बाकीचे चर्चा करत राहिले, कोल्हापूरकरांनी सियाचीनमध्ये जवानांसाठी हॉस्पिटल उभारलं

गोष्ट आहे १९९९ सालची. भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींशी अमन की आशाच्या गप्पा मारणाऱ्या पाकिस्तानने दगलबाजी केली आणि काश्मीरमध्ये कारगिल हद्दीत घुसखोरी करून युद्ध पेटवले. हा हल्ला आपल्या साठी अनपेक्षित होता.

पण भारतीय सेनादलाने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. सगळा देश आर्मीच्या पाठीशी उभा होता. सैन्याच्या निधीसाठी छोट्या छोट्या शाळकरी मुलांनी देखील आपले खाऊचे पैसे जमा केले होते. आपल्या सुरक्षिततेसाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी प्रत्येक जण आपापल्या परीने मदत करत होता.

कोल्हापूरचे मेजर जनरल शिवाजीराव पाटील यांचा सैन्यात कॅप्टन पदावर असणारा मुलगा विक्रांत पाटील कारगिलच्या युद्धात लढताना सियाचीनच्या रणभूमीवर जखमी झाला.

त्याकाळी सियाचीनमध्ये उपचारासाठी कसलीही सोय उपलब्ध नव्हती. जवानांना उपचारांसाठी एअरलिफ्ट करून खाली चंदीगड गाठावे लागत होते. एका जवानाला उपचारासाठी न्यायचा खर्च सुमारे 50 हजार होत असे. त्या काळात शत्रूच्या गोळीपेक्षा प्रतिकूल अतिथंड हवामानाचा जास्त धोका सैनिकांना होता.

भर हिवाळ्यात सियाचीनचे तापमान शून्याखाली 40 अंशांपर्यंत जाते आणि एरवी शून्याखाली 7 अंशांच्या दरम्यान असते. या सर्वोच्च रणभूमीवर बर्फामुळे होणार्‍या जखमा चिघळून हिमदंशामुळे सैनिकांचा मृत्यू होत असे.

वरिष्ठ लष्करी अधिकारी म्हणायचे,

“हम तोफ के गोलोंसे नहीं लेकिन बर्फ के गोलोंसे ज्यादा डरते है. नेचर कॉजेस मोअर कॅज्युलिटीज दॅन बुलेट.”

मेजर जनरल शिवाजीराव पाटील हे कोल्हापूरच्या पुढारी दैनिकाचे संपादक प्रतापसिंह जाधव यांचे मित्र होते. त्यांच्यामुळे सियाचीनची सगळी परिस्थिती जाधव यांच्या लक्षात आली. पुढारीच्या माध्यमातून त्यांच्या जवळ देखील मोठा कारगिल निधी गोळा झाला होता. या निधीचा योग्य सदुपयोग कसा करायचा याच्या शोधात ते होते. तेव्हा त्यांच्या मनात कल्पना आली की ,

“आपण सियाचीनमध्ये एखाद हॉस्पिटल उभारलं तर !”

त्यांनी त्या भागातील लेफ्टनंट जनरल अर्जुन रे यांसारख्या बर्‍याच लष्करी अधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यातून सियाचीनची रणभूमी किती खडतर आहे, याची अधिक प्रकर्षाने कल्पना आली. प्रतापसिंह जाधव यांचे संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडीस यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांनी थेट फर्नांडीस यांना फोन लावला.

जॉर्ज फर्नांडीस मुंबईमध्ये दीर्घकाळ राहिल्यामुळे त्यांना मराठी चांगले बोलता येत असे. प्रतापसिंह जाधव यांनी त्यांना सियाचीनमध्ये हॉस्पिटल का नाही, अशी विचारणा केली तेव्हा हॉस्पिटल लालफितीत अडकले आहे, अशी वस्तुस्थिती फर्नांडिस यांनी मांडली.

जाधव यांनी त्यांना हॉस्पिटलचे एस्टिमेट पाठवून देण्याची विनंती केली.

काही दिवसांनी पुढारीच्या ऑफिस मध्ये संरक्षण मंत्रालयातून हॉस्पिटलचे एस्टिमेट आले.साधारण अडीच कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. पुढारी वृत्तसमुहातर्फे ५० लाख रुपये घालून सियाचीन हॉस्पिटलसाठी निधी उभारण्यास सुरवात केली. कोल्हापूरकरांनी याला उदंड प्रतिसाद दिला. फक्त कोल्हापुरच नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जिथे जिथे पुढारी वाचला जातो तिथून वाचकांनी शक्य होईल तेवढी मदत पाठवून दिली.

गांधी जयंतीचा मुहूर्त साधून 2 ऑक्टोबर 1999 रोजी केशवराव भोसले नाट्यगृहात अत्यंत भावपूर्ण वातावरणात हा निधी फर्नांडिस यांना सुपूर्द करण्यात आला.

पुढच्या दोन वर्षात विक्रमी वेळेत सियाचीनच्या परतापूर येथे जवानांसाठी १०० बेडचे अत्याधुनिक हॉस्पिटल बनून तयार झाले. स्वित्झर्लंड येथील तंत्रज्ञानाने हे हॉस्पिटल निर्माण केले गेले होते.

जगातील अत्युच्च युद्धभूमीवर बांधलेले हे हॉस्पिटल म्हणजे एक चमत्कार मानला गेला.

१८ नोव्हेंबर २००१ रोजी प्रतापसिंह जाधव व संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडीस यांनी या रुग्णालयाचे उद्घाटन केले. या प्रसंगी बोलताना फर्नांडीस म्हणाले,

“सियाचीन अस्पताल भारतीय सेना के लिए संजीवनी है. आज मैं रक्षामंत्री हूँ, कल रहूँगा या ना रहूँगा, सियाचीन हॉस्पिटलपर ‘पुढारी’की ही हमेशा नजर रहेगी.”

सियाचीनमध्ये हॉस्पिटल बांधले याबद्दल जगभरातून कौतुक झाले. भारतासाठी ही अभिमानाची गोष्ट होती. प्रतापसिंह जाधव यावेळचा एक गंमतीदार किस्सा सांगतात.

उद्घाटनानंतर एकदा त्यांची व जॉर्ज फर्नांडीस यांची भेट झाली. तेव्हा फर्नांडिस यांनी त्यांना सांगितल की,

‘पुढारी’ने पुढाकार घेऊन उभारलेल्या निधीतून लष्करी इस्पितळ उभारले, हे जेव्हा सर्वत्र समजले तेव्हा अनेक बड्या उद्योगपतींनी माझ्याकडे विचारणा केली की, तुम्ही अशा प्रकारचा एखादा प्रकल्प आम्हाला का सुचवला नाहीत? त्यावर ही कल्पना आम्ही सुचवलेली नाही, ती ‘पुढारी’चे संपादक प्रतापसिंह जाधव यांचीच आहे, अस मी त्यांना सांगितलं.

जॉर्ज फर्नांडीस यांना पुढारीचे व कोल्हापूरकरांच्या जिद्दीचे कौतुक होते.  हॉस्पिटल बांधल्यानंतर दीड वर्षांनी तिथल्या सोयीमुळे सियाचीनमध्ये एकाही जवानाचे उपचाराअभावी निधन झाले नाही’, अशी माहिती त्यांनी  जाधव यांना सांगितली.

तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी सियाचीनला भेट दिली, तोपर्यंत 1 लाख 48 हजार सैनिक उपचार घेऊन बरे होऊन बाहेर पडले होते.  आजही हे हॉस्पिटल भारतीय सैन्याच्या शौर्याचे प्रतिक म्हणून ताठ मानेने उभे आहे.

संदर्भ- सियाचीन हॉस्पिटल, जॉर्ज आणि मी – प्रतापसिंह ग जाधव

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.