बडोद्याच्या महाराणी एक फोन करण्यासाठी विमानाने अमेरिकेवरुन लंडनला गेल्या होत्या.

भारतातील राजा-महाराजांचा जमाना जावून आता ७० ते ८० वर्षांचा काळ झालायं. पण आज इतक्या वर्षानंतर देखील बहुतांश राजे-महाराजे आणि त्यांची शाही घराणी हे आपले शौर्य, पराक्रम, प्रजाहित, सेवा, स्वाभिमान अशा विविध गोष्टींसाठी ओळखली जातात. त्यांच्या पराक्रमांचा अभिमान वाटावा, त्यांच्या कार्याचं कौतुक वाटावं अशा एकाहून एक सुरस कथा वाचायला मिळतात.

तर दुसऱ्या बाजूला यातीलच काही राजे- महाराजे आणि त्यांचे घराणी हे अशा एखाद्या पराक्रमासाठी नाही तर त्यांची श्रीमंती, संपत्ती, बंगले, अय्यशी कशी आणि किती होती या कारणासाठी ओळखली जातात. त्यांच्या कुटुंबीयांची कशी पैशांची उधळपट्टी चालू असायची यांचे दाखले दिले जातात.

अशाच या श्रीमंत आणि अय्याशीच्या किस्यांसाठी प्रसिद्ध होते बडोद्याचे प्रतापसिंह गायकवाड महाराज यांच्या पत्नी आणि महाराणी सीता देवी.

यातील सीता देवींच्या श्रीमंतीचे किस्से म्हणजे एक दंतकथा वाटावी असेच होते. यात अगदी खास फोन वर बोलायला अमेरिकेवरून लंडनला जाण्यापासून ते प्रवासावेळी १ हजार साड्या आपल्या सोबत अशा बऱ्याच गोष्टी होत्या.

या सीतादेवी मूळच्या मद्रासच्या. आंध्र प्रदेशच्या पीठापुरमचे महाराजा सूर्य राव आणि त्यांची महाराणी चिन्नम्मा यांची लाडात वाढलेली मुलगी. त्यांचं पाहिलं लग्न वायपूरचे जमीनदार एमआर आप्पाराव बहादुर यांच्याशी झालं होतं. त्यांच्यापासून ३ मुलं पण झाली.

सीता देवी मुळातच चैनखोर स्वभावाच्या, मोठं-मोठ्या पार्ट्यांमध्ये जाणं-येणं होतं असायचं. हैद्राबादच्या निजामाची सून प्रिन्सेस निलोफर ही त्यांची खास मैत्रीण. सौंदर्य आणि स्टाईलमुळे त्या लोकांचं अगदी सहज लक्ष वेधून घ्यायच्या.

अशातच १९४३ मध्ये त्यांची भेट मद्रास हॉर्स रेस कोर्समध्ये त्यावेळचे जगातील ८ वे श्रीमंत व्यक्ती आणि बडोद्याचे महाराज प्रतापसिंह गायकवाड यांच्याशी झाली. प्रतापसिंहच्या श्रीमंतीच्या चर्चा केवळ देशातच नाही तर अगदी विदेशात व्हायच्या.

हे दोघे जेव्हा एकमेकांना भेटले तेव्हा ‘पहली नजर का प्यार’ वगैरे असं काही तरी झालं. दोघांनी एकमेकांना नजरेनंच आपल्या प्रेमाची कबुली देवून टाकली होती.

त्यावेळी सीता देवी आणि प्रतापसिंह महाराज केवळ विवाहित असण्यासोबतच पालक पण होते. सीतादेवी या तीन मुलांची आई होत्या, तर प्रतापसिंह महाराज हे चार मुलांचे वडील. पण प्रेम दोघांनाही थांबवू शकतं नव्हतं. त्यांनी लग्न करण्याच्या निर्णय घेतला.

मात्र इथं सीता देवी यांचा पहिला नवरा आडवा येत होता. आप्पाराव यांनी घटस्फोटाची गोष्ट ऐकल्यानंतरच जागचे उडाले. आणि वेगळं होण्याचं तर लांबच पण काहीही झालं तरी घटस्फोट देणार नाही असं सीतादेवींना निक्षून सांगितलं. आप्पारावांनी प्रतापसिंह गायकवाड यांना देखील आपल्या बायकोपासून लांब राहण्याचं बजावलं.

त्यावर सीता देवी आणि प्रतापसिंह यांनी कायदेशीर मार्ग शोधला. तो होता धर्म बदलण्याचा. प्रतापसिहांच्या कायदेशीर सल्लागारांनी सीता देवींना मुस्लिम धर्म स्वीकारण्यास सांगितलं. त्यांनी देखील तत्परतेने हा सल्ला स्वीकारला. पण यानंतरही आप्पारावांनी घटस्फोट द्यायला नकार दिला.

यानंतर मात्र सीता देवींनी एक तलाकनामा तयार केला. मुस्लिम असल्यामुळे एका गैर-मुस्लिम पुरुषासोबत आपण राहू शकत नाही, असा त्यांनी दावा केला. मुस्लिम रीतिभाती आणि परंपरांच्या नुसार न्यायालयातून त्यांना घटस्फोट मंजूर झाला. 

मात्र अजूनही दोघांच्या लग्नात अडचणी येणार होत्या.

इंग्रज शासनाने महाराजांच्या दुसऱ्या लग्नवर कायदेशीर खोटं काढून आक्षेप घेतला. बडोद्यामध्ये कायदा होता की, पहिली बायको जिवंत असेल तर घटस्फोट घेतल्याशिवाय दुसरं लग्न करता येत नाही. पण महाराजांच्या अखेरीस बऱ्याच प्रयत्नानंतर ‘महाराज’ या नात्याने त्यांना सूट मिळाली.

पण अट ठेवली कि, प्रतापसिंह महाराज यांच्या नंतर त्यांच्या गादीचा उत्तराधिकारी हा पहिल्या बायकोचाच मुलगा असेल.

यानंतर सीता देवी यांनी पुन्हा धर्म बदलला. आर्य समाजाच्या पद्धतीने हिंदु धर्मात प्रवेश केला. तिन्ही मुलांना आधीच्या नवऱ्याकडे सोडून प्रतापसिंह महाराजांसोबत त्या विवाहबद्ध झाल्या.

त्या दरम्यानच जग दुसऱ्या महायुद्धात अडकलं होतं. १९४६ मध्ये दुसरं महायुद्ध संपल्यानंतर महाराज सीता महाराणींना घेऊन युरोप फिरायला निघून गेले. त्यामागे असा देखील एक विचार होता की, भारतात राहण्यास इच्छुक नसलेल्या सीतादेवींना युरोपमध्येच एखादं आलिशान घर खरेदी करून द्यायचे.

युरोपमधील बरेच देश फिरल्यानंतर महाराणी सीतादेवी यांना मोनॅको देश आवडला. प्रतापसिंहांनी त्यांच्यासाठी तिथं अलिशान ‘किलेनुमा’ बंगला खरेदी केला. मोनॅकोच्या राजा-राणीने देखील सीतादेवीचं स्वागत केलं. महाराजांनी बडोद्यातून बरचं किमती सामान आणि दागिने मोनॅकोला पाठवून दिलं. या दरम्यानच दोघांना एक मुलगा देखील झाला.

महाराणींची प्रतिमा युरोपमध्ये हळू हळू मनमुराद पैसे उधळणाऱ्या आणि आलिशान आयुष्य जगणाऱ्या महाराणी अशी झाली.

१९४७ मध्ये भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर बडोदा संस्थानाचे भारतात विलीनीकरण झालं. पण जेव्हा संस्थानची तिजोरी बघितली गेली तेव्हा ती संपूर्ण रिकामी होती. अनेक किमती वस्तू गायब होत्या. त्या महाराजांनी आधीच मोनॅकोला पाठवल्या होत्या. महाराणींनी त्या परत करण्यास साफ नकार दिला. त्या सगळ्या वस्तूंची मालकी महाराजांनी त्यांना दिली होती.

महाराणी सीता देवींनी हे सगळे जुने दागिने पॅरिसचे डिझायनर फर्म ‘वान क्लीफ’ यांना दिले. आणि त्यांच्याकडून अत्याधुनिक डिझाइनचे दागिने बनवून घेतले. याच कंपनीने त्यांच्यासाठी सोन्याचा ‘टंग क्लिनर’ बनवून दिला होता.

सीतादेवींच्या जवळ तीन लेयरचा हिऱ्यांचा हार देखील होता. त्या हारात जगप्रसिद्ध असा ‘Star of the South’ हा १२८.८० कॅरेटचा गुलाबी ब्राझिलीयन हिरा होता. आणि सोबतच ७८.५३ कॅरेटचा ‘English Dresden’ हा हिरा पण होता.

सीता देवी यांच्या सन्मानार्थ ‘फ्रेंच फॅक्टरी साडी & कंपनी’ सुरु केली होती. बाहेर प्रवासासाठी जाताना त्या या फॅक्टरीमधून शिफॉनच्या १ हजार साड्या, त्यावर मॅचिंग चप्पल आणि पर्स हे सगळं सोबत घेवून जायच्या.

महाराणी सीता देवी यांनी युरोपमध्ये आपली खास ओळख बनवली होती. तिथल्या अनेक मोठं-मोठ्या लोकांमध्ये उठणं-बसणं चालू असायचं. उच्चभ्रुंच्या पार्टीच्या त्या खास चेहरा असायच्या. त्यावेळी सीता देवी यांची संपत्ती ३०० मिलियन डॉलर म्हणजे भारतीय चलनात त्याकाळी जवळपास २ हजार २०० कोटी रुपयांची होती.

महाराणी कधी युरोपमध्ये तर कधी अमेरिकेमध्ये फिरत असायच्या.

अशाच एकदा महाराणी अमेरिकेमध्ये सुट्टीवर होत्या. तिथून त्यांना प्रतापसिंह महाराजांशी फोनवर बोलण्यास अडचण येत होती. तर त्यांनी लंडनला येऊन फोन करण्याचा निर्णय घेतला. त्या विमानाने लंडनला आल्या, फोनवर बोलल्या आणि एका दिवसात सुट्टीसाठी पुन्हा अमेरिकेला परतल्या.

महाराणीच्या या अशा उधळखोरीमुळे काही वर्षातच त्यांची संपत्ती बऱ्यापैकी घटली. भारतातील राजेशाही नाहीशी झाल्यामुळे महाराजांचा स्रोत देखील आटला होता. खजिना संपल्यात जमा होता. यामुळे दोघांचे अनेकदा खटके उडायचे. परिणामी लग्नाच्या १३ वर्षातच म्हणजे१९५६ मध्ये महाराणी सीता देवींनी प्रतापसिंह महाराजांपासून घटस्फोट घेतला.

यानंतर देखील सीता देवी कर्ज काढून खर्च करू लागल्या होत्या. उरलेले महागडे दागिने विकण्यास सुरुवात केली. मुलगा ड्रग्स आणि दारूच्या आहारी गेला. १९८५ साली त्यातच त्याचा मृत्य झाला. सीता देवींना देखील हा धक्का सहन झाला नाही. चार वर्षातच पॅरिसमध्ये वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. पुढे त्यांच्या मृत्युनंतर फॅक्टरी देखील बंद केली.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.