जगभरात भरतनाट्यम पोहचवणाऱ्या सितारादेवी एका शापामुळं चर्चेत आल्या होत्या

गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी ज्या अभिनेत्रीला नृत्य सम्राज्ञी अशी पदवी देऊन गौरवले होते ती अभिनेत्री म्हणजे सितारा देवी. या सितारादेवीने कथक आणि भरतनाट्यम या दोन्ही नृत्य प्रकारात आपल्या देशाचे नाव जगभर गाजवले. तिच्या अनेक नृत्याच्या मैफिलीने जगभरातील नृत्य प्रेमी तृप्त झाले.

ही सितारा देवी एकेकाळी महान दिग्दर्शक के आसिफ यांची पत्नी होती! के असिफ यांनी ‘मुगल-ए-आजम’ या भव्य आणि दिव्य चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केले होते.

या सिनेमाच्या निर्मितीच्या वेळी सितारा देवी के. असिफ सोबत रहात होती. पण या दोघांचा वैवाहिक जीवन फारसे सुखी झाले नाही झाले. सितारादेवी यांचे नासिर अहमद खान यांच्यासोबत लग्न झाले होते. ते के. असिफ यांचे मेव्हणे होते. (असिफ यांची बहिण नसीर अहमद खान यांची पहिली पत्नी होती!) 

असिफ त्यावेळी अत्रे पिक्चर्स मध्ये टेलरचे काम करत होते. परंतु त्यांच्या डोळ्यात भव्य स्वप्न होते. त्यांनी ‘फूल’ हा चित्रपट सुरुवातीला दिग्दर्शित केला. हळूहळू ते आपल्या मेव्हण्याच्या दुसऱ्या बायको कडे म्हणजेच सितारादेवीकडे आकर्षित झाले. नंतर तिच्यासोबत त्यांनी निकाह केला. 

त्यावेळी ‘मुगल ए आझम’ या चित्रपटाच्या निर्मितीचे व्यस्त होते. या चित्रपटात निगार सुलताना यांना एखादी भूमिका द्यावी अशी विनंती खुद्द सितारादेवी हिनेच आपल्या नवऱ्याकडे केली. निगारला या सिनेमात  ‘बहार’ ची  महत्त्वाची भूमिका मिळाली. परंतु या दरम्यान निगार सुलताना आणि के असिफ यांच्यात आंख मिचौली सुरू झाली आणि ते असिफने निगार सोबत लग्न केले.

सितारादेवी मनोमन खूप नाराज झाली. 

पुढे हा चित्रपट निर्मिती अवस्थेत असताना के. असिफ यांचे दिलीप कुमार यांच्या घरी बऱ्याचदा जाणे व्हायचे. या काळात त्यांची नजर दिलीप कुमारची बहिण सरदार अख्तर वर पडली. झालं… पुन्हा त्या दोघांमध्ये नेत्र पल्लवी सुरू झाली आणि चित्रपट पूर्ण व्हायच्या आधीच के आसिफ आणि सरदार अख्तर यांनी निकाह केला. या लग्नामुळे दिलीप कुमार के असिफ वर खूपच नाराज झाले. 

त्यामुळेच मुगल-ए- आजमच्या प्रीमियरला दिलीप कुमार गैरहजर होते. सरदार अख्तर आणि के असिफ यांच्या लग्नामुळे सितारा देवी खूपच नाराज झाली. ती भयंकर चिडली. असिफ  सोबत भांडली, कारण दिलीप कुमार सोबत तिचे खूप चांगले संबंध होते. 

 आपल्या मित्राच्या बहिणीला असिफ फसवतोय असे तिला वाटले. त्यामुळे तिने चिडून असिफ चक्क शाप दिला ,”तुम बे मौत मरोगे और तुम्हारा मरा हुआ मुह भी देखने मै नही आऊंगी!” असे म्हणून सितारा के आसिफ यांच्या आयुष्यातून बाजूला झाली. पुढे तिने प्रदीप बारोट यांच्यासोबत लग्न केले.

 सितारादेवी असिफच्या आयुष्यातून दूर झाली आणि आसिफचे दिवसच पालटले. 

‘लव अँड गॉड’ या चित्रपटाची निर्मिती के असिफ यांनी सुरू केली होती. त्याला लैला मजनू या कथेला पडद्यावर आणायचे होते. यासाठी त्यांनी गुरुदत्तला अभिनेता म्हणून घेतले. नायिकेच्या भूमिकेत निम्मी होती. परंतु गुरुदत्त ने १९६४ साली  आत्महत्या केली आणि चित्रपटाच्या निर्मितीत खिळ बसली. 

नंतर असिफ हिम्मत हरला नाही त्याने संजीव कुमारला घेऊन चित्रपट पूर्ण करायचे ठरवले. पैशाचा मोठा प्रश्न होता. सगळीकडून अडचणी होत्या. तरी आसिफ खचला  नाही आणि त्याने संजीव कुमार सोबत पुन्हा सर्व सिनेमा री शूट करायचे ठरवले. परंतु ९ मार्च १९७२ रोजी के आसिफ यांचेच वयाच्या ५० व्या वर्षी  निधन झाले.

सितारा देवी यांचा भाचा अभिनेता गोपीकृष्ण याने फोन करून सितारा देवीला सांगितले “असिफ साब नही रहे….” सिताराने मनोमन के. असिफ प्रेम केलं होतं. ती त्याला दिलेला शाप विसरली आणि धावत पळत असिफ यांच्या अंत्यसंस्कारात सामील झाली. 

कलावंतांचे प्रेम आणि त्यांचे प्रेम प्रकरणे ही वेगळीच असतात. कचकड्याच्या दुनियेतील या प्रेमाला आपण व्यावहारिक दुनियेतील प्रेमाच्या मोजमापाच्या फुटपट्ट्या लावू शकत नाही. पुढे सरदार अख्तर हिने ‘ लव अँड गॉड’ हा चित्रपट पूर्ण करण्याचा विडा उचलला. त्याचे पुन्हा शूटिंग सुरू झाले. पण पुन्हा दुर्दैवाने संजीव कुमार यांचे निधन झाले.

पुढे कसाबसा हा चित्रपट पूर्ण होऊन १९८५  साली  हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या प्रीमियरला सितारा देवी उपस्थित होती. पुढे सितारा देवीला पद्मश्री, संगीत नाटक अकॅडमी अवॉर्ड, असे अनेक पुरस्कार मिळाले. २०१२ साली तिचे निधन झाले. गुगलने तिच्या सन्मानार्थ २०१७ साली तिच्या जन्मदिनी तिचे गूगल डूडल बनवले होते.

– भिडू धनंजय कुलकर्णी

 

Leave A Reply

Your email address will not be published.