सिंधुताई म्हणायच्या, “महाराष्ट्रात मोठं व्हायचं झालं तर मरावं लागतं”
महाराष्ट्रात मोठं व्हायचं झालं तर त्यासाठी मरावं लागतं…! हे वाक्य कुणा सामान्य माणसाचं नाही, तर जगण्याची आशा सोडलेल्या कित्येक जीवांना जगवणाऱ्या, घडवणाऱ्या माईंचं म्हणजेच ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री डॉ. सिंधुताई सपकाळ यांचं आहे.
आज त्या आपल्यात नाहीत पण त्यांनी कमावलेले कर्तृत्व आणि त्याच्या आठवणी हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.
‘अनाथांची माय’ हे बिरुद मिळवणं काय सोपं काम नव्हतंच…त्यामागचा त्यांचा संघर्ष फार मोठा आणि तितकाच कठीण होता.
सामाजिक अत्याचारांना बळी पडलेल्या सिंधुताईंनी महाराष्ट्रात अनाथाश्रम स्थापन केलेत. त्यांना अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करुन दिला. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली होती.
आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते.
त्यांचं जेवण, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. आणि म्हणूनच त्यांना अनाथांची माय म्हणलं जातं…
मध्यंतरी सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे झाला. मुलगी झाली म्हणून, त्यांचे नाव चिंधी ठेवले गेले. वर्धा जिल्ह्यातील जंगल भागातील नवरगाव ही त्यांची जन्मभूमी. बुद्धीने हुशार असलात तरी त्यांना शालेय शिक्षण घेता आलं नाही.
त्यात माईंचे लग्न अगदी लहान वयात लावले गेले जेव्हा त्या अगदी ९ वर्षाच्या होत्या, त्यातही त्यांना प्रचंड सासुरवास भोगावा लागला होता. माईंच्या चारित्र्याबद्दल संशय घेऊन सासरच्यांनी बेदम मारहाण करून त्यांना घराबाहेर हाकलून दिले. त्यानंतर त्या माहेरी गेल्या तर तिथे देखील त्यांना स्वीकारलं नाही. त्यानंतर त्या थेट जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर गेल्या आणि आत्महत्येचा पर्याय निवडला पण त्यांनी विचार बदलला आणि त्या माघारी फिरल्या, प्रयत्नही केला पण नंतर त्या मागे फिरल्या. दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या…आणि हजारो अनाथांच्या जीवनाचं सोनं केलं.
अशा या अनाथांच्या मायेला मात्र कित्येकदा उपेक्षाच सहन करावी लागली होती. त्या एकदा म्हणाल्या होत्या, “माझ्या आयुष्यातील सर्वाधिक काळ हा कर्नाटक राज्यात गेला जिथे आपण भिक्षा मागून दिवस काढले. त्याच राज्याने कर्नाटक भूषण हा पुरस्कार देवून आपले कौतूक केले.
कर्नाटकच्या शाळामधील अभ्यासक्रमात माझ्या जीवनाचा समावेश झाला. आतापर्यंत चार राष्ट्रपतींकडून मला गौरविण्यात आले. पण महाराष्ट्र सरकारने मात्र अद्याप दखल घेतली नाही”, असं म्हणत त्या खंत व्यक्त करत असायच्या.
कर्नाटक सरकारने सिंधूताईंच्या कार्यावर आधारित १० वीच्या अभ्यासक्रमांत विध्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी धडा देखील समाविष्ट केला आहे.
एकेकाळी रेल्वे स्टेशनला भीक मागून अनाथांचे पोट भरवणाऱ्या सिंधूताईंचे कर्तृत्व इतके प्रेरणादायी आहे की कर्नाटक सरकारने १९८८ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘मी वनवासी’ या आत्मचरित्रातील एक अध्याय १० वीच्या विद्यार्थ्यांसाठीच्या मराठी पाठ्यपुस्तकात समाविष्ट केला आहे. त्यामुळे शालेय वयात विध्यार्थ्यांना मिळालेले माईंच्या सामाजिक कार्याची शिकवण आणि प्रेरणा अनेक पिढीला कायम प्रेरणा देत राहील हे मात्र नक्की.
गेली 40 वर्षं त्या सामाजिक कार्य करत होत्या. आजवर सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. त्यांच्या संघर्षमयी जीवनावर आधारित “मी सिंधुताई सपकाळ” या चित्रपट दिखील आलेला. या चित्रपटाद्वारे सर्वांपर्यंत त्यांचा संघर्ष पोहोचला होता.
अनाथ बालकांसह महिलांसाठी जागतिक पातळीवर काम करता यावे, या हेतूने त्यांनी ‘मदर ग्लोबल फाउंडेशन’ या संस्थेची धर्मादाय आयुक्तालयात नोंदणी केली.
अनाथ मुलांना आईसारखी माया देणाऱ्या सिंधुताई ‘मी हजारहून अधिक मुलांची आई आहे’ असं अभिमानाने सांगत असायच्या. वर्षभरापूर्वी त्यांचं निधन झालं आणि तेव्हाही त्यांचं एक वाक्य अधोरेखित झालं, “महाराष्ट्रात मोठं व्हायचं झालं तर मरावं लागतं.”
हे हि वाच भिडू :
- मुरारबाजींनी दिलेरखानाची जहागीर लाथाडली , “मी शिवरायांचा सच्चा शिपाई आहे”
- …आणि मुलींनी खांद्यावर तिरडी घेत बुरसटलेल्या परंपरा जाळून टाकल्या
- ….म्हणून ती झाली ८ अनाथ लेकरांची ‘माय’…!!!