आपण १०० मार्कांसाठी संस्कृत घ्यायचो पण हा व्यक्ती गेली ४३ वर्ष फक्त संस्कृतमध्ये केस लढतोय

कोर्टात वकिलांचे युक्तिवाद ऐकण्यासारखे आणि प्रत्येकाला विचार करायला भाग पाडणारे असतात. वकिलांची स्किलच ही असते बॉस. त्यांची ओळखच असते ती त्यांचा युक्तिवाद. ज्या देशाची जी भाषा असते त्यामध्ये वकील खटले लढत असतात. त्यानुसार भारतात एकतर प्रादेशिक भाषेत नाही तर राष्ट्रीय भाषेत खटले लढवले जातात.

मात्र भारतात एक असा वकील आहे जो संस्कृत भाषेत खटले लढतो. आणि असा तो जगातील एकमेव वकील आहे. यांचं नाव म्हणजे ‘श्याम उपाध्याय’.

सध्या श्याम उपाध्याय हे भारताची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाराणसीला (काशी) राहतात. इथे ते त्यांच्या खटल्यांपेक्षा ज्या भाषेत ते खटले लढतात त्याने जास्त प्रसिद्ध आहेत. गेली ४३ वर्ष झाली श्यामजी संस्कृत भाषेत प्रत्येक खटला लढवत आहेत. याचं कारण आहे, त्यांचं संस्कृत भाषेवर असणारं प्रेम आणि या भाषेप्रती समर्पण.

या श्यामजींना संस्कृत भाषेची गोडी लागली ती त्यांच्या वडिलांमुळे. शिवाय आजन्म संस्कृत भाषेची कास न सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला तो वडिलांच्या ‘एका’ वक्तव्यामुळे!

श्यामजी यांचे वडील म्हणजे स्वर्गीय संगठा प्रसाद उपाध्याय. त्यांनाही संस्कृतचे उत्तम ज्ञान होतं आणि  म्हणूनच श्यामजींना लहानपणापासूनच या भाषेची ओढ होती. ते मूळचे राहणारे मिर्जापूरचे. श्यामजी १० वर्षांचे असताना ते एकदा त्यांच्या वडिलांसोबत कुठे तरी जात होते. वाटेमध्ये त्यांच्या वडिलांना काही लोक मिळाले आणि त्यांचं संभाषण सुरु झालं. त्यांच्या गप्पा भोजपुरी भाषेमध्ये चालल्या. काहीवेळानंतर बोलणं संपल्यावर सगळे जण आपआपल्या रस्त्याला लागले.

श्यामजी त्यांच्या वडीलांसोबत पुढे जात असताना अचानक त्यांच्या वडिलांच्या तोंडून एक वाक्य निघालं, “जर असंच सगळे जण संस्कृत भाषेमध्ये बोलत असते तर किती छान झालं असतं.” हेच वडिलांचं वाक्य श्यामजींच्या जिव्हारी लागलं आणि तेव्हापासून त्यांनी संस्कृत भाषेची साथ न सोडण्याचा निश्चय केला. केवळ चौथीत शिकणाऱ्या श्यामजींचं वडिलांवरचं प्रेम आणि त्यांचं स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द यातून दिसते.

श्यामजींनी मग संस्कृतचं रीतसर शिक्षण घेणं सुरु केलं. सुरुवातीचे शिक्षण त्यांनी गावात पूर्ण केलं आणि नंतर श्यामजींनी संपूर्णानंद संस्कृत विद्यापीठातून बौद्ध तत्त्वज्ञानात आचार्य केलं. त्या काळात, संस्कृतचे महान विद्वान प्रा. जगन्नाथ उपाध्याय त्यांना गुरु म्हणून लाभले. त्यांच्या गुरूंची इच्छा होती की त्यांनी शिक्षक व्हावं. त्यानुसार श्यामजींनी १ वर्ष इथे शिकवले.

मात्र श्यामजींचं मन त्यात लागत नव्हतं. तेव्हा गुरूंची परवानगी घेऊन त्यांनी पुढचं मार्गक्रमण करायला सुरुवात केली. त्यांनी हरिश्चंद्र महाविद्यालयातून एलएलबी पूर्ण केलं. एलएलबीमध्ये त्यांना उत्तम क्रमांक मिळाले. नंतर त्यांनी कोर्टात प्रॅक्टिस सुरू केली. १९७८ मध्ये त्यांनी त्यांचा पहिला खटला लढला आणि यावेळी त्यांनी निवड केली ती संस्कृत भाषेची.

जसा त्यांनी पहिला खटला लढवला तेव्हापासून आजपर्यंत श्यामजी संस्कृतमध्येच खटले लढत आहेत.

कोर्टात फिर्यादी, वाकलतनामा, प्रतिज्ञापत्र, अर्ज इत्यादी सगळ्या गोष्टी श्यामजी संस्कृत भाषेत मांडतात. शिवाय संस्कृतच्या प्रगतीसाठी दरवर्षी ४ सप्टेंबरला संस्कृत दिनही साजरा करतात. यादरम्यान ते ५० वकिलांना पुरस्कार देतात. हा सगळं त्यांचा खटाटोप आहे तो संस्कृत भाषेच्या प्रेमापोटी. त्यांच्या या प्रेमानेच त्यांना आज जगभरात नावलौकिक मिळवून दिलं आहे. 

एखादी गोष्ट करणारा ‘जगातील एकमेव व्यक्ती’च्या लिस्टमध्ये त्यांनी स्वतःचं नाव कोरलंय. त्यांच्या या संस्कृतवरील प्रेमाबद्दल भारत सरकारने त्यांना ‘संस्कृत मित्र पुरस्काराने’ सन्मानित केलं आहे.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.