या मराठी वीराने पहिल्यांदा तिरंगा फडकवला आणि सिद्ध केलं सियाचीन भारताचा भाग आहे.

गोष्ट आहे १९८४ सालची.

सियाचिन हिमनदी म्हणजे काश्मिर, लडाखचं उत्तरेच टोक. जगातील सर्वात उंचावर असलेली युद्धभूमी. बाराही महिने हिमाच्छादित असणाऱ्या भाग.

एकीकडे कट्टर शत्रू पाकिस्तान तर दुसरीकडे धोकादायक चीन.  भारताला स्वातंत्र्य मिळून जवळपास सदतीस वर्षे होत आलेली. पण अजूनही या भूमीची मालकी कोणाकडे याचा निर्णय होत नव्हता.

मध्यंतरी दोन-तीन युद्धे झाली. सगळ्यात भारताचा विजय झाला पण सियाचीनची संदिग्धता कायम राहिली.  

एकतर हा अतिशय खडतर भाग. समुद्रसपाटीपासून उंची २२ हजार फुट. तिथे दरवर्षी सरासरी ३५ फुट बर्फ पडतो. तिथलं तापमान उणे ५० अंश सेल्सिअस पर्यंत घटत असते. एकूणच या ठिकाणी जवानांचे ठाणे बनवणे म्हणजे जिवावरचा खेळ. यासाठीच दोन्ही देश तिथे हक्क तर सांगत होते पण ताब्यात घेण्यासाठी काही प्रयत्न सुरु नव्हते.

अशातच पाकिस्तानने आपल्या कागाळ्या सुरु केल्या.

त्यांनी सियाचीन आपलेच आहे हा दावा तर केलाच पण तिथे येणाऱ्या गिर्यारोहकांना पाकिस्तानातून चढाई करण्यास परवानगी द्यायला सुरवात केली.

अमेरिकेच्या युनायटेड स्टेट्स डिफेन्स मॅपिंग एजन्सीने तर कोणत्याही कायदेशीर आधाराशिवाय सियाचीन क्षेत्र पाकिस्तानी हद्दीत दाखवले.

यामुळे जगभरातले गिर्यारोहक सियाचीनला पाकिस्तानचाच भाग समजून तिथल्या सरकारकडे परवानगी मागू लागले. 

भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधीनी यातला धोका ओळखला. एकप्रकारे पाकिस्तानचा दावा बळकट होत चालला होता. काही तरी कारवाई करणे आवश्यक झाले होते. याचा भाग म्हणून काही वर्षांपूर्वी कर्नल एन कुमार यांच्या नेतृत्वाखाली सियाचीन भागातील एक शिखर ताब्यात घेतलं होतं.

आता मुख्य सियाचीन भूमी उरली होती.

सियाचीन ताब्यात घ्यायचं झाल तर एवढ्या उंचीवर सैनिकांना काही उपकरणे लागणार होती. ती उपकरणे युरोपमध्ये मिळतील अस भारतिय आर्मीला कळाल. काही अधिकाऱ्यांची टीम युरोपच्या त्या मार्केटमध्ये पाठवण्यात आली.

पण योगायोगाने तिथ गेल्यावर त्यांना कळाल की नुकतच पाकिस्तानने ही सर्व उपकरणे विकत घेतली आहेत. पाकिस्तान सियाचिनवर हल्ला करायची तयारी करत होता.

भारतासाठी ही धोक्याची घंटा होती. मोहिमेला वेळ करून चालणार नव्हता.

दिवस ठरला १३ एप्रिल १९८४. ऑपरेशन मेघदूत.

भारतात व पाकिस्तानच्या पंजाबमध्ये साजरा केला जाणारा बैसाखी सणाचा मुहूर्त मुद्दामहून पकडण्यात आला होता. पाकिस्तान बेसावध राहिला. आदल्या दिवशीच सगळ साहित्य जवानांना मिळाल होतं. ४ कुमाऊ रेजिमेंटच्या वेगवेगळ्या तुकड्या बनवण्यात आल्या. मेजर बहुगुणा यांनी सेला पासचं नेतृत्व स्वीकारलं. तर मराठमोळ्या कॅप्टन संजय कुलकर्णींकडे बेलाफोंडलाची जबाबदारी देण्यात आली.

बेलाफोंड खिंड जिंकण सर्वात महत्वाच होतं.

१३ एप्रिलला पहाटे चिता हेलिकॉप्टरने सियाचीनच्या दिशेनं पहिल उढ्ढाण केलं.  यातून कॅप्टन संजय कुलकर्णी आणि एक सैनिक कँपला उतरले. हेलिकॉप्टर लँड करू न शकल्यामुळे त्यातून दोघांना उडी मारावी लागली.

उन्हाळा सुरु झाला असल्या मुळे आता जरी रस्ता बनला असला तरी तेव्हा या ठिकाणी पोहचणं इतकं सोपं नव्हतं. गेली काही वर्षे याची तयारी करत असलेल्या संजय कुलकर्णीना हे अवघड गेल नाही.

बेलाफोंडला पासवर कॅप्टन कुलकर्णींनी ताबा मिळवला  आणि सियाचीनमध्ये पहिल्यांदा  भारताचा तिरंगा फडकवला.   

काही तासात चिता हेलिकॉप्टरच्या सतरा फेऱ्या झाल्या. याशिवाय हवाईदलाची विमाने, हेलिकॉप्टर मधून जवान उतरत होते. कुमाऊ रेजिमेंटची एक तुकडी पूर्वेकडून पायी चढाई करत होती.

पुढच्या चार दिवसात अख्खं सियाचीन भारतीय जवानांच्या ताब्यात आलं होतं.

पाकिस्तानला जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा त्यांचा प्रचंड जळफळाट झाला. भारताकडून सियाचीनकडे जायचं झाल्यास सरळ उभी चढण आहे तर पाकिस्तानसाठी मात्र सियाचीन थोडं कमी उंचावर आहे. मात्र, अशा परिस्थितीतही भारतीय सैन्यानं पाकिस्तानला जोरदार मात दिली.

म्हणूनच जगभरातल्या यशस्वी युद्धांमध्ये ऑपरेशन मेघदूतचं नाव आवर्जून घेतलं जातं.

यांनतर अनेकदा पाकिस्तानने सियाचीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. अनेकवेळा चकमकी उडाल्या. पण प्रत्येकवेळी त्यांना शूर भारतीय जवानांनी माघार घ्यायला लावली.

अखेरीस २००३ मध्ये क्षेत्रात युद्धबंदी जाहीर करण्यात आली. दोन्ही देशांचा ताबा रेषा पक्की करण्यात आली. पाकिस्तानने अधिकृत रित्या सियाचीनवरचा भारतीय हक्क मान्य केला.सियाचीन क्षेत्रात २१ हजार फुटावर सोनम इथे भारताने उभारलेलं हेलिपॅड हे जगातील सर्वात उंचावरील हेलिपॅड मानले जाते.

 मात्र आजही तणाव सुरूच आहे.

दोन्ही देशाचे लष्कर एकमेकांच्या समोर उभे ठाकले आहेत. दरवर्षी अनेक जवान आपल्या प्राणावर खेळून भारताच हे अत्युच्च टोक सांभाळत आहेत. या वीरांच्या धैर्याला आणि शौर्याला सलाम!

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.