नवज्योतसिंग सिद्धू यांनी अवघ्या ७२ दिवसांमध्ये पंजाब काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद सोडलयं…
नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबच्या प्रदेशाध्यक्षपदाचा अवघ्या ७२ व्या दिवशी राजीनामा दिला आहे. मागच्या आठवड्यातच पंजाबमध्ये चरणजीतसिंग चन्नी यांच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन झालं आहे. मात्र त्यानंतरच लगेचचं सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने देशभरात सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे पत्र लिहून हा राजीनामा पाठवला आहे. यात त्यांनी म्हंटलं आहे कि,
मी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. परंतु, पंजाब काँग्रेसच्या वाढीसाठी मी कार्यरत राहील. काँग्रेसचा विकासाबाबत मी कोणतीही तडजोड करणार नाही.
त्यामुळे सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असला तरी काँग्रेसमध्येच सक्रिय राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सध्या तरी त्यांच्या पक्षांतरावर चर्चा नाही. मात्र आगामी काळात ते नेमकी कोणती पावलं उचलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
मागच्या काही दिवासांपासून पंजाबमधील राजकारण दररोज कूस बदलत आहे. याची सुरुवात झाली होती ती कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यातील वादाने. याच वादाने मागच्या आठवड्यात कॅप्टन अमरिंदर सिंग यांना आपलं मुख्यमंत्री पद घालवायला लागलं होतं. त्यानंतर आता सिद्धू यांनी देखील हट्टाने मिळवलेल्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर पंजाबमधील राजकीय समीकरण बसवताना काँग्रेसची दमछाक होण्याची शक्यता आहे.
पण सिद्धू यांच्या राजीनाम्याची नेमकी कारण काय असू शकतात?
मुख्यमंत्रीपद हुकल्याने नाराज?
मागच्या आठवड्यात कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच येईल अशी अशा सिद्धूंना वाटत होती. मात्र काँग्रेस हायकमांडने चरणजीत चन्नी यांच्या रूपाने राज्यात दलित मुख्यमंत्र्याकडे नेतृत्व सोपवले. यातून हायकमांडने पूर्ण पंजाब काँग्रेसवर होल्ड ठेवण्याचे सिद्धू यांच्या मानसुब्यांवर पाणी फिरवले होते. त्यामुळे ते नाराज होते.
मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराजी :
सिद्धू यांच्या नाराजीच दुसरं मोठं कारण सांगितले जात आहे ते म्हणजे अलीकडेच झालेला मंत्रिमंडळ विस्तार. या नवीन मंत्रिमंडळात दोन उपमुख्यमंत्री देण्यात आले आहेत. मात्र, सिद्धू यांना मुख्यमंत्री पदावरून डावलल्यानंतर उपमुख्यमंत्री पद देखील देण्यात आलं नाही. हायकमांडने सिद्धू यांची इथं देखील डाळ शिजू दिली नाही. संपूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार आगामी रणनीती डोक्यात ठेऊन केला.
यामुळे देखील सिद्धू यांच्या मनात दुसऱ्यांदा डावलल्याची भावना तयार झाली. त्याच नाराजीतून सिद्धू यांनी राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे.
गुरुजीत सिंग यांच्यामुळे नाराज? :
पंजाबच्या मंत्रिमंडळ विस्तारात राणा गुरजीत सिंग यांना स्थान न दिल्याने सिद्धू नाराज होते, असे बोलले जात आहे. आमदार गुरजीत सिंग यांच्या मंत्रिमंडळ समावेशावरुन वाद आहेत. काही काँग्रेस नेत्यांनी हायकमांडला पत्र लिहून त्यांना मंत्रिमंडळात स्थान न देण्याची देखील मागणी केली होती. अमरिंदर सिंह यांच्या मंत्रिमंडळात राणा गुरजीत सिंग मंत्री होते. पण १० महिन्यात २०१८ मध्ये त्यांनी राजीनामा दिला होता. वाळू लिलावाच्या वादामध्ये त्यांचे नाव आले होते.
२०१७ पासून सुरु होते वाद :
आज पंजाब काँग्रेस ज्या परिस्थितीमधून जात आहे त्याची सुरुवात २०१७ मध्येच झाली होती. खरंतर नवज्योतसिंग सिद्धू हे २०१७ च्या निवडणुकांपूर्वीच काही दिवस आधी काँग्रेसमध्ये आले होते. आपल्या बिनधास्त अंदाजासाठी प्रसिद्ध असणारे सिद्धू यांना काँग्रेसमध्ये आणण्यात राहुल आणि प्रियांका यांचा मोठा वाटा होता.
पुढे पक्ष सत्तेत आल्यानंतर सिद्धू यांना उपमुख्यमंत्री करण्याच्या चर्चांना सुरुवात झाली. पण कॅप्टन मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी स्पष्ट केलं कि आपल्याला उपमुख्यमंत्री पदाची आवश्यकता नाही. आणि हाच सिद्धू यांना मोठा झटका होता.
पुढे इम्रान खान यांच्या शपथविधीला पाकिस्तानमध्ये जाऊन हजेरी लावणं, करतापूर कॉरिडॉरच्या वेळी पहिला पास मिळणं अशा गोष्टींवरून देखील कॅप्टन आणि सिद्धू यांच्यातील वादाने टोक गाठलं होतं. यानंतर २०१९ मध्ये सिद्धू यांनी कॅप्टन यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. अलीकडील काही दिवसांमध्ये सिद्धू मुख्यमंत्री असलेल्या कॅप्टन अमरिंदर सिंग यांना हटवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं बोललं जात होतं.
कॅप्टन अमरिंदर सिंग दिल्लीत
दरम्यान, माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे आज दिल्लीत पोहोचले आहेत. विशेष म्हणजे राहुल गांधी किंवा सोनिया गांधी यांची नाही तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सिंग भेट घेणार आहेत. त्यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास काँग्रेसला निवडणुकीत त्याची मोठी किंमत मोजावी लागु शकते.
हे हि वाच भिडू
- १९८३ मध्ये सुरु झालेली इम्रान खान-सिद्धूची मैत्री आज राजकारणात शिव्या खायला लावतीय
- रिलायन्सने प्रत्येक सिक्सवर 6 हजार रुपये बक्षीस ठेवलं होतं. सिद्धू सबसे बडा खिलाडी ठरला
- कॉंग्रेसने पंजाबमध्ये वापरलेला बदलाचा फॉर्म्युला आता राजस्थानमध्ये देखील दिसणार आहे..