मराठे लुटारू होते हा गैरसमज मोडून काढला एका बंगाली इतिहासकाराने
छत्रपती शिवरायांचा जन्म या मराठी मातीत झाला त्याला जवळपास ४०० वर्षे पूर्ण होतील. छत्रपतींच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास आजवर हजारो अभ्यासकांनी केला आहे.
जिवंतपणीच एक दंत कथा बनलेल्या शिवरायांचा पराक्रम महाराष्ट्राच्या प्रत्येक पिढीने मनात साठवला मात्र काही कारणाने महाराष्ट्राबाहेर अनेकदा मराठ्यांच्या बद्दल गैरसमजच पसरवले गेले.
पण आपल्या शास्त्रोक्त अभ्यासपूर्ण मांडणीने शिवरायांचा गौरवशाली इतिहास जगभरात पोहचवला त्याच नाव,
सर जदुनाथ सरकार
त्यांचा जन्म आज बांगला देशात असणाऱ्या राजशाही जिल्ह्यातील करचमारिया या गावी सधन कुटुंबात झाला. वडील जमीनदार असून बाह्मो समाजाच्या राजशाही शाखेचे विश्वस्त होते. त्यांचा इंग्रजी वाङ्मय व इतिहासविषयक ग्रंथ यांचा व्यासंग होता आणि त्यांचा ग्रंथसंग्रहही मोठा होता.
वडिलांच्या या व्यासंगाचे जदुनाथांवर संस्कार होणे सहाजिक होते.
ते इंग्रजी विषय घेऊन कलकत्ता विदयापीठातून एम्. ए. पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. कलकत्त्यातील रिपन कॉलेजात त्यांनी प्राध्यापक म्हणून नोकरी पत्करली. इंग्रजी अर्थशास्त्र व इतिहास या विषयांच अध्यापन त्यांनी केलं.
याकाळात त्यांनी जगभरातील अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. मुघल बादशाह औरंगजेबाचा इतिहास हा त्यांच्या डॉक्टरेटसाठीचा विषय होता. मोगलकालाविषयीचे त्यांचे संशोधन-लेखन आणि त्यांनी काढलेले अभ्यासपूर्ण निष्कर्ष बऱ्याच प्रमाणात मान्य झाले.
औरंगजेबाचा इतिहास शोधताना त्यांचं लक्ष छत्रपती शिवाजी महाराजांकडे आकर्षित झालं.
एवढ्या महासामर्थ्यशाली साम्राज्याच्या बादशहासमोर मराठ्यांच्या एक छोटंसं राज्य आव्हान उभं होत. ते संपवण्यासाठी आलमगिर स्वतः दक्षिणेत जातो आणि 25 वर्षे प्रयत्न करूनही त्यात अयशस्वी ठरतो व त्याच राज्यात मरून जातो.
हे सगळं जदुनाथ सरकार यांच्या साठी अविश्वसनीय होतं.
औरंगजेबाला नामोहरम करणाऱ्या मराठी सत्तेची प्रेरणा ठरणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांनी जवळून अभ्यास केला. त्यातूनच जन्म झाला
शिवाजी अँड हिज टाइम्स या पुस्तकाचा.
हे पुस्तक त्यांनी १९१८ साली लिहिलं. पाटण्याच्या महाविद्यालयात शिकवत असताना त्यांची रियासतकार गो. स. सरदेसाई यांबरोबर ओळख झाली. ही मैत्री अखेरपर्यंत टिकली. सरदेसाईं-मुळे त्यांना महाराष्ट्रातील ऐतिहासिक साधने, विशेषत: बखर वाङ्मय हाताळता आले.
सरकारांनी मराठी बखर वाङ्मयाबरोबरच तत्कालीन पाश्चात्त्य लेखकांचे वृतांत अणि फार्सी ऐतिहासिक साधनांचा तुलनात्मक अभ्यास करून शिवचरित्र लिहिले.
शिवाजी अँड हिज टाइम्स नंतर हाउस ऑफ शिवाजी (१९४०) हा ग्रंथ आणि शिवाजी ए स्टडी इन लिडरशिप (१९४९) ही पुस्तिका त्यांनी प्रसिद्ध केली.
सरकारांचे हे शिवचरित्र उपलब्ध शिवचरित्रांत एक साक्षेपी व वस्तुनिष्ठ चरित्र ठरले.
इंग्रजीत हे चरित्र लिहिल्यामुळे महाराष्ट्राबाहेर महाराजांचे चरित्र ज्ञात झाले. उत्तरेत विशेषतः गुजरात व बंगालमध्ये मराठ्यांची छबी लुटारू अशी बनली होती ती मोडण्यामध्ये जदुनाथ सरकार यांचा सिंहाचा वाटा आहे.
छत्रपतींची संघराज्य कल्पना, स्वतंत्र हिंदवी राज्याची कल्पना आणि लष्करी डावपेच यांची ओळख जगाला करून दिली. ते म्हणतात,
“राष्ट्रनिर्माता म्हणून मान्यता पावणे यासारखे मनुष्याच्या आयुष्यात भव्य कोणतेही श्रेष्ठ विधिलिखित असू शकत नाही, नेमके हेच महत्कृत्य शिवाजी महाराजांनी करून दाखवले. शिवाजी महाराज झाले नसते, तर मराठी माणसांच्या आयुष्याची दिशा वेगळ्याच दिशेने मार्गक्रमण करत गेली असती आणि आजच्या भारताच्या इतिहासालाही एक वेगळेच वळण लागले असते, हे सत्य कोणालाही नाकारता येणार नाही.”
जदुनाथ सरकारांना इंग्रजी, बंगाली, संस्कृत व फार्सी सोबत फ्रेंच व जर्मन, पोर्तुगीज, हिंदी व मराठी याही भाषांची ओळख होती. त्यांनी आपले बहुतेक सर्व लेखन इंग्रजीतून केले.
त्यांची शैली डौलदार, ओघवती आहे भाषा थोडी अवजड असली तरी मांडणी विश्लेषणात्मक, विवेचनात्मक व शास्त्रशुद्ध आहे. सत्य ऐतिहासिक घटना निवेदन करताना ते कोणतीही भीडभाड बाळगत नसत.
भारतातील मध्ययुगीन इतिहासावर मौलिक संशोधन करणारा पहिला इतिहासकार म्हणून त्यांचे स्थान मोठे आहे.
त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय वर्तुळात मान्यता मिळाली आणि मानसन्मान लाभले. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ब्रिटिश राजसत्तेने त्यांना सर (नाईट) हा किताब प्रदान केला.
अनेकदा इतिहास लिहिताना केलेल्या परखड विचारांमुळे ते टीकेचे धनी बनले, सर्व बाजूच्या विचारसरणीच्या अभ्यासकांनी त्यांच्यावर टीका केली. त्यांना ब्रिटिशधार्जिना इतिहासकार म्हणून संभावना देखील केली.
मात्र सर जदुनाथ सरकार हे भारतातील आजवरचे सर्वात मोठा इतिहासकार होते याबद्दल त्यांचे टीकाकार ही शंका घेणार नाहीत.
पाटणा महाविदयालयातून इतिहास प्रमुख म्हणून निवृत्त झाल्यावर कलकत्ता विदयापीठाचे ते कुलगुरू म्हणून काम पाहिलं.
आपले उर्वरित जीवन त्यांनी दार्जिलिंग व कलकत्ता येथे वाचन-इतिहासलेखन व संशोधन यांत व्यतीत केले. शेवटच्या काळात सर्व हस्तलिखिते एशियाटिक सोसायटीकडे सुपूर्द केली.
१९ मे १९५८ रोजी कलकत्त्यामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हे ही वाच भिडू.
- प्राचीन महाभारताची मूळ आवृत्ती शोधण्याचं श्रेय या मराठी माणसाला जाते.
- खंडोबा आणि धनगर संस्कृतीचा इतिहास समोर आणला तो जर्मनीच्या गुंथर सोंथायमरने
- आपल्या अनेक पिढ्यांना शिवरायांच्या इतिहासाची ओळख या शाहिरांच्या पोवाड्याने करून दिली.