‘संस्था बंद करू नका, मी चालवायला तयार आहे’ म्हणतं त्यांनी मराठी अधिकाऱ्यांची फौज उभी केली

स्पर्धा परीक्षा पास होणं हे अनेक मुलांनी आपल्या मनाशी बाळगलेलं स्वप्न, आणि पुणे म्हणजे त्या स्वप्नांना पूर्ण करणाऱ्यांची राजधानी. कधी काळी सामाजिक क्रांतीच केंद्र असलेलं पुणे अलीकडे स्पर्धा परीक्षांसाठीच केंद्र बनलं आहे. अभ्यास करायचा पोस्ट काढायची, आई-वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं, असं सूत्र डोक्यात ठेऊन दरवर्षी हजारो मुलं-मुली MPSC -UPSC करण्यासाठी इथं येतात.

यात मग नुकतंच शिक्षण पूर्ण झालेल्या मुलांपासून ते चांगली नोकरी सोडून येणाऱ्यांपर्यंत अनेक प्रकारची मुलं असतात. स्पर्धा परीक्षा करून अधिकारी होण्याच्या मार्गावर असताना मुलांना अजून एक स्वप्न खुणावत असतं.

ते म्हणजे राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्था अर्थात स्टेट इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर्स म्हणजे SIAC मुंबई या स्पर्धा परीक्षेसाठी प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेत प्रवेश मिळवणं.

SIAC म्हणजे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्रातली एक प्रमुख मार्गदर्शक संस्था. या संस्थेनं जे मॉडेल उभं केलं ते आजही आदर्श मानलं जातं. प्रवेशासाठी परीक्षा घेणं, निवडलेल्या उमेदवारांना वर्षभर मोफत शिकवणी, हॉस्टेल त्या सोबतच विद्यावेतनाची सोय करून देणं, स्पर्धा परीक्षांसाठी लागणारी सगळी पुस्तकं उपलब्ध असणार ग्रंथालय, २४ तास वातानुकुलीन वाचनालय यामुळे विद्यार्थी इथं येण्यासाठी धडपडत असतात.

मात्र ८० च्या दशकात एक वेळ अशी आली होती की, शासनानं ही संस्था गुंडाळून ठेवण्याचा निर्णय घेतला होता, पण नागपूरच्या एका प्राध्यापकामुळे ही संस्था बंद पडण्यापासून वाचली होती. 

महाराष्ट्रासाठी पूर्वीचा काळ म्हणजे आजच्या सारखे विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे करिअर ऑप्शन म्हणून बघत नव्हते. क्वचित जण या मार्गावर यायचे. साहजिकच त्यामुळे प्रशासनात मराठी अधिकाऱ्यांचा टक्का अगदीच नगण्य होता. ही कमी जाणवली तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांना. त्यांच्या मते,

देशाची आर्थिक राजधानी महाराष्ट्रात, देशाच्या आर्थिक नाड्या मुंबईत; पण इथं महाराष्ट्राची लॉबी नाही आणि देशाच्या आर्थिक नाड्यांवर नियंत्रण ठेवेल अशी सनदी अधिकाऱ्यांची फळी नाही. 

ही कमतरता दूर होऊन सनदी अधिकारी म्हणून मराठी तरुण प्रशासनिक सेवांमध्ये यावेत यासाठी १९७६ साली महाराष्ट्र शासनानं पुढाकार घेत राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेची स्थापन केली. शिक्षण संचालकांच्या अधिपत्याखाली पुण्यामध्ये या परीक्षांसाठीचे तयारी वर्ग सुरू केले.

पण पहिल्या तीन वर्षात या संस्थेमधून एकही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन प्रत्यक्ष सनदी सेवेत जाऊ शकला नाही. तेव्हा शासनानं पुण्याचे वर्ग बंद करून मुंबईत प्रत्यक्ष मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र संस्थाच सुरू केली. तिथेही पहिली तीन वर्षे या संस्थेला यश मिळाले नाही.

वाट पाहून देखील पहिली ४ वर्षे निष्फळ ठरल्यानं शासनाने अखेर ही संस्था गुंडाळण्याचा निर्णय घेतला. नागपूरच्या डॉ. श्री. गो. काशीकरांच्या कानावर जेव्हा ही गोष्ट पडली तेव्हा त्यांनी तात्काळ राज्याचे तात्कालीन मुख्य सचिव पी. जी. गवई यांची भेट घेतली आणि म्हणाले,

‘ही संस्था बंद करू नका, मी ती चालवायला तयार आहे’

गवई यांनी लगेच काशीकरांसह तत्कालीन शिक्षणमंत्री सुधाकरराव नाईक आणि शिक्षण सचिव सुकथनकर यांची भेट घेतली. त्या दोघांनीही काशीकरांची सूचना मान्य केली आणि त्यांची या संस्थेच्या संचालकपदी नियुक्ती केली. संस्थेला जीवदान मिळालं. मात्र काशीकरांसमोर मोठं आव्हान होतं.  

डॉ. काशीकर हे उत्तम प्राध्यापक व वक्ते म्हणून नागपूर व अमरावतीत प्रसिद्ध होते. राज्यशास्त्र विषयावरील तज्ञ म्हणून त्यांची ओळख होती. संशोधकवृत्ती, शिस्त, प्रशासकीय कौशल्य आणि हाती घेतलेलं काम तडीस नेण्याची वृत्ती या गुणांना कल्पकतेची जोड देऊन त्यांनी ही संस्था विकसित केली.

ग्रंथालय सुसज्ज केले, वसतिगृह सुधारले, कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त आणली, परीक्षेची तयारी व प्रशिक्षणाची कालबद्ध योजना आखली. आपल्या योजनेची महाराष्ट्रभर जाहिरात करून साठ विद्यार्थ्यांना निवडले. त्यांना विद्यावेतन देऊन संस्थेच्या वसतिगृहात निवासाची व भोजनाची तीन महिने नि:शुल्क व्यवस्था केली. त्यांच्यासाठी दिवसाभराचे वेळापत्रक आखले.

काही महत्त्वाचे विषय शिकविण्यासाठी त्या विषयातील नामांकित तज्ज्ञांना बोलावलं. चर्चा व शंका निरसनावर भर दिला. अनुसूचित जाती व आदिवासी समाजातील तरुणांसाठीही विशेष प्रशिक्षणवर्ग चालवले.

डॉ. काशीकरांच्या प्रयत्नांना यश येऊन अखेर १९८० साली कोंडी फुटली. पहिल्याच वर्षी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये ९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातल्या दोघांना आयएएस केडरही मिळालं. स्थापना झाल्याच्या पहिल्या दहा वर्षांत १५२ विद्यार्थी राज्य प्रशासकीय व्यवसाय शिक्षण संस्थेतून सनदी सेवांमध्ये दाखल झाले. त्यातले १६ आयएएस, २ आयएफएस, आणि २ आयपीएस अधिकारी झाले.

आता जी संस्था बंद पडण्याच्या मार्गावर होती त्या संस्थेचा विस्तार करण्याचा निर्णय डॉ. काशीकरांनी घेतला. १९८५-८६ मध्ये त्यांनी नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर या शहरांतही अशी प्रशिक्षण संस्था उभारण्याची योजना सरकारकडून मंजूर करवून घेतली.

डॉ. काशीकरांमुळे संस्थेला जीवनदान मिळालं. तेव्हापासून मागच्या ४५ वर्षात १ हजार पेक्षा जास्त अधिकारी अधिकारी या संस्थेतून प्रशासनात उच्च पदांवर गेले आहेत. त्यानंतर २०१३ मध्ये अमरावती आणि नाशिकमध्ये देखील संस्थेचा विस्तार कारण्यात आला.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचल्यामुळेच असं म्हणतात की,

महाराष्ट्रातील बहुतेक यशस्वी उमेदवार कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर SIAC मध्ये येऊन गेलेले असतातच!

पुढे निवृत्तीनंतर डॉ. काशीकर यांनी संशोधन, लेखन आणि समाजप्रबोधनाला वाहून घेतलं. विज्ञाननिष्ठेतून त्यांनी ‘हिंदू धर्म फॉर द न्यू मिलेनियम’ हा ग्रंथ लिहिला. त्यांच्या ‘डायलॉग विथ पाकिस्तान’ या पुस्तकाला नागपूर विद्यापीठाने २००८मध्ये डी. लिट. देवून सन्मानित केले होते.

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.