विप्लव देव खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारस शोभतात…!!!

 

त्रिपुराचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री विप्लव देव सध्या माध्यमातील चर्चाविश्वाच्या केंद्रस्थानी आहेत. त्रिपुराच्या निवडणुकीनंतर राजकीय पटलावर नव्यानेच उदयास आलेल्या विप्लव देव यांनी आपल्या वादग्रस्त विधानांनी माध्यमांचा कॅमेरा आपल्या अवतीभवतीच कसा फिरत राहील, याची व्यवस्थित काळजी घेतलीये. त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळेच   देशाच्या इतिहासात प्रथमच त्रिपुराच्या मुख्यमंत्री पदावरील माणूस त्रिपुरा व्यातिरिक्त देशातील इतर भागात इतका प्रसिद्धीस पावलाय. अनेक महत्वाच्या न्यूज चॅनेल्सनी देखील आजतागायत दुर्लक्षित  राहिलेल्या  त्रिपुरासारख्या राज्यात आपला एक खास रिपोर्टर आणि कॅमेरामन पाठवत त्रिपुराचा आजपर्यंतचा प्राईम टाइम स्लॉटमधील अनुशेष भरून काढायचा निर्णय घेतलाय. वादग्रस्त वक्तव्यांची एक सिरीजच त्यांनी दिल्यानंतर अनेकांनी यासंदर्भात त्यांची तुलना भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी करायला सुरुवात केलीये. यानिमित्ताने विप्लव देव यांनी विविध विषयांवर केलेली वादग्रस्त विधाने आणि त्याच विषयावरील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मते यांचा तुलनात्मक आढावा घेऊन खरंच विप्लव देव आणि मोदी यांच्यात काही साम्य आहे का हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केलाय. त्यातून जे काही समोर आलं ते वाचकांशी शेअर करण्याचा हा प्रयत्न…

आधुनिक तंत्रज्ञानाची महाभारताशी सांगड

ऑक्टोबर २०१४- नरेंद्र मोदी देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होऊन काही महिनेच उलटले होते. मुंबईतील काही डॉक्टर आणि इतर व्यावसायिक लोकांसमोर नरेंद्र मोदी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, “कोणेएके काळी आपल्या  देश मेडिकल सायन्समध्ये जी प्रगती केली होती, तीचा आपल्याला सार्थ अभिमान असायला हवा. महाभारतानुसार कर्णाचा जन्म मातेच्या गर्भाशयातून झाला नव्हता. म्हणजेच त्याकाळी जेनेटिक सायन्स अस्तित्वात होतं” याचवेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, “आपण श्रीगणेशाची पूजा करतो. पण गणपतीच्या मानवरुपी धडावर हत्तीच्या सोंड स्वरूपातील तोंड हे या गोष्टीचा पुरावा आहे की त्याकाळी देखील भारतात प्लॅस्टिक सर्जन अस्तित्वात होते.”

एप्रिल २०१८- विप्लव देव त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊन साधारणतः महिना-२ महिन्यांचा कालावधीच उलटला होता. त्रिपुराची राजधानी आगरतळा येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, “भारतात अनादी काळापासून  इंटरनेटचं अस्तित्व आहे. महाभारतातील संजय हा दरबारात बसून राजा धृतराष्ट्राला कुरुक्षेत्रावर घडणाऱ्या युद्धाची युद्धाची इत्यंभूत माहिती देऊ शकला. याचाच अर्थ त्याकाळात भारतात इंटरनेट आणि सॅटेलाईटचं अस्तित्व होतं

महिलांविषयक मते

ऑक्टोबर २००९- तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येऊन शशी थरूर यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. नरेंद्र मोदी हे त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. एका राजकीय सभेसाठी ते हिमाचल प्रदेशातील मंडी येथे  आले होते. या सभेत थरूर यांच्यासंदर्भात बोलताना त्यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर (ज्या आज हयात नाहीत) यांच्याविषयी नरेंद्र मोदींनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावेळी  बोलताना मोदी म्हणाले की, वाह, क्या गर्लफ्रेंड है..? आपने कभी देखी है ५० करोड की गर्लफ्रेंड..?

एप्रिल २०१८- राजधानी आगरतळा येथील ‘प्राजना भवन’मध्ये हॅडलूम आणि  हॅडीक्राफ्ट डिझायनिंग संदर्भातील वर्कशॉपला संबोधित करताना मुख्यमंत्री देव यांनी १९९७ सालच्या  ‘मिस वर्ल्ड’ डायना हेडन हीच्या भारतीयत्वावर शंका उपस्थित केली. शिवाय ते तीच्या रंगावर देखील घसरले. त्याचवेळी ऐश्वर्या रायचं मात्र त्यांनी कौतुक केलं. मुख्यमंत्री म्हणाले की, “आपण महिलांना देवी लक्ष्मी आणि सरस्वतीच्या स्वरुपात पाहतो. ऐश्वर्या राय ही खऱ्या अर्थाने भारतीय स्त्रीचं प्रतिनिधित्व करते. तीला मिस वर्ल्ड मिळाला ते योग्यच झालं. पण मला डायना हेडन कशी सुंदर आहे, हे मात्र समजत नाही

 अतार्किक विधानं

मे २०१५- चीनच्या दौऱ्यावर असणारे मोदी शांघाय येथील भारतीय जनसमुदाया समोर  बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, “काही दिवसांपूर्वी तुम्हाला भारतीय म्हणून जन्मल्याची लाज वाटत होती. आता तुम्हाला भारताचं प्रतिनिधित्व करताना अभिमान वाटतो.”

एप्रिल २०१६- कोलकात्यातील पूल कोसळल्याची दुर्घटना घडली होती. त्यात २६ लोकं मृत्युमुखी पडले होते. यावर एका राजकीय सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “ कोलकाता दुर्घटना हा पश्चिम बंगालला तृणमूल काँग्रेसपासून वाचविण्यासाठीचा ईश्वरी  संदेश आहे

एप्रिल २०१८-  स्थळ पुन्हा आगरतळा येथील प्राजना भवन. सिव्हील सर्व्हिस अर्थात नागरी सेवा दिनानिमित्ताच्या कार्यक्रमात विप्लव देव बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की, “ मेकॅनिकल इंजिनिअरींग केलेल्या विद्यार्थ्यांनी ‘सिव्हील सर्व्हिस’ परीक्षा देऊ नये, फक्त सिव्हील इंजिनीअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांनीच ती द्यावी. कारण सिव्हील इंजिनीअरिंग पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्रशासनाचा अनुभव असतो”

बेरोजगारीच्या प्रश्नाची हास्यास्पद समज

जानेवारी २०१८- ‘झी न्यूज’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भारतातील बेरोजगारीच्या समस्येविषयी प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ते म्हणाले की, “आपल्या कार्यकाळात देशातील अनेकांना रोजगार मिळाला आहे. कुणी चहा विकतोय, कुणी पकोडे तळतोय तर हा रोजगार झाला. तुमच्या ‘झी न्यूज’च्या ऑफिसबाहेर पकोडे तळून कुणी दिवसाचे २०० रुपये कमावून घरी जात असेल तर  तुम्ही त्याला रोजगार नाही का म्हणणार..?

एप्रिल २०१८- त्रिपुरा व्हेटेरीनरी कौन्सिलने आयोजित केलेल्या एका सेमिनारमध्ये बेरोजगारीच्या प्रश्नावर बोलताना विप्लव देव म्हणाले की, “बेरोजगार तरुणांनी सरकारी नोकऱ्यांसाठी राजकारण्यांच्या मागे धावू नये, त्या ऐवजी त्यांनी पान-टपरी टाकावी किंवा गौपालन करून दुग्धव्यवसाय करावा

Leave A Reply

Your email address will not be published.