बाहुबली राजा भैय्याच्या विरोधात उभं राहण्याची हिंमत एका महिलेने दाखवली आहे

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांची तयारी पार टप्प्यात आलीये. कारण पुढच्या दोन दिवसात मतदानाला सुरुवात होणार आहे. राज्यात पहिल्या टप्प्यासाठी १० फेब्रुवारीला मतदान होणारे, तर १० मार्चला निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे सगळ्या पक्षांची निवडणुकीची जवळपास सगळीच काम मार्गी लागलीत. 

पण या निवडणुकीत एक प्रश्न कायमचं ऐरणीवर होता, की युपीचे बाहुबली नेते असलेले राजा भैय्या यांच्या विरोधात नेमका कोणता उमेदवार उभा राहणार…. तसा हा प्रश्न नेहमीचाचं असतो. कारण रघुराज प्रताप सिंह उर्फ राजा भैय्या यांच्या कुंडा मतदारसंघातून १९९३ त्यांच्याशिवाय दुसरं कोणी निवडूनचं आलेलं नाही. म्हणजे जवळपास ६ वेळा राजा भैय्याचं तिथे आमदार आहेत.

आता राजा भैय्या यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांचा जन्म पूर्व भद्री संस्थानातील राजघराण्यातला. आता राजेशाही नसली तरी राजा भैय्या यांची तिथे तितकीच दहशत आहे. त्यांचा शब्द महणजे तिथल्या लोकांसाठी कायदाच आहे. असं म्हणतात कि, राजा भैय्या यांची इतकी दहशत आहे की त्यांच्या विरोधी उमेदवार स्वतःचे पोस्टर्स सुद्धा निवडणुकीत लावत नाहीत.

 ते जरी अपक्ष असले तरी मोठं – मोठ्या पक्षाच्या दिग्गज मंडळींच्या ते कायमच जवळचे राहिलेत. 

त्यामुळेच जनसत्ता दल लोकतांत्रिक दलाचे उमेदवार असलेले राजा भैय्या यांच्या विरोधात एखादा उमेदवार उभा करायचा म्हणजे बाकीच्या पक्षांना मोठं कोडंच पडत. आता सुद्धा असाच काहीसा प्रकार झाला. एकीकडे सगळ्या पक्षांनी आपल्या उमेदवारांची नाव जाहीर केली होती, फक्त कुंडा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार हा प्रश्न पेंडिंगवर ठेवला होता. पण शेवटी भाजपने त्यांच्या विरोधात उमेदवार जाहीर केलाय. 

विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रतापगड जिल्ह्यातील कुंडा मतदारसंघातून सिंधुजा मिश्रा यांना उमेदवारी दिली आहे. सिंधुजा मिश्रा ​​राजा भैय्या यांना टक्कर देणार आहेत. आता राजा भैया यांच्या विरोधात महिला उमेदवार म्हंटल्यावर काही तरी खास गोष्ट तर असणारचं हे फिक्स.

तर सिंधुजा मिश्रा या मूळच्या आझमगडच्या.  त्या आझमगड इथल्या प्रसिद्ध वैद्य चंद्रदत्त त्रिपाठी यांची नात आणि श्रीनिवास त्रिपाठी यांची मुलगी आहे. सिद्धुजा मिश्रा यांनी त्यांचे सुरुवातीचे शिक्षण आझमगडमधूनच घेतले. त्यांनी लखनौ विद्यापीठातून एमए, बीएड आणि एलएलबीची पदवी मिळवली आहे. त्यांचं सासर हे प्रतापगड शहरात आहे.

२०१४ च्या निवडणुकीनंतर सिंधुजा मिश्रा यांनी त्यांचे पती शिव प्रकाश मिश्रासोबत भाजपमध्ये प्रवेश केला. शिवप्रकाश मिश्रा हे सैनिक होते. याआधी दोघेही नवरा बायको बसपामध्ये होते. 

सिंधुजा मिश्रा यांचे पती शिव प्रकाश मिश्रा यांनी २००७ आणि २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत कुंडा विधानसभा मतदारसंघातून बसपाच्या तिकीटावर राजा भैय्या यांना आव्हान दिले.

सिंधुजा मिश्रा यांनी सुद्धा २०१२ ची विधानसभा निवडणूक विश्वनाथगंजमधून बसपाच्या तिकिटावर लढवली होती, पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचवेळी २०१४ च्या पोटनिवडणुकीत त्यांनी नशीब आजमावले पण त्यांचा पराभव झाला.

आता असं असून सुद्धा भाजपने त्यांना उमेदवारी देण्यामागचं कारण बहुधा पैसा असावं. कारण राजा भैया उत्तर प्रदेशातले सगळ्यात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. त्यात त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करायचा म्हंटल्यावर पैसा असणं भाग आहे, म्हणूनचं कदाचित भाजपने सिंधुजा मिश्रा यांना संधी दिलीये.

आता सिंधुजा मिश्रा यांची संपत्ती पाहायची तर २०१२ मध्ये त्यांनी जेव्हा विश्वनाथगंजमधून निवडणूक लढवली होती, त्यादरम्यान त्यांनी निवडणूक आयोगाला आपल्या संपत्तीची माहिती दिली होती. त्यांच्याकडे ४ कोटी ३९ लाख २ हजार ४३८ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर २५ कोटी ६६ लाख ९० हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.

म्हणजेच एकूण सिंधुजा मिश्रा यांच्याकडे ३० कोटी ५ लाख ९२ हजार ४३८ रुपयांची संपत्ती आहे. कुंडा येथील भाजपच्या उमेदवार सिंधुजा मिश्रा या राज्यातील सर्वात श्रीमंत उमेदवारांपैकी एक आहेत. 

पण महत्वाचं म्हणजे कुंडा मतदारसंघात यंदाची लढत ही अटीतटीची असणार आहे. कारण भाजपच्या सिंधुज मिश्रा यांच्यासोबत सपाने सुद्धा आपला उमेदवार उभा करण्याची हिम्मत केलीये. २००२ नंतर पहिल्यांदाच प्रथमच समाजवादी पक्षाने कुंडा येथे उमेदवार उभा केला आहे. गुलशन यादव हे समाजवादी पक्षाकडून राजा भैय्या यांना आव्हान देणार आहेत. 

कदाचित ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा राजा भैय्यांना आपल्याला मतदारसंघात तिहेरी टक्कर मिळेल. त्यामूळे २७ फेब्रुवारीला मतदान होणाऱ्या या जागेवर नक्की कोणाचा कौल लागतो हे पाहणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाचं भिडू :

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.