अफगाणिस्तानात शीखांवर हल्ले होतायत पण तिथं शीख पोहोचले कसे हा इतिहास पण इंटरेस्टिंग आहे.
अफगाणिस्तानातील एका गुरुद्वाऱ्यावर इस्लामिक स्टेटच्या दहशदवाद्यांनी हल्ला केला. हा हल्ला भाजप प्रवक्त्या नुपूर शर्माने मुहम्मद पैगंबर यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केल्यामुळे केला आहे. असं इस्लामिक स्टेटनं सांगितलंय. शीख आणि गुरुद्वाऱ्यांवर अनेकदा हल्ले झाले आहेत. त्यात अनेक लोकांचा बळीही गेला आहे. परंतु यानिमित्ताने चर्चा सुरु आहे ती, हा शीख समुदाय नेमका अफगाणिस्तानात कसा काय याची. चला तर याबाबद्दल सविस्तर जाणून घेऊयात.
आता शीख लोकं तर भारतातील पंजाबमध्ये असतात मग ते अफगाणिस्तानात कसे
शीख निव्वळ भारतातील पंजाबात नाहीत तर संपूर्ण भारतात आणि जगातील अनेक देशांमध्ये राहतात. परंतु शीख धर्माची मुख्य भूमी म्हणजे भारत आणि पाकिस्तान. १४९९ मध्ये पंजाब प्रदेशात गुरु नानकांनी शीख धर्माची स्थापना केली. गुरु नानकानीं निव्वळ भारत आणि पाकिस्तानातच शीख धर्माचा प्रसार केला नाही. तर त्यांनी अफगाणिस्तानात सुद्धा शीख धर्माचा प्रसार केला.
याच प्रसारादरम्यान अफगाणिस्तानातील खात्री समुदायाने गुरु नानकांच्या उपदेशांवर विश्वास ठेवला. त्यातूनच त्यांनी शीख धर्माचा स्वीकार केला आणि अफगाणिस्तानात शीख धर्माची सुरुवात झाली.
यानंतर अनेक शीख गुरूंनी अफगाणिस्तानाला भेट दिली आणि शीख समुदायाची भरभराट घडून आली.
मग शीख धर्मीय मूळचे अफगाणीच आहेत तर
होय. अफगाणिस्तानातील शीख हे मूळ अफगाणीच. यामुळे अफगाणिस्तान जितकी अफगाणी मुस्लिमांची भूमी तितकीच ती शिखांची सुद्धा आहे. ऍन्थ्रोपोलोजिस्ट रॉबर्ट बाँर्ड यांच्या मते अफगाणी शीख हे धर्माइतकेच जुने आहेत. त्यांनी धर्माची सुरुवात झाली तेव्हाच धर्म स्वीकारला आहे.
आता शीख तर अफगाणीच, तर मग त्यांच्यावर हल्ले का होतात
याचं कारण आहे धर्म. शीख जरी अफगाणी असले तरी त्यांचा धर्म हा बहुसंख्य मुस्लिम अफगाणी लोकांपेक्षा वेगळा आहे. त्यामुळे मुस्लिम धर्मातील अतिवादी लोकांकडून शिखांना वारंवार टार्गेट केलं जातं. पूर्वी टार्गेट करण्याच्या घटना घडायच्या, परंतु तालिबानच्या काळात यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे अफगाणी शिखांनी देश सोडून पलायन करायला सुरुवात केली.
शीखांनी निव्वळ तालिबानच्या काळातच नाही तर आधीही सुद्धा देश सोडलंय.
शिखांच्या देश सोडून जाण्याला निव्वळ तालिबानच जबाबदार राहिलेला नाहीये. याआधी सुद्धा शीखांनी अफगाणिस्तान सोडून पलायन केलाय. सगळ्यात पहिल्यांदा मीर अब्दुल रहमान खानच्या काळात अतिवादी लोकांच्या त्रासामुळे शीख देश सोडून भारतात आले.
त्यानंतर १९८० दशकात मुजाहिद्दीनचा जन्म झाला. मुजाहिद्दीनने अनेक गुरुद्वाऱ्यांवर हल्ले केले. त्यामुळे शीखांनी पुन्हा देश सोडायला सुरुवात केली.परंतु त्यांनतर जन्माला आलेल्या तालिबानने तर कहरच केला. मोठ्या प्रमाणावर अल्पसंख्यांक हिंदू आणि शीखांना टार्गेट करायला सुरुवात झाली.
याने शीख समुदाय सगळ्यात मोठ्या संख्येने देश सोडला आणि अफगाणिस्तानात शीख निव्वळ नावाला उरले.
जवळपास लाखभराहून अधिक शीख भारतात आले.
१९८० च्या पूर्वी जवळपासलेक लाखाच्या वर शीख फगाणिस्तानात राहायचे मात्र १९९२ मध्ये जवळपास ६५ हजार शीख भारतात आले. एवढंच नाही तर उरलेल्या ५० हजारहून अधिक शिखांनी सुद्धा पलायन केलं. त्यामुळे २००५ च्या आकडेवारीनुसार अफगाणिस्तानात फक्त ३७०० शीख उरले होते. वारंवार गुरुद्वारे आणि घरांवर होणाऱ्या हल्ल्यांमुळे शिखांना जीव वाचवायला पलायन करण भाग पडलं.
अफगाणिस्तानात सुद्धा भारतासारखेच जुने गुरुद्वारे आहेत.
शीखांचे प्रार्थनास्थळ असलेले अनेक जुने गुरुद्वारे अफगाणिस्तानात आहेत.
यातला पहिला गुरुद्वारा गुरु नानकांचे पुत्र बाबा चंद यांच्या भेटीदरम्यान स्थापन करण्यात आला होता. तसेच गुरु अमरदास यांचे शिष्य बाबा गणक बक्ष यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ काबूलमध्ये बांधण्यात आला होता. त्यानंतर गुरु अर्जुनदेव यांच्या काळात भाई गुरुदास यांनी खालसा गुरुद्वाऱ्याची स्थापना काबूलच्या शोर बाजारात केली होती. तर सातवे गुरु गुरु हार रे यांच्या काळात भक्त भाई गोंडा यांनी सुद्धा एक गुरुद्वारा काबुल मध्ये बांधला होता.
या पवित्र गुरुद्वाऱ्यांवर झालेल्या हल्यात अनेक शीख मारले गेले.
अफगाणिस्तान गुरुद्वाऱ्यावर अनेकदा हल्ले झालेले आहेत. आणि या हल्ल्यांमध्ये अनेक निरपराध शिखांचा बळी गेलाय. २०१८ मध्ये जलालाबाद येथे इस्लामिक स्टेटने केलेल्या हल्ल्यात १९ शीख मारले गेले तर २०२० मध्ये केलेल्या हल्ल्यात २५ शीख मारले गेले.
तर इस्लामिक स्टेटने नुकत्याच केलेल्या हल्ल्यात दोन शीख मृत्युमुखी पडले.
एकेकाळी अफगाणिस्तानात समृद्ध जीवन जगणारे शीख वारंवार होणारी हल्ल्यांमुळे भारतासह दुसऱ्या देशात स्तलांतरित होत गेले. अफगाणिस्तानात एकेकाळी लाखाहून अधिक असलेले शीख २०२० मध्ये केवळ सातशेच उरले. आणि याप्रकारे शीखांच्या एका युगाचाच अंत झाला.
हे ही वाच भिडू
- अफगाणिस्तानात हा गुरुद्वारा होता म्हणून शेकडो भारतीयांना आसरा मिळालायं
- तालिबान्यांनी सुरवातीला पुरोगामी आव आणलेला, पण आता ठासायला सुरवात केलीय..
- अलकायदा, इसिस-के आणि तालिबान यांच्यात नेमका फरक काय आहे?