तो किस्सा ज्यामुळे संजय दत्त निवडणूक लढवायला घाबरतो.
उत्तरप्रदेश चे अमर सिंग हे मोठे रंगीत व्यक्तिमत्व आहेत. एकेकाळी उत्तरप्रदेशच्या राजकारणाची सूत्रे हलवणाऱ्या अमरसिंग यांच्या सोबत बॉलीवूड सिनेतारकांची मांदियाळी दिसायची. जया प्रदापासून ते बच्चन परिवारापर्यंत अनेकांना राजकारणाच्या वाटेवर सहारा देण्यात अमरसिंग पुढे दिसायचे.
याच अमरसिंग यांनी संजय दत्त याची कशी गोची केली होती याचा हा किस्सा..
साल होते २००९.
अमरसिंग यांनी मुलायमसिंग यांच्याकडे शिफारस करून संजय दत्तला लखनौ मतदरसंघातून लोकसभेचे तिकीट मिळवून दिले होते. संजूबाबा समाजवादी पार्टीची लाल टोपी घालून मैदानात उतरला तर खरा मात्र राजकारण्यांना लागतात ते मोठे मोठे भाषणाचे स्कील त्याच्याकडे नव्हते.
त्याने ही अडचण आपले राजकीय गुरु अमरसिंग यांना सांगितली. त्यांनी त्याला रात्री भाषणाच्या तयारीसाठी आपल्या घरी बोलवून घेतलं.अमरसिंगनी युपीच्या जनतेला भावतील असे काही points संजय दत्तला सांगितले.
यातला पहिला मुद्दा होता की,
फिल्मइंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी संजय दत्तचे वडील सुनील दत्त लखनौ मध्ये रहात होते आणि यामुळे संजय दत्तच लखनौशी नात कस जुनं आहे वगैरे वगैरे.
दुसरा मुद्दा त्यांनी सांगितला की,
गांधीगिरी वर बोल. नुकताच संजय दत्तचा लगे रहो मुन्नाभाई गाजला होता त्यामुळे पब्लिक मध्ये गांधीगिरीची क्रेझ होती.
तिसरा मुद्दा त्यांनी सांगितला की
भाषण मध्ये एक शेर म्हण.
“मुख़ालफ़त से मेरी शख्सियत संवरती है, मैं दुश्मनों का बड़ा एहतराम करता हूँ”
प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांची ही फेमस शायरी होती.
संजय दत्तने हे सगळे मुद्दे लिहून घेतले. रात्रभर सगळे मुद्दे पाठ केले. भाषणासाठी त्याला थोडाफार आत्मविश्वास आला. दुसऱ्या दिवशी लखनौमध्ये प्रचाराला सुरवात झाली. संजय दत्त ला बघायला हजारो फॅन्स तिथे गोळा झाले होते. स्टेजवर सुद्धा नेतेमंडळीनी गर्दी केली होती.
यातले एक नेताजी भाषणासाठी उभे राहिले,
“लखनौ का और संजय दत्त का बहोत पुराना रिश्ता है, उनके पिताजी पहले लखनौ मै रहते थे.”
संजयला टेन्शन आलं आपण तयारी केलेल्यामधला एक मुद्दा तर गेला.
त्यानंतर दुसरे नेताजी आले ते म्हणाले की,
“पुरे देश में संजूबाबा ने गांधीगिरी पहुन्चाई है” संजय दत्तला घाम फुटला. आता दोन मुद्दे गेले. आता फक्त एक शायरी उरली होती.
आता स्वतः अमरसिंग बोलायला उभे राहिले. गर्दी बघून खुललेल्या अमरसिंगच्या भाषणात भलताच रंग चढला होता. बोलता बोलता ते म्हणाले,
“संजू बाबा कल रात को मेरे पास आये उन्होने एक गेहरी बात मुझे सुनाई”
असं म्हणून त्यांनी ती बशीर बद्रची शायरी सांगून टाकली.
भाषणावेळी संजय दत्तने फक्त युपीच्या जनतेला प्रणाम केला. त्यानंतर तो न राजकारणाच्या वाटेला गेला न भाषणाच्या.
हे ही वाचा भिडू.
- सुनिल दत्त म्हणाले, कुठल्याही परस्थितीत नर्गिसला मरू देणार नाही !
- अर्धे हिंदू अर्धे मुसलमान असणारे हुसैनी ब्राम्हण – सुनित दत्त देखील हुसैनी ब्राम्हण.
- अटलबिहारी वाजपेयी Vs बॉबी सिनेमा, कॉंग्रेसनं खेळलेला असाही एक डाव.