यांनी औरंगाबादला विभागातील जिल्हाधिका–यांची एक बैठक झाली होती. त्या बैठकीसाठी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण साहेब देखील उपस्थित होते. बैठकीनंतर त्यांनी श्रीनिवास पाटलांना एकट्याला बोलावून घेतलं आणि म्हणाले,

 “श्रीनिवासराव तुम्ही बीडला चांगले काम करतायं असे मला सर्व आमदारांनी सांगितले आहे.”

Good, keep it up! असे म्हणत त्यांनी श्रीनिवास पाटील यांना शाब्बासकी दिली. ज्या अधिकाऱ्याला आपण शिक्षा म्हणून पाठवलं तो अधिकारी कर्तबगारीने सिद्ध करतोय याच त्यांना कौतुक होतं. यावरून चव्हाण साहेब हे कडक शिस्तीचे जरी असले तरी आपल्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन देणारे ते दिलदार मुख्यमंत्री सुध्दा असल्याचे दिसून आले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.