भुयाराची चर्चा सगळीकडे होतीये, पण त्याआधी जे जे हॉस्पिटलचा इतिहास वाचा.
मुंबईच्या अनेक ऐतिहासिक इमारतीपैकी एक असणाऱ्या जे जे हॉस्पिटलच्या इमारतीखाली एक भुयार सापडलं आहे. हॉस्पिटलच्या डिलिव्हरी वॉर्ड आणि चिल्ड्रेन वॉर्डच्या दरम्यान असलेल्या या भुयारामुळे हे हॉस्पिटल चर्चेत आलं आहे.
या भुयाराची निर्मिती का करण्यात आली याचा शोध अजून घ्यायचा आहे, परंतु लोकांकडून या भुयाराच्या निर्मितीमागे अनेक कयास लावले जात आहेत.
काहींच्या मते दोन वॉर्डांना जोडण्यासाठी हा भुयार बांधण्यात आला होता तर काहींच्या मते आपत्कालीन परिस्थितीमध्ये महिला आणि बालकांना बाहेर काढण्यासाठी हे भुयार बांधण्यात आलं होतं. या कयासा लावण्यात येत आहे. त्याचबरोबर इमारतीचं बांधकाम करणाऱ्यांनी या भुयाराची निर्मिती करताना फार दूरदृष्टीने विचार केला होता अशी चर्चा सुद्धा केली जात आहे.
पण भिडूंनो निव्वळ हे भुयार नाही तर संपूर्ण हॉस्पिटल उभारतांना सर जमशेटजी जीजीभाई यांनी दूरदृष्टीने विचार केला होता.
सर जमशेटजी जीजीभाई यांचा या हॉस्पिटलमागे असलेला दूरदृष्टीकोन समजून घेण्यासाठी पहिल्यांदा मुंबईमधील मेडिकल कॉलेजचा इतिहास समजून घ्यावा लागेल. जेव्हा भारतावर ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं तेव्हा कंपनीकडून स्वतःच्या व्यापारी फायद्याचे निर्णय घेण्यात येत होते, पण भारतीयांच्या विकासासाठी घेतलेले निर्णय होते.
कारण मोजक्याच ब्रिटिश अधिकाऱ्यांनी भारतीयांना चांगल्या सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी फार कमी अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले. त्यापैकीच दोन अधिकारी होते माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन आणि सर रॉबर्ट ग्रँट. हे दोन्ही बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर होते. दोघांच्या काळात मुंबईमध्ये अनेक कॉलेज आणि दवाखान्यांची स्थापना करण्यात आली होती.
यांच्या प्रयत्नांमुळेच मुंबईत स्थापनझालेलं कॉलेज म्हणजे मुंबईच मेडिकल कॉलेज..
मुंबईमध्ये शैक्षणिक सुधारणांचे जनक मानले जाणारे माउंट स्टुअर्ट एल्फिस्टन हे १८१९ ते १९२७ असे १८ वर्ष बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर होते. त्यांनी मुंबईत पाश्चिमात्य शिक्षण देणाऱ्या कॉलेजची पायाभरणी केली होती. परंतु त्यांनी एवढ्यावरच समाधान मानलं नाही. त्यांच्या प्रयत्नाने १८२६ मध्ये मुंबईतील दानवीर मंडळी आणि ईस्ट इंडिया कंपनीच्या निधीतुन मुंबईत एक मेडिकल कॉलेज उभं करण्यात आलं होत.
या मेडिकल कॉलेजची स्थापन झाल्यानंतर अवघ्या एका वर्षातच एल्फिस्टन यांची बदली झाली. त्यांच्या बदलीनंतर दुसऱ्या गव्हर्नरनी सुद्धा ते मेडिकल कॉलेज सुरु ठेवलं, परंतु एल्फिस्टन नंतर ७ वर्षाच्या काळात मुंबईत ४ गव्हर्नर बदलले. या अस्थिरतेचा फटका मुंबईच्या कॉलेजला बसला आणि मेडिकल कॉलेजची दुरावस्था झाली.
या दुरावस्थेमुळेच अवघ्या ६ वर्षानंतर मुंबईचं मेडिकल कॉलेज बंद करण्यात आलं.
१८३३ मध्ये कॉलेज बंद झालं पण त्याकडे कोणी लक्ष दिलं नाही. मात्र १९३५ मध्ये सर रॉबर्ट ग्रँट हे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर झाले. पदभार सांभाळल्यानंतर मुंबईत वैद्यकीय सुविधेअभावी मोठ्या संख्येने लोकं मृत्युमुखी पडत आहेत याची जाणीव त्यांना झाली. मुंबईत मरणाऱ्या लोकांना बघून रॉबर्ट ग्रँट यांनी मुंबईमध्ये मेडिकल कॉलेज आणि शैक्षणिक हॉस्पिटल असायला हवं असा प्रस्ताव कंपनीपुढे मांडला.
त्यांनी हा प्रस्ताव लंडनला पाठवला परंतु याच उत्तर यायला बराच उशीर झाला. कंपनीकडून उत्तर येण्याआधीच १८३८ मध्ये रॉबर्ट ग्रँट यांचं निधन झालं. त्यांच्या निधनानंतर अवघ्या ९ दिवसांनी कंपनीने मेडिकल कॉलेजला मंजुरी दिल्याचं पत्र आलं. रॉबर्ट ग्रँट यांनी मांडलेल्या प्रस्तावाला कंपनीने मंजुरी दिली परंतु हे बघायला रॉबर्ट ग्रँट हयात नव्हते.
मात्र ग्रँट यांच्या कामाची दखल घेऊन नाना शंकरशेठ यांनी प्रस्तावित मेडिकल कॉलेजला सर रॉबर्ट ग्रँट यांचं नाव द्यावं अशी मागणी केली.
पुढे कंपनीने निधी मजूर केल्यानंतर १८४३ मध्ये या मेडिकल कॉलेजची पायाभरणी झाली. कंपनीने मेडिकल कॉलेजला निधी दिला परंतु यासोबत बांधण्यात येणाऱ्या शैक्षणिक रुग्णालयाला निधी दिला नाही. नवीन हॉस्पिटल बांधण्याऐवजी जुन्याच नेटिव्ह हॉस्पिटलमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याची मान्यता देण्यात आली.
एकीकडे चांगल्या मेडिकल कॉलेजची इमारत बांधली जात होती पण मेडिकलच शिक्षण हे काही वर्गखोल्यांमध्ये बसून घेण्याचं शिक्षण नव्हतं. यासाठी कॉलेजकरीता एक शैक्षणिक रुग्णालय असणं गरजेचं होतं. हीच गरज लक्षात घेऊन सर जमशेटजी जीजीभाई यांनी ग्रँट मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्पिटल बांधायला १ लाख रुपयांची देणगी दिली.
या देणगीतून १८४३ साली ग्रँट मेडिकल कॉलेज सोबतच जे जे हॉस्पिटलची सुद्धा पायाभरणी करण्यात आली.
१८४३ मध्ये या दोन्ही संस्थांचं बांधकाम सुरु झालं आणि १८४५ मध्ये काम पूर्ण करून हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज जनतेसाठी उघडण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत गेली १७७ वर्ष जे जे हॉस्पिटल आणि ग्रँट मेडिकल कॉलेज मुंबईसह देशातील सामान्य नागरिकांना सुविधा देत आहे.
आज हे कॉलेज देशातील टॉप १० मेडिकल कॉलेज पैकी एक आहे. या मेडिकल कॉलेजमध्ये रॉबर्ट कॉच यांनी शोधलेली कॉलराची लस आणि सर हाफकिन यांनी शोधलेल्या प्लेगच्या लशीचं प्रमाणीकरण करण्यात आलं होतं.
आज या मेडिकल कॉलेजमध्ये जे जे हॉस्पिटल सोबतच सेंट जॉर्ज हॉस्पिटल, गोकुळदास तेजपाल हॉस्पिटल, कामा हॉस्पिटल आणि अलब्लेस हॉस्पिटल हे रुग्णालयं सुद्धा सेवा देत आहेत. परंतु सर जमशेटजी जीजीभाई यांनी स्थापन केलेल्या रुग्णालयापासूनच याची सुरुवात झाली होती. त्यामुळे या रुग्णालयाला जे जे हॉस्पिटल म्हणूनच ओळखलं जातं. हे रुग्णालय उभारण्यामागे सर जमशेटजी जीजीभाई यांनी किती दूरवरचा विचार केला होता याची प्रचिती आजही येत आहे.
हे ही वाच भिडू
- इंग्रजांमुळे नाही तर नानांमुळे भारतात रेल्वे आली.
- राजस्थानी, गुजराती नाही मुंबईला मोठ्ठ करणारा हा माणूस ‘मराठी’ होता
- बी जे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने आदिवासी मुलं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करत आहेत