फिजीमध्ये भारतीयांना डावलून काहीच करता येत नाही, त्यांच्या पंतप्रधानांचंच उदाहरण बघा

भारतातील कोणत्या ना कोणत्या राज्यात पक्षाचा अंतर्गत कलह असो की मग वेगवगेळ्या पक्षांकडून करण्यात येणारे ऑपरेशन असोत सत्ता अनेकदा बदलत असतात. आता हे निव्वळ भारतापुरतेच मर्यादित आहे का तर नाही असे  प्रकार जगभरातील लोकशाही देशांमध्ये चालत असतात.

पण यात असाही एक देश आहे जिथे भारतीय वंशाच्या नागरिकांचा विरोध करणाऱ्या व्यक्तीने तीन पक्षांची आघाडी केली आणि दुसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान म्हणून निवडून आले आहेत. 

या तीन पक्षांच्या आघाडीचे निर्माते दुसरे तिसरे कुणी नसून फिजीचे पंतप्रधान सितीवेनी राबुका आहेत.

दर ४ वर्षांनी फिजीच्या संसदेतील एकूण ५५ जागांसाठी निवडणूक होतात. या निवडणुकीत फिजीमधील चार पक्ष स्वतःचे उमेदवार रिंगणात उतरवतात ज्यात फिजी फर्स्ट, पीपल्स अलायन्स हे दोन प्रमुख पक्ष आहेत. तर सोशल डेमोक्रेटिक लिबरल पार्टी आणि नॅशनल फेडरेशन पार्टी हे दोन छोटे पक्ष आहेत. २०१४ आणि २०१८ च्या निवडणुकांमध्ये फिजी फर्स्ट पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं आणि फ्रॅंक बैनीमारामा हे ८ वर्षांपासून देशाचे पंतप्रधान होते.

परंतु नुकत्याच १४ डिसेंबरला झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत फिजी फर्स्टला ५५ पैकी २६ जागा मिळाल्या आणि तोच पक्ष सर्वाधिक बहुमत घेऊन निवडून आला. याउलट पीपल्स अलायन्सला २१ जागा मिळाल्या आणि पक्ष पुन्हा एकदा विरोधी बाकावरच बसला अशी चर्चा सुरु झाली.

मात्र सितीवेनी राबुका यांनी दोन्ही लहान पक्षांना सोबत घेऊन तीन पक्षांची आघाडी उभी केली.

या आघाडीकडे पीपल्स अलायन्सचे २१ खासदार, सोशल डेमोक्रेटिक लिबरल पार्टी ३ खासदार आणि नॅशनल फेडरेशन पार्टीचे ५ अशा एकूण २९ खासदारांच्या पाठिंब्याने सितीवेनी राबुका हे फिजीचे दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले. राबुका यांच्या आघाडीने फ्रॅंक बैनीमारामा यांची १६ वर्षांची राजवट उलथून लावली आहे.

सितीवेनी राबुका हे मुळात लष्करी अधिकारी असून त्यांनी न्यूझीलँडच्या आर्मी स्कूलमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर भारतातील डिफेन्स सर्व्हिस स्टाफ कॉलेजमधून पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केलं.

पण आता इतक्या लांब फिजीमध्ये भारतीय वंशाच्या लोकांचा विरोध करणारा व्यक्ती पंतप्रधान झाला हे अनेकांना महत्वाचं वाटत असेल, पण फिजीमधील लोकांसाठी ही गोष्ट फार महत्वाची आहे. 

एकूण ३२२ बेटांचा समूह असलेल्या या देशाची एकूण लोकसंख्या २०१८ च्या जनगणनेनुसार ९ लाख २८ हजार इतकी आहे. ज्यात ३७ टक्के नागरिक भारतीय वंशाचे असून २८ टक्के नागरिक हिंदू धर्मीय आहेत. फिजीमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदी भाषा बोलली  जाते आणि १९९७ पासून हिंदी ही फिजीची राष्ट्रभाषा आहे.

फिजीमध्ये अनेक हिंदू मंदिरं असून शिवसुब्रमण्यमी हे फिजीतील सर्वात मोठे हिंदू मंदिर आहेत. फिजीत सर्व मोठे हिंदू सण जसे दिवाळी, दसरा, होळी हे मोठ्या धुमधडाक्यात साजरे केले जातात.

फिजीमध्ये भारतीयांच्या जाण्याचा इतिहास देखील ब्रिटिश काळातीलच आहे.

भारत आणि फिजी बेटांवर ब्रिटिशांचंच राज्य होतं. त्याचा काळात १८७९ मध्ये ब्रिटिशांनी फिजी बेटावर साखरेचं उत्पादन घेण्याला सुरुवात केली. फिजी बेटावर उसाच्या शेतीसाठी आणि कारखान्यात लागणाऱ्या मजुरांची संख्या कमी होती. त्यामुळे ब्रिटिशांनी १८७९ ते १९१६ या काळात तब्बल ६० हजार भारतीय मजुरांना फिजीमध्ये नेलं होतं.

स्वतःच्या मेहनतीच्या बळावर भारतीय लवकरच फिजीमध्ये रुळले आणि मजुरीच्या व्यतिरिक्त कामात देखील प्रगती करू लागले. फिजीमध्ये होत असलेली आर्थिक प्रगती आणि देशाची सुंदरता बघून १९२०-१९३० च्या दशकात मोठ्या संख्येने भारतीय नागरिक फिजीमध्ये गेले आणि तिथेच स्थायिक झाले. त्याच्यामुळे फिजीमध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांची संख्या इतकी मोठी आहे.

फिजीच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारतीयांचं मोठं योगदान आहे. ३७ टक्के असलेले भारतीय वंशाचे लोक फिजीच्या अर्थव्यवस्थेचा कणा बनले आहेत. 

१९७० मध्ये फिजीला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर देशात अनेकदा सत्तापालट झाले आहेत. परंतु वेळोवेळी देशात लोकशाही मार्गाने सत्ता देखील स्थापन झाल्या आहेत. परंतु फिजीमध्ये भारतीयांची संख्या देखील बरीच मोठी असल्यामुळे निवडणुकीत देखील भारतीय समोर जायला लागले. यामुळेच स्थानिक फिजीयनांकडून भारतीय वंशाच्या नागरिकांचा विरोध देखील सुरु झाला.

यात सितीवेनी राबुका हे देखील होते.

राबुका यांनी लष्करी अधिकारी असतांना १९८७ मध्ये लोकशाही सरकारविरोधात पाडलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, भारतीय वंशाच्या लोकांमुळे स्थानिक फिजियन नागरिक स्वतःचं राजकीय स्थान गमावत आहेत. त्यानंतर पुन्हा देशात लोकशाही लागू झाली. ५ वर्षानंतर स्वतः राबुका देखील निवडणुकीत निवडून आले आणि देशाचे पंतप्रधान बनले होते.

त्यांनी भारतीय वंशाच्या लोकांचे अधिकार कमी करण्याचे प्रयत्न केले परंतु १९९९ मध्ये भारतीय वंशाचे महेंद्र चौधरी हे फिजीचे पंतप्रधान झाले आणि संविधानात भारतीयांचे अधिकार अबाधित ठेवले. होते.

त्यानंतरच्या काळात राबुका यांनी स्वतःचं मत बदललं आणि फिजीमध्ये राहणारे सर्व भारतीय वंशाचे लोक फिजीयनच आहेत याचा प्रसार केला होता.

सध्याच्या घडीला ते पाश्चिमात्य लोकशाहीला अनुसरूनच काम करण्याचं मत मांडत आहेत. परंतु राबुका यांच्या नवीन राजवटीत ते कोणते निर्णय घेतात याकडे भारतीय वंशाच्या लोकांचं लक्ष लागलं आहे. 

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.