स्टॅलिन सरकार म्हणतंय, एकट्या, घटस्फोटित महिलाही आमच्यासाठी फॅमिलीच

आतापर्यंत तमिळनाडूमध्ये अविवाहित महिला आपल्या पालकांसोबत राहतात असं मानून त्या रेशनकार्डसाठी अर्ज करण्यास अपात्र होत्या. विवाहित महिलेला रेशनकार्डसाठी अर्ज करण्यासाठी घटस्फोट देणं बंधनकारक होतं.

आता मात्र स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीनं दमदार पाऊल उचलत एम के स्टॅलिन यांच्या नेतृत्वातल्या स्टॅलिन सरकारनं जबरदस्त निर्णय घेतला आहे. अविवाहित, घटस्फोटीत, आपल्या पती किंवा पालकांपासून विभक्त राहणाऱ्या महिलांना तमिळनाडूमध्ये ‘कुटुंबाचा’ दर्जा देण्यात येणार आहे.

आपल्या जोडीदारापासून कायदेशीररित्या विभक्त न होता स्वतंत्रपणे राहणाऱ्या महिलांना रेशनकार्ड मिळू शकत नसल्याच्या अनेक घटना पुढे आल्यानंतर हा बदल घडवून आणला जातोय. नव्या निर्णयानुसार, तमिळनाडूतल्या अविवाहित महिलांना रेशन कार्डसाठी अर्ज करण्यास कुटुंबांप्रमाणंच निकष असणार आहेत.

काय असतील हे निकष-

  • महिलांचं स्वयंपाकघर असावं
  • एकटं राहत असल्याची लिखित स्वघोषणा
  • महसूल निरीक्षकांकडून घराचं लेखापरीक्षण
  • आधार कार्ड आणि गॅस बिल

आता या नवीन धोरणामुळं काय होईल-

तर विभक्त होण्याच्या कायदेशीर प्रक्रियेत अडकलेल्या महिलांना रेशनकार्डमुळं अन्नसुरक्षा मिळू शकेल. आता रेशनकार्ड हे फक्त अन्नसुरक्षेचंच काम करणार नाही, तर पत्त्याचा पुरावा म्हणून रेशनकार्ड ग्राह्य धरत असल्यानं मुलांच्या शाळाप्रवेशासह इतर फायदेही मिळतील.

या क्रांतिकारी पावलाचं तमिळनाडूसह देशाच्या इतर भागांतूनही कौतुक होत आहे. सर्वच राज्यांनी या निर्णयाचं अनुकरण करावं अशी समाजमाध्यमांतून मागणीही केली जात आहे.

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.