दादा कोंडकेंनी हाफ चड्डी घालण्यास कधी पासून सुरवात केली?

आमच गाव इचलकरंजी. आधीपासून तिथं सिनेमाचं भरपूर वेड. छोटं शहर असून गावात दहा बारा थिएटर असतील. यंत्रमागाचा व्यवसाय त्याकाळात जोरात होता. गावातल्या लोकांच्या खिशात पैसा खुळखुळत असायचा. दर आठवड्याच्या शुक्रवारी कामगारांचे पगार व्हायचे. नवीन पिक्चर पण शुक्रवारीच रिलीज. माहेरची साडी सारखे बरेच चित्रपट पूर्ण राज्यात रिलीज करण्यापूर्वी ट्रायल साठी इचलकरंजीमध्ये रिलीज केले जायचे.

आमच्या गावात दादा कोंडकेचं बरचं फॅन फोलोविंग होत. त्यांच्या काही सिनेमाच शुटींग इचलकरंजीच्या राणीबागेत, आयको सुतगिरणी परिसरात झालं होत.  एकदा अशाच एका सिनेमाच्या प्रिमियरसाठी दादा कोंडके इचलकरंजीच्या पंचवटी थिएटरमध्ये येणार होते. गावभर तिकीटाची जोरदार विक्री झाली. आमच्या मामानं सुद्धा काही तर करून काही तिकीट मिळवली होती. पिक्चरच्या शोला तो मलासुद्धा घेऊन गेला.

थिएटरच्या बाहेर तुफान गर्दी झाली होती. सगळ्यांच्या नजरा दादा कोंडकेंच्या एंट्री कडे लागल्या होत्या. सिनेमा सुरु व्हायच्या अगोदर केशरी शर्ट आणि पांढरी पँट घातलेल्या दादा कोंडकेनी दर्शन दिल. हजारो शिट्ट्यांनी परिसर दणाणून गेला.

सिनेमा सुरु झाला. बाल्कनीमध्ये आमच्या सिटच्या पुढे दोन लाईन सोडून दादा कोंडके बसले होती. मी चार पाच वर्षाचा असेन. आमच्या मामाच्या सुपीक डोक्यात आयडिया आली. मला घेऊन जायचं आणि लहान मुलाला तुम्हाला शेकहँड करायचं आहे असं सांगून त्यांची भेट घ्यायची. 

सिनेमा सुरु होता. तसच मामा आणि त्याचा मित्र मला घेऊन दादा कोंडकेंच्या सीटपाशी गेले. मला पुढे करून त्यांनी त्यांच्या हातात हात द्यायला सांगितलं. दादा कोंडकेसुद्धा मध्ये डीस्टर्ब होत असूनही शेकहंडसाठी हात पुढे केला. पण मी काही त्यांना शेकहँड केला नाही. कारण काय असेल? चिडलेल्या मामाला मी घरी गेल्यावर उत्तर दिल होत,

“अरे तो दादा कोंडके नव्हता. दादा कोंडके बरमोडा घालतो. तो माणूस शर्टपँट घालून आला होता.”

दादा कोंडकेची ओळख म्हणजे त्याची ती ढगळ चड्डी होती. आमची गावाकडची आज्जी बरमोड्याला दादा कोंडके चड्डी म्हणायची. 

हिंदी मध्ये राजेश खन्ना, देवआंनद, अमिताभ तर मराठीत चंद्रकांत सुर्यकांत, रमेश देव अरुण सरनाईक यांच्यासारख्या देखण्या हिरोंच्या जमान्यात एक लांब नाडी बाहेर आलेला चड्डी घालणारा सिनेमाचा हिरो कसा होऊ शकतो? झालाच तर त्याचे सलग 9 सिनेमे सुपरहिट होतात हे सगळ तेव्हा एक सरप्राईजचं होतं. दादा कोंडकेनी फिल्म इंडस्ट्रीचे व्हाईट कॉलर मानसिकतेवाले सगळे नियम धुडकावून आपलं अढळ असं स्थान निर्माण केलं होतं.

मराठीमधला आत्ता पर्यन्तचा सर्वात मोठा सुपरस्टार दादा कोंडके होते. जगातल्या सगळ्या सुखसोयी, सर्वात फशनेबल कपडे विकत घेऊ शकणाऱ्या दादा कोंडके यांच्या वार्डरोब मध्ये ही चड्डी आली तर कशी? काय आहे तिची कुळकथा?

दादा कोंडके यांचा जन्म मुंबईच्या नायगावमधल्या एका कामगार चाळीत झाला. घरसंसाराला हातभार लावण्यासाठी दादा पडेल ते काम करत होते. पैसे कमवण्यासाठी कधी दुध चोरी तर कधी बेकायदेशीर दारू विक्री असल्या उचापती करत होते.

असं करता करता एकदा त्यांची ओळख सेवादलाशी झाली. सेवादलात चळवळीबरोबर जनता कलापथक म्हणून एक उपक्रम चालायचा. राम नगरकर , निळू फुले असे कार्यकर्ते त्यात काम करायचे. दादा कोंडके सुद्धा त्यात काम करू लागले.

याच कलापथकामधून काम करता करता त्यांनी एकदा आपले विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्य बसवले. आपल्या खुमासदार शैलीत द्विअर्थी संवादातून राजकीय टिप्पणी करणारे दादा कोंडके महाराष्ट्रभर प्रसिद्ध झाले.

या नाटकाच्या प्रसिद्धीमुळे त्यांना भालजी पेंढारकरांचा तांबडी माती हा सिनेमा मिळाला. तिथे भालजीना हा उचपती मुलगा खूप आवडला. त्यांनी दादांना एका सिनेमाची स्टोरी सांगितली. या सिनेमात काम करण्याबरोबरच तो प्रोड्यूस करण्याची ऑफर दिली. दादा कोंडके तयार झाले.

हा सिनेमा होता सोंगाड्या.

विच्छा माझी पुरी कराची स्टोरी लिहिणारे वसंत सबनीस यांना या सिनेमाची स्क्रिप्ट लिहिण्याचे काम देण्यात आले.  जयश्री गडकर , आशा पारेख यांना नायिका म्हणून काम करणार का विचारण्यात आलेलं पण ऐनवेळी त्यांनी सिनेमात काम करण्यास नकार दिला. याचे कारण म्हणजे त्यांना लोकनाट्यात काम करणाऱ्याची हिरोईन व्हायचं नव्हत असं दादा कोंडके म्हणतात.

अखेर हिरोईन म्हणून संगीत बारी मध्ये काम करणाऱ्या उषा चव्हाण यांना उभं करण्यात आलं.

दिग्दर्शक म्हणून नाव लावल होत गोविंद कुलकर्णी यांचं पण बर्यापैकी सिनेमाची सूत्र भालजी पेंढारकर यांच्या कडेच होती. दादा कोंडके यांचा सेवादलातला मित्र म्हणून निळू फुलेना सुद्धा संधी देण्यात आली होती. आईच्या भूमिकेत रत्नमाला बाई होत्या संगीत राम कदम देणारं होते.

सगळी तयारी तर झाली. पण दादा कोंडकेंची वेशभूषा काय असावी हा प्रश्न होता. त्यांची भूमिका एका वेधळ्या माणसाची होती. भालजी पेंढारकरांना चार्ली चॅप्लीन डोळ्यासमोर होता. त्याच्यासारखं दादांच करेक्टर उभ करायचं होत. हेअरस्टाईल, ड्रेस कसा असावा सगळे विचारात पडले. दिग्दर्शक गोविंद कुलकर्णी म्हणाले फाटके कपडे घालू. भालजी म्हणाले,

“दादाला बावळट दाखवायचं आहे भिकारी नाही.”

दादा कोंडके सहज म्हणाले,

“बाबा, समजा हाफ पँट घातली तर मी वेंधळा दिसेन नाही?”

कायम हाफ चड्डी घालणारे भालजी पेंढारकर म्हणाले,

“माझ्यावरून सांगताय काय?”

दादा कोंडके गडबडले. ते सहज गंमत म्हणून बोलले होते. भालजीनी मात्र ते मनावर घेतलं. 

त्यांनी आपल्या ड्रेपरीवाल्याला कपड्यांची पेटी आणायला सांगितली. त्यात त्यांना एक लांब नाडी असलेली चड्डी दिसली. त्यांनी ती दादा कोंडकेना घालायला लावली. ती एखाद्या धान्याच्या पिशवी प्रमाणे दिसत होती. दादा कोंडकेना पटलं नाही. हिरो हाफ चड्डी कशी घालणार? त्यांना एक छोट्या केसांचा विग देखील घालण्यात आला.

सेटवरचे सगळे दादा कोंडकेंचा अवतार बघून हसू लागले. पण दादांचा भालजीवर पूर्ण विश्वास होता. त्यांनी तोच ड्रेस फायनल केला.

सोंगाड्याच शुटींग कोल्हापुरात झालं. त्याचा मुहूर्ताचा नारळ जेष्ठ नेते रत्नाप्पा कुंभार यांच्या हस्ते फोडण्यात आला होता. दादा कोंडके यांचा निर्माता म्हणून हा पहिलाच प्रयत्न होता. भालजी पेंढारकर यांच्या कडक निगराणीखाली हा  सिनेमा बनला. प्रचंड ओढतानी खाली हा सिनेमा बनला पण कोणी वितर्क हा सिनेमा घ्यायला तयार नव्हता. त्याकाळी वितरक, सिनेमा थिएटरचे मालक उत्तर भारतीय पंजाबी सिंधी असायचे.ते सरळ तोंडावर म्हणायचे,

“इस हाफ पँटवाले को देखने कोण आयेगा? ये क्या पिक्चर है क्या? घरमे देखो तुम.”

पुण्याच्या भानुविलास थिएटरच्या बापटांच्या हातपाया पडून तिथे रिलीज करायची परवानगी मिळवली. दादा कोंडकेंनी सिनेमा क्षेत्रातल्या दिग्गजांना, आपल्या मित्रमंडळीना दाखवण्यासाठी एक ट्रायल शो ठेवला. सिनेमा झाल्यावर त्यांनी एका मित्राला विचारलं कसा वाटला सिनेमा? त्याने दोन बोटे उंचावून दाखवली. दादांना वाटल ती विजयी खुण वाटली. नंतर तो मित्र म्हणाला,

“भंगार सिनेमा आहे. दोन दिवसात खाली येईल.कशाला त्या भालजी पेंढारकरचं ऐकून या सिनेमाच्या नादी लागलास.”

दादा कोंडकेंचा आत्मविश्वास ढासळू लागला. त्यात कळालं की भानुविलास मध्ये सोंगाड्या एकच आठवडा सिनेमा लागणार त्यांनतर दुसरा सिनेमा तिथे रिलीज होईल. आता जे पदरात पडलय ते पार पडायचं म्हणून दादा कोंडके सज्ज झाले. या गडबडीत ते विसरून गेले होते की तो सिनेमा अमावस्येला रिलीज होतोय, आता विचार करायला वेळ नव्हता.

५ मार्च १९७१रोजी सोंगाड्या रिलीज झाला.

दादा कोंडकेंचा “विच्छा माझी पुरी करा” चे शो सुद्धा सुरु होते. एकदा भरतनाट्यगृहमधला शो संपवून येऊन ते लॉजवर झोपले होते तेव्हा त्यांचा एक मित्र त्यांना उठवायला आला. भनुव्लिअस थिएटरच्या बाहेर जत्रा भरली होती. सिनेमा सुपरहिट झाला होता. माळ्याच्या मळ्यामंदी कोण ग उभी ही गाणी जबरदस्त हिट झाली होती. आणि सगळ्यात जास्त दादा कोंडकेंची कॉमेडी सगळ्यांना भावली होती.

सोंगाड्याने सुवर्णमहोत्सव साजरा केला. राज्यशासनाचा पुरस्कार त्यांना मिळाला. या सिनेमाचे यश म्हणजे त्या चड्डीचे यश होते अशी खुणगाठ दादांनी बांधली. प्रत्येक सिनेमाच्या मुहूर्ताच्या शॉटवेळी दादा कोंडके भालजी पेंढारकरांनी दिलेली चड्डीच घालायचे. पुढे तिच्या फाटून चिंध्या झाल्या. तिला अनेक ठिकाणी ठिगळ जोडली पण तिची साथ त्यांनी सोडली नाही.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. DEEPAk says

    Thanks very good keep it up people
    Should know

Leave A Reply

Your email address will not be published.