आत्ता शिराळशेट कुणी करत नाही, ही प्रथा तर हल्लीच्या पिढीला माहिती पण नाही..

नागपंचमी आली की आम्हाला लय भारी वाटायचं. कारण नाग पंचमीच्या दुसऱ्या दिवशी शिराळशेट यायचा. यायचा म्हणजे आपणच करायचा. गल्लीच्या कोपऱ्यावर, चौकात, जागा मिळेल तिथे. पण सगळ्यांना दिसेल असा. 

शिराळशेट करायला लागायचं काय?

तर चिखल, दोन मडकी. त्यातलं एक मोठं आणि दुसरं लहान. नारळाच शेंड्या रिकामी दारुची बाटली आणि एक नळी.

चिखल, मडकी मदतीनं मग आम्ही कोपऱ्यावर शिराळशेट तयार करायचो. सगळी कपडे चिखलानं माखायची. आमची तोंडही. अगडबंब शिराळशेट राजासारखा चौकात आसनस्थ व्हायचा. खाली मोठं मडकं. हे त्याचं पोट. वर लहान मडकं. हे त्याचं तोंड. या सगळ्या ऐवजाला चिखलानं लिपून माणसाचा आकार आणायचा. हात, पाय तार करायचे. त्याच्या एका हातात दारुची बाटली आणि दुसरा हात सिगार ओढताना असतो तसा तोंडावर. मोठ्या मडक्यात नारळाच्या करवंट्या आणि शेंड्या पेटवून टाकायच्या. मग शिराळशेटच्या तोंडातून, म्हणजे नळीतून धूर यायचा. लय मज्जा यायची हे सगळं करताना. 

कारण माहित नव्हतं या प्रथेमागचं. पण भारी वाटायचं. विशेष म्हणजे शाळेला दांडी मारून चिखलात खेळता यायचं. 

कोल्हापूर, सांगली भागातला हा शिराळशेट पुण्यासारख्या ‘सुशिक्षित’ गावात गेला की श्रीयाळशेट व्हायचा. पण हे समजाला लय वर्ष जावी लागली. एकदा पुण्यात श्रीयाळशेट चौक बघितला आणि लक्षात आलं की श्रीयाळशेट म्हणजेच आपला शिराळशेट हाय ते. 

आता शिराळशेट कुणी करत नाही. आजच पिढीला तर असला काही प्रकार असतो तेच माहिती नाही. 

कोण हा शिराळशेट?

मुळात शिराळशेट असं काही नाही. आहे म्हणजे होता तो श्रीयाळशेट. कुणी विद्वान त्याला शिगारशेट असंही म्हणतो. कोल्हापुरात कशाचाही अपभ्रंश होतो. म्हणजे पद्धतच आहे ती आमच्याकडे. 

तर विषय शिराळशेटचा म्हणजे श्रीयाळशेटचा…

गोष्ट लय जुनी. म्हणजे 14 व्या शतकातली. तेव्हा बहामणी राजाचं राज्य होतं. म्हणजे आताच्या उत्तर कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बहुतांश भागात. श्रीयाळशेट रहायचा आताच सीमेवरच्या एका गावात. गडी सावकार. सावकारीतनं बख्खळ पैसा कमावला त्यानं. पण कुणाच्या नरड्यावर पाय ठेवून नाही. सावकारी केली पण ती प्रामाणिकपणानं. अडल्यानडल्याला मुक्तहस्ते मदत करायचा तो. घरी मोठी सुबत्ता. धान्याची कोठारं…

सलग 12 वर्ष पडलेल्या दुष्काळात ही कोठारं त्यानं गरीबांसाठी रिती केली. दोनवेळचं खाण्याचे वांदे झालेल्यांसाठी देवच होता तो. 

त्याची ही कीर्ती सगळीकडं पसरली होती. राजानं एकदा त्याला बोलावून घेतलं. तुझं काम खूप चांगलं आहे. माग म्हणाला हवं ते. शिराळशेटनं विचार केला. म्हणाला मला फक्त साडेतीन तासांसाठी राजा कर. राजा म्हणाला, केला तुला राजा. पण शिराळशेटनं एक अट घातली. मी राजा झाल्यावर साडेतीन तासात जे काही निर्णय घेईन ते तुला बदलता येणार नाहीत.

बहामणी सम्राट थोडा विचार करून त्यालाही तयार झाला. त्याला वाटलं शिराळशेट करून करून काय करेल.काही एकर जमिन करून घेईल आपल्या नावावर. आपल्याकडं तर लाखो एकर जमिन आहे. 

ठरल्यानुसार शिराळशेटला साडेतीन तासांसाठी राजपद देण्यात आलं. साडेतीन तासांच्या आपल्या राज्यकारभारात शिराळशेटनं सगळे कर रद्द करण्याचा निर्णय घेतला. राजाला काही बोलता आलं नाही. योगायोगानं त्याच रात्री शिराळशेटचं निधन झालं. 

बादशहाने शिराळशेटच्या मुलाला सरकारकी बहाल केली. त्यानंतर श्रावण शुद्ध षष्ठीला शिराळशेठच्या प्रतिमेची पूजा केली जावू लागली. आदल्या दिवशी कुंभाराकडे पाट दिला जात असे त्या पाटावर कुंभार शिराळशेठची बैलावर असलेली प्रतिमा, शिराळशेटपुढे त्याचा श्वान व घरातील मंडळी असा देखावा करत. करडीच्या बिया, पताका इत्यादी गोष्टींची आरास केलेली असते. व संध्याकाळी विसर्जन केले जात असे.

  • भिडू शिवराज भोसले 

हे ही वाच भिडू 

3 Comments
  1. Vinayak says

    सोलापूर मधये अक्कलकोट साइडला अजून पण करतात. माझ्या लहानपणी शहरात पण करायचे.

  2. Vivek says

    Punyamadhe attahi rastapeth baghat shiyalshet rajachyi nagpanchamichya dusrya divshi jatra bharte.

  3. chetan velhal says

    Amcha ghari ajun karatat shirashet.. photo pathawu ka

Leave A Reply

Your email address will not be published.