चौगुलेंची शॅंपेन बाळासाहेब ठाकरेंना देखील आवडायची..

दारू म्हणजे विष समजल्या जाणाऱ्या देशात खुलेआम हातात वाईनचा ग्लास घेऊन मुलाखत देणारा नेता म्हणजे बाळासाहेब ठाकरे. आजवर भारतात राजकारणी म्हणजे जो काही टिपिकल ठसा होता तो बाळासाहेबांनी आपल्या बिनधास्त वागण्याने खोडून टाकला. आपल्या चांगल्या वाईट सवयी त्यांनी कधी लपवल्या नाही. सिगार आणि हनिकेन बियर या दोनच गोष्टी आपल्या वीक पॉईंट आहेत हे ते मान्य करायचे.

राजकारणाच्याही आधी एक जगद्विख्यात कलाकार असणारे बाळासाहेब अस्सल गोष्टीचे भोक्ते होते. उगाच स्टाईल मारण्यासाठी परदेशी उंची मद्य पिणे देखील त्यांना मान्य नव्हतं. त्यांचं जस मराठी मातीवर प्रेम होतं तस एका मराठी शॅंपेन वर देखील प्रेम होतं.

ती शॅंपेन बनवली होती शामराव चौगुले यांनी.

करवीर तालुक्यातील नांदगाव येथे सामान्य शेतकरी कुटुंबात शामराव चौगुले यांचा जन्म झाला.  घरची परिस्थिती हलाखीची होती. वयाच्या पंधराव्या वर्षापर्यंत त्यांनी कधी रेल्वे देखील पाहिली नव्हती.कष्टाने शिकायचं आणि मोठं व्हायचं एवढंच स्वप्न त्यांनी पाहिलं होतं. इंजिनियरिंग करावं एवढी परिस्थिती नव्हती. पडेल ते काम केलं आणि व्यवहारातून शिक्षण घेत गेले.

त्यांचं पायलट व्हायचं स्वप्न देखील अधुरं राहिलं. अखेर नारायणगावला आले आणि कॉन्ट्रॅक्ट घेऊन सिव्हिलची कामे करण्यास सुरवात केली. यातूनच पीडब्ल्यू डीची कामे देखील मिळत गेली. मेहनत आणि हुशारी यातून त्यांच्या इंजिनियरिंग कंपनीचा जम बसला. पैसे देखील येत गेले. फॉरेनला येणं जाणं सुरु झालं.

अशाच एका ट्रीपसाठी ते पॅरिसला गेले होते. तिथे त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा शॅम्पेन ट्राय केली. जगाच अमृत समजल्या जाणाऱ्या फ्रेंच वाईन आणि शॅंपेनने त्यांना वेड लागायची पाळी आली. पिण्यातले ते दर्दी होतेच पण बिझनेस माईंड असल्यामुळे डोक्यात चक्रदेखील सुरु झाली.

चौगुलेंच्या डोक्यात आलं कि भारताच्या जवळपास सत्तर टक्के द्राक्ष पीक एका महाराष्ट्रात पिकते. यातलं फक्त एखादा टक्के द्राक्ष वाईन बनवण्यासाठी वापरतो. सगळा अस्सल एक नंबरचा माल मराठी माणूस खाऊन संपवतो. याचा कमर्शियल कसा वापर करता येईल याच दिशेने चौगुले विचार करू लागले.

यातूनच १९८२ साली त्यांनी वाईनच्या निर्मिती उतरायचं ठरवलं. कारखाना पुणे नाशिक रोड वरील नारायणगाव मध्येच घातला.

श्यामराव चौगुलेनी ठरवलेलं,

साधी वाईन बनवायची नाही तर भारतातली पहिली शॅंपेन बनवायची.

नाव देखील दिलं शॅंपेन इंडिया लिमिटेड.

हा कारखाना उभारण्यासाठी त्यांनी फ्रेंच कन्सल्टंटची मदत घेतली. Piper Heidsieck च्या मदतीने भविष्यात होणाऱ्या कुकडी डॅमच्या परिसरात हा कारखाना उभा राहिला. सुरवातीला शामराव चौगुलेनी पाच मिलियन रुपये गुंतवले होते. २० शेतकऱ्यांशी करार केला, ऐंशी एकरमध्ये पिकणारं द्राक्षे त्यांना पुरवठा होऊ लागले.

गंमत म्हणजे हा कारखाना सुरु तर केला पण तेव्हाच्या लायसन्स राजमुळे चौगुलेंना भारतातच वाईन विक्री करायला परवानगी नव्हती. १९८६ साली चौगुलेनी भारतात विक्री साठी ईण्डेन नावाची नवी कंपनी सुरु केली.

आणि १९८८ साली भारतातील पहिली शॅम्पेन बनवली. नाव दिलं

Marquise de Pompadour

पुढच्या दहा वर्षात चौगुले यांनी कंपनी एवढी वाढवली की वर्षाला दोन लाख पन्नास हजार बाटल्यांची विक्री होऊ लागली. फक्त भारतातच नाही तर युरोपमध्ये देखील चौगुलेंची शॅंपेन निर्यात होऊ लागली. आज जगाच्या पाठीवरच्या प्रत्येक देशात त्यांची शॅम्पेन विकली जाते आणि चवीला फ्रेंच शॅम्पेन च्या तोडीस तोड लागते.

खुद्द बाळासाहेब ठाकरे या मराठी शॅंपेनचे चाहते होते म्हणजे विषयच संपला.

शामराव चौगुले यांनी आपल्या उद्योगामध्ये १ हजारहून अधिक कुटुंबांना रोजगार दिला होता. ते शॅम्पेन इंडेज ग्रुपचे चेअरमन, ऑल इंडिया वाईन मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे संस्थापक व प्रथम अध्यक्ष होते. तसेच कोल्हापुरातील हॉटेल शालिनी पॅलेसचे मालक होते. त्यांचे कोल्हापूरवासीयांचे व येथील अनेक संस्थांचे जिव्हाळ्य़ाचे संबंध होते. केंद्र सरकारच्या ग्रेप्स प्रोसिसिंग बोर्डाचे प्रथम संस्थापक अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे. कोल्हापूर महापालिकेस त्यांनी गजलक्ष्मी हत्तीण भेट दिली होती.

२३ ऑगस्ट २०२० रोजी वृद्धापकाळाने त्यांचं निधन झालं. मराठी द्राक्षाला जगाच्या पाठीवर नेऊन पोहचवणाऱ्या या मद्यसम्राटाचा वारसा आज त्यांच्या पुढच्या पिढ्या समर्थपणे सांभाळत आहेत.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.