म्हणून सिंधुदुर्गच्या विमानतळाला ‘चिपी’ या नावानं ओळखलं जात…

राज्यात सध्या चिपी विमानतळावरून बरंच राजकारण सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या या विमानतळाच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते येत्या ९ ऑक्टोबरला उद्घाटन होणार आहे. खुद्द सिंधुदुर्गचे सुपुत्र आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मात्र त्यावर वाद सुरु झाला तो, या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमंत्रित केलं जाणार का? या प्रश्नावर उत्तर देताना. नारायण राणे त्यावेळी म्हणाले कि ‘प्रत्येक कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित असावेत हे गरजेचं नाही. .

ज्योतिरादित्य शिंदे ९ ऑक्टोबर रोजी दुपारी ११.३० वाजता चिपी विमानतळाचं उद्घाटन करतील. या कार्यक्रमात मी आणि स्थानिक प्रतिनिधी उपस्थित असणार आहोत’, असं राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे .

हवाई चाचणी यशस्वी झाल्यानंतर देखील मागच्या बऱ्याच वर्षांपासून हे विमानतळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते. सोबतच श्रेयवादाची लढाई पण पाहायला मिळाली होती, आजही पाहायला मिळत आहे. पण या सगळ्याच्या पलीकडे जातं, भल्याथोरांच्या नावाचा आग्रह न धरता या विमानतळाला ‘चिपी’ असं का म्हणतात? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

नवी मुंबईतील आगामी आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा वाद अजूनही सुरु आहे. स्थानिक भूमिपुत्र म्हणून त्यांचं नाव देण्याचा आग्रह होतं आहे. त्यामुळेच चिपी विमानतळाबाबत अनेकांना प्रश्न पडणं साहजिकच आहे.

तर या विमानतळाचा उल्लेख चिपी विमानतळ असा केला जातो त्याचं कारण म्हणजे, हे विमानतळ उभं राहिलं आहे ते परुळे गावातील ‘चिपी वाडी’ मध्ये. परुळे गावचाच एक भाग असलेलं चिपी हे पूर्वी एक पठार होतं. हे विमानतळ उभं राहण्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी दिल्या. त्यामुळेच २००८-०९ मध्ये विमानतळासाठी एमआयडीसीने जवळपास २७१ हेक्टर (६४२ एकर) जमीन संपादित केली. 

याच कारणामुळे या विमानतळाच्या नोकर भरतीत स्थानिकांना प्राधान्य दिलं जावं, अशी देखील स्थानिक नेत्यांची आणि नागरिकांची मागणी आहे.

त्यानंतर २००९ साली हे विमानतळ बांधण्यासाठी एमआयडीसी अर्थात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि आयआरबी सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात विमानतळासाठी करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यानंतर प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाली.

२०१३ साली हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल असा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यानंतर २०१४ मध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री असताना आपल्या प्रयत्नांमुळे चिपी विमानतळाचे काम पूर्ण झाल्याचा दावा नारायण राणे यांनी केला होता. मात्र तेव्हापासून अनेक कारणांनी या विमानतळाचं उदघाटन रखडलं होतं.

अखेरीस ते आता ९ ऑक्टोबर रोजी होणार आहे. या विमानतळापासून कुडाळ २४ किमी, तर मालवण १२ किमी अंतरावर आहे.

सध्याच्या घडीला ‘कोकणची विकासाकडे वाटचाल’ म्हणून या प्रकल्पाकडे पाहिलं जातं आहे आणि त्याचीच सुरुवात ‘चिपी’ या छोट्याशा गावातून झाली असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.

तब्बल ५२० कोटी रुपयांचा हा प्रकल्प एमआयडीसीनं आयआरबी सिंधुदुर्ग एअरपोर्ट प्रा. लि. या कंपनीला ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या ९५ वर्षांच्या भाडेतत्त्वावर दिला आहे. ‘चिपी’ विमानतळाची गर्दीच्या वेळेस २०० प्रवाशांचे आगमन आणि दोनशे प्रवाशांचे प्रस्थान हाताळण्याची क्षमता आहे. अतिरिक्त बांधकाम न करता ही क्षमता प्रत्येकी ४०० प्रवाशांपर्यंत विस्तारण्याची व्यवस्था करता येऊ शकते, असं सांगण्यात आलं आहे.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.