मराठी सिनेमाला ऑस्कर मिळावा म्हणून शाळकरी मुलांपासून बच्चनपर्यंत सर्वांनी मदत उभी केली…

हा सिनेमा इतिहास घडवेल या गोष्टीची कोणालाही कल्पना नव्हती. तो काळ मराठी सिनेमांसाठी यथा तथा होता. मराठी सिनेमे प्रदर्शित होत होते. पण हवं तसं यश मिळत नव्हतं. मराठी सिनेसृष्टीला आलेली ही मरगळ झटकण्याचं काम केलं ‘श्वास’ सिनेमाने. २००४ साली प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने भारतीय सिनेसृष्टीत स्वतःचं अढळपद निर्माण केलंच , शिवाय ऑस्कर पर्यंत मजल मारली.

परंतु जेव्हा श्वास ऑस्कर ला गेला, तेव्हा मात्र सिनेमाला अनेक आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यावेळी श्वास ला खऱ्या अर्थाने आर्थिक पाठबळ देण्यासाठी संपूर्ण भारत देश जणू एकवटला होता. काय होता तो किस्सा ?

श्वास मागची कथा :

अरुण नलावडे यांनी मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टी मध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याच वेळी विश्वनाथ नायक यांनी अरुण नलावडे यांना सिने निर्मिती करण्याविषयी सुचवले. अरुण नलावडे यांना कल्पना आवडली. अरुण नलावडे सिनेमासाठी कथा शोधायला लागले. एका दिवाळी अंकात माधवी घारपुरे या लेखिकेची एक कथा अरुण नलावडे यांच्या वाचण्यात आली.

पुण्यातील एका सत्य घटनेवर ही कथा आधारीत होती.

याच कथेवर एक उत्कृष्ट सिनेमा होऊ शकेल, ही शक्यता अरुण नलावडे यांच्या मनात आली. शुभस्य शिघ्रम म्हणत अरुण नलावडे यांनी सिनेमाच्या निर्मितीला सुरुवात केली. सिंधुदुर्ग, पुणे आणि मुंबईतील KEM हॉस्पिटल येथे ३० दिवसात सिनेमाचं शुटिंग संदीप सावंत यांनी पूर्ण केलं. आणि अशाप्रकारे ‘श्वास’ रुपेरी पडद्यावर साकार झाला.

कौतुकाचा वर्षाव :

संदीप सावंत दिग्दर्शित श्वास २००४ साली सर्वत्र प्रदर्शित झाला. सिनेमात एकही गाणं नव्हतं. कोणताही प्रसिध्द चेहरा नव्हता. तरी सुद्धा उत्कृष्ट कथा आणि कलाकारांनी केलेला दर्जेदार अभिनय, यामुळे श्वास ला मराठी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं.

अरुण नलावडे यांचे आजोबा, संदीप कुलकर्णी यांनी रंगवलेले डॉक्टर, अमृता सुभाषने साकारलेली सोशल वर्कर आणि अश्विन चितळे या बालकलाकाराने व्याधीग्रस्त मुलाची केलेली भूमिका. या सर्व कलाकारांचा अभिनय फर्मास जमून आला होता. महाराष्ट्र राज्य शासनाचे अनेक पुरस्कार श्वास सिनेमाला मिळाले. तसेच २००३ सालच्या नॅशनल अवॉर्डस् मध्ये श्वास ला सर्वोत्कृष्ट सिनेमा आणि अश्विन चितळे ला सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवण्यात आले.

विशेष गोष्ट म्हणजे श्यामची आई नंतर जवळपास ५० वर्षांनी एका मराठी सिनेमाने राष्ट्रीय पुरस्कारावर स्वतःची छाप पाडली.

ऑस्कर साठी झालेली निवड आणि सर्वांनी केलेली मदत :

राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरून २००४ साली ७७ व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात परदेशी सिनेमांच्या वर्गवारीत भारताकडून श्वास सिनेमाची निवड करण्यात आली. भारतासाठी आणि विशेषतः महाराष्ट्रासाठी ही अत्यंत अभिमानाची गोष्ट होती. एका मराठी सिनेमाची ऑस्कर सारख्या जागतिक आणि मानाच्या पुरस्कार सोहळ्यात दखल घेण्यात आली.

ऑस्कर साठी श्वास सिनेमाची संपूर्ण टीम परदेशी रवाना झाली. परंतु तिथे गेल्यावर टीमला सिनेमाच्या स्क्रिनिंग आणि प्रमोशन साठी प्रचंड आर्थिक अडचणी आल्या. हे जेव्हा कळलं, तेव्हा भारतातील सर्व वर्गातील लोकं मदतीसाठी पुढे सरसावले.

जोगेश्वरी मधील एका शाळेने एक उपक्रम राबवला. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी दिवे बनवून त्यांची विक्री केली. या विक्रीतून जे ३०,००० रुपये गोळा झाले ते त्यांनी श्वास सिनेमाच्या मदतीसाठी दिले. नाशिक येथील एका शाळेतील विद्यार्थ्यांनी प्रत्येकी १० रुपये गोळा केले. शाळेतील शिक्षकांनी सुद्धा मुलांना मदत केली. यातून जमा झालेले १००१ रुपये त्यांनी दान केले.

त्या दरम्यान मराठी रंगभूमीवर गाजत असलेल्या ‘यदा कदाचित’ नाटकाने प्रयोगातून ६५,००० रुपये कमावले. आणि ही रक्कम श्वास साठी दिली.

श्वास ला ऑस्कर साठी आर्थिक अडचण आली आहे हे कळल्यावर, अनेक नामवंत व्यक्ती सुध्दा पुढे आल्या. सचिन तेंडुलकरने त्याच्या एका बॅटचा लिलाव करून मिळालेली रक्कम श्वास साठी दिली. यासाठी शिवसेनेने त्याच्यावर टीका केली तो मुद्दा वेगळा. अमिताभ बच्चन यांनी १ लाख रुपये श्वास च्या टीमला दिले.

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराबाहेर श्वास च्या टीमला मदत करण्यासाठी देणगी पेटी ठेवण्यात आली.

गोवा सरकारने २१ लाख आणि महाराष्ट्र सरकारने १५ लाखांची मदत केली. सिनेमाचं प्रमोशन होण्यासाठी शिवसेना पुढे सरसावली. दिग्दर्शक संदीप सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अमेरिकेत असणाऱ्या महाराष्ट्रीयन लोकांना श्वास बघण्याविषयी संबोधित केले. या सगळ्यांनी न्यू जर्सी येथील महाराष्ट्र विश्व परिषदेतील तब्बल १२००० लोकांना श्वास विषयी सांगितले. श्वास सिनेमा १४ वेळा तेथील लोकांना दाखवण्यात आला. श्वास सिनेमाच्या संपूर्ण टीमने प्रचंड मेहनत केली. परंतु शेवटी अपयश आले. श्वास ला सहावा रँक मिळाला.

केवळ एका रँक मुळे श्वास ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी निवडण्यात आला नाही.

असं जरी असलं तरी श्वास सिनेमाच्या संपूर्ण टीमने प्रामाणिक प्रयत्न केले होते. मराठी सिनेमाची इंटरनॅशनल स्तरावर दखल घेतली गेली. आणि श्वास मुळे मराठी सिनेमाचं महत्त्व सर्वांना कळलं. डबघाईत असणाऱ्या मराठी इंडस्ट्रीला श्वास सिनेमामुळे नवसंजीवनी मिळाली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.