महाराष्ट्रातलं गाव चांदी उद्योगासाठी भारतभर ओळखलं जातं : हुपरीची गोष्ट

नवा माणूस गावात शिरतो. पन्नास हजार लोकवस्ती असणाऱ्या गावातला पैसा बघतो. श्रीमंती बघतो आणि पुढे आयुष्यभर भेटणाऱ्या माणसाला हुपरीबद्दल सांगत राहतो. अरे हुपरीत लय पैसा आहे. छोट्या गावात मला M क्लास मर्सिडीज दिसली. याच सुख त्या माणसाला असतं. अधीक खोलात जाणारा माणूस असेल तर हुपरी आणि चांदिच समीकरण शोधून घेतो, काहीच गरज नसणारा गावच्या श्रीमंतीबद्दल सांगत राहतो. 

हे का ? कारण हुपरी हे चांदीचं गाव.

एकेकाळी भारतातून सोन्याचा धूर निघायचा अस म्हणलं जातं. सोन्याचा धूर गायब झाला पण त्याच काळात म्हणजे १९ व्या शतकाच्या शेवटाला व  २० व्या शतकाच्या सुरवातीपासून हुपरीतून चांदीचा धूर निघण्यास सुरवात झाली. हळुहळु हा धूर देशभरात गेला आणि हूपरी हे गाव भारतात चांदीच्या दागिण्यासाठी प्रसिद्ध झालं. 

हुपरी तस आडमार्गी गाव. चांदीच आणि हुपरीच नात कधीपासून सुरू झालं विचारलं की कोल्हापूर संस्थानाकडून पटवर्धनांकडे आणि पटवर्धनांकडून घाणवत म्हणून नवकोटनारायणाच्या ताब्यात नंतर निपाणीकर देसाई आणि परत कोल्हापूर संस्थान अशी इतिहासातील हेळसांड हुपरीकरांच्या वाट्याला आल्याच सांगितलं जातं. हुपरी अखेर कोल्हापूर संस्थानच्या ताब्यात आलं आणि कोल्हापूरच्या राजघराण्यातील हत्ती, घोडे यांना घालण्यासाठी लागणाऱ्या कोयऱ्या, गोंडे, सांजवात असे चांदिचे दागदागिणे बनवण्याच काम हुपरीच्या कसबी कारागीर सोनार मंडळीकडे आलं. त्या चांदीच्या दागिण्याचं कौतुक सुरू झालं. 

हे प्रकरण इथेच थांबल असतं पण दादोबा केशव पोतदार, वामन कृष्णाजी सोनार, कृष्णाजी रामचंद्र पोतदार अशा मंडळींनी हुपरीच्या कारागिरीला पुढे घेवून जाण्यासाठी हात सरसावले. कोणत्याही तंत्रज्ञानाशिवाय चांदिचे दागिने घडवले जावू लागले. कोयली, मासोळ्या, जोडवी, चाळ, घागरी, कडदोरे, गोंडे, छल्ले, वाळे, तोडे, वाक्या असे अनेक अलंकार येथे तयार होवू लागले. कोल्हापूर बरोबरच सांगली, सातारा, बेळगावच्या बाजारपेठेत हुपरीच्या चांदीच्या दागिण्यांच कौतुक होवू लागलं. मागणी वाढू लागली आणि लोकं पुढे येत गेली. 

गावची माणसं चांगली होती, त्यांनी एका समजाची, एका माणसांची मक्तेदारी न ठेवता हे काम एकमेकांच्यात वाटायला सुरवात केली. तो काळ होता साधारण 1900 ते 1910 च्या दरम्यानचा. या काळात “हुपरीची चांदी” आसपासच्या सराफपेठेत स्वत:च्या नावाने ओळखण्यात येवू लागली. 

पुढे हे काम पसरत गेलं पण चांदीला खरी झळाळी आली ती 1950 च्या काळानंतर. लोक सांगतात की, गावच्या य.रा. नाईक यांनी आपला चांदीचा व्यवसाय बंदच केला होता पण चांदी व्यवसायाची सांगड घालण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा गावात चांदी कारखाना असोशिएशनची (1944) स्थापना केली. नेमिनाथ वाळवेकर यांनी 1960 चांदीमाल उत्पादक संघाची स्थापना केली. 1956 साली चांदी उद्यौगिक सहकारी संघाची स्थापना करण्यात आली. 

या संघटनामुळे काय झालं तर हुपरीच्या चांदी उद्योगाला एकत्रित स्वरुप मिळालं. लोक एकमेकांशी जोडले गेले. आजूबाजूच्या बाजाराबरोबर देशभराचा विचार केला जावू लागला. हुपरीचे चांदीचे दागिने देशभर पोहचू लागले. 

हे सगळं नेमकं कस चालत तर हुपरीच्या या व्यवसायाचं पाच भागात वर्गीकरण करतात. 

कच्ची चांदी ते चांदीच्या दागिन्यांची निर्मीत आणि पुढे त्याचा देशभराच्या मार्केटमध्ये पुरवठा करणारे उद्योजक. दूसरे म्हणजे फक्त चांदिचे दागिने घेवून ते देशभराच्या मार्केटमध्ये पाठवणारे व्यापारी. तिसरे म्हणजे धडी उत्पादक. धडी उत्पादक म्हणजे कच्ची चांदी घेवून चांदीचे दागिने करणारा घटक. चौथा घटक म्हणजे कारागिरांचा. जे चांदीच्या दागिन्यावर कारागिरी करतात असा घटक. यामध्ये महिलांच प्रमाण मोठं आणि पाचवा घटक म्हणजे या सर्वांना पुरक ठरू शकेल असा काम करणारा. या सर्व घटकांनी गाव बांधल गेलं. 

महत्वाचा घटक मानला गेला तो धडी उत्पादक. हा घटक काय करतो तर व्यापाऱ्याकडून कच्ची चांदी घेतो. आपल्या ऐपतीनुसार कारागिर नेमतो. हे कारागिर घरातल्या त्यांच्या मुली, बायको, बहिणी, आई असतात तर काम जास्त असेल तर ते मजूरीवर नेमलेले कारागिर देखील असतात. आपआपल्या ऐपतीनुसार धडी उत्पादक चांदी घेतो. व्यापाऱ्याकडून अशी चांदी घेताना मुद्दा असतो तो विश्वासाचा. किलोच्या प्रमाणात चांदी दिली जाते आणि त्याबदल्यात त्याच चांदीचे दागिने करुन व्यापाऱ्यास परत केले जातात. यादरम्यान पैशाचा मुद्दा येतो तो फक्त कारागिरांच्या मुजरीपुरताच. मग धाडी उत्पादकाच्या हाती राहते ती घटनावळ. साडेपाच टक्के घट ग्रहीत धरून व्यवहार पुर्ण होतो. धडी उत्पादकाचा जो नफा तो म्हणजे हीच घट. यातून आपल्या ऐपतीनुसार काम घेवून हळुहळु ते वाढवून लोक पुढे उद्योजक झाले. 

चांदिच्या वेगवेगळ्या दागिन्याहून पैंजणची मागणी वाढत गेली. सुरवातीपासून असणारे चांदीचे राजश्री आणि रुपाली या डिझायन्स देशभरात आजही वापरल्या जातात. आग्रा, सेलम आणि राजकोट प्रमाणेच हुपरी हे नाव देशभरात चर्चेत आले. 

सध्या चांदी व्यवसायात आलेल्या अस्थिरतेमुळे काहीजण वेगळ्या व्यवसायात उतरले. चांदीच्या दरात अचानक झालेली वाढ देखील याला कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. लोकांचा कमी वजनाची चांदी वापरण्याकडे वाढलेला कल, तंत्रज्ञानाचा शिरकाव आणि सोन्याची पसंती अशा अनेक गोष्टींनी या उद्योगावर प्रभाव पाडला. हुपरी या छोट्याशा गावाला देशाच्या गावागावत घेवून जाण्याचा काम इथल्या कारागिरांनी, व्यापाऱ्यांनी, उद्योजकांनी केलं हे आपणाला विसरून चालणार नाही. 

हे ही वाच भिडू. 

1 Comment
  1. D v ozarkar says

    Saglyt bhari kolhapuri ani kolapurat bhari hupri

Leave A Reply

Your email address will not be published.