शिवरायांची साकारलेली भूमिका तामिळ चित्रपटसृष्टीला सिवाजी गणेशन देऊन गेली…

छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित चित्रपटांमध्ये इतिहासाची मोडतोड करण्यात येत असल्याचा आरोप सर्व स्थरातून करण्यात येत आहे. याच कारण ठरले ते म्हणजे महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात वीर दौडले सात’ या सिनेमाचे.

अभिनेता अक्षय कुमार हा या सिनेमात शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असणार आहे. त्यामुळे हा विषय चर्चेत आला आहे. याच बरोबर सोशल मीडियावर देश विदेशात शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्या बद्दल सर्च केलं जात आहे.

 यातीलच एक म्हणजे सिवाजी गणेशन. 

 सिवाजी गणेशन जरी तामिळ चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते असले तरी त्यांचा महाराष्ट्र आणि मराठी माणसासोबत जवळचं नातं आहे. कारण त्यांना तामिळसृष्टीत मिळालेली सिवाजी ही ओळख आणि प्रसिद्धी अखंड महाराष्ट्राचे आणि भारताचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेमुळे मिळालेली आहे.

सिवाजी गणेशन यांचा जन्म १ ऑक्टोबर १९२८ रोजी मद्रास प्रांतातील (आजचे तामिळनाडू) मधील विल्लूपुरममध्ये झाला होता. त्यांचे मूळ म्हणजेच घरच्यांनी ठेवलेलं नाव होतं गणेशमूर्ती. या गणेशमूर्तीना लहानपणापासून अभिनयाची आवड होती. आता आवड म्हणायला म्हणून होती का तर नाही. याच अभिनयासाठी त्यांनी अवघ्या ७ व्या वर्षी घर सोडलं आणि थिएटर ग्रुप जॉईन केला.

इथं त्यांना बराच काळ अभिनयाचं बाळकडू मिळालं. सुरुवातीला त्यांनी साकारलेल्या बालकलाकार आणि महिला कलाकाराच्या भूमिका लोकांच्या लक्षात राहिल्या होत्या. मात्र त्यांना आपल्या आयुष्यभराची ओळख मिळाली ती वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षी म्हणजेच १९४५ साली. त्यावर्षी पर्यंत त्यांनी प्रायोगिक नाटकांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. 

१९४५ साली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारीत “शिवाजी कांडा हिंदू राज्यम” अर्थात एक हिंदू राज्य ज्याची स्थापना शिवाजी राजेंनी केली होती, या नाटकामध्ये गणेशमूर्ती यांनी शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारली होती. त्यांनी हि शिवाजी महाराज यांची भूमिका इतकी जीवंत साकारली की, लोक त्यांना याच नावाने ओळखू लागले. त्यानंतर त्यांनी देखील सिवाजी गणेशन हे नाव जोडून घेतलं.

त्यानंतर पुढे १९५२ सालामध्ये “पराशक्ति” या सिनेमातून सिवाजी गणेशन यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी जवळपास ५ दशक मागे वळून पहिलेच नाही. आपल्या या संपूर्ण करिअरमध्ये त्यांनी ३०० पेक्षा जास्त चित्रपटात काम केले. १९६१ मध्ये आलेला ‘पसमालर’ हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीतील सुपरहिट ठरलेला सिनेमा होता.

तर १९६४ सालामध्ये आलेला ‘नवरथी’ हा त्यांचा १०० वा चित्रपट होता, या चित्रपटात त्यांनी एकावेळी तब्बल ९ वेगवेगळ्या भूमिका साकारल्या होत्या.

त्यांचा अभिनय केवळ तामिळपुरता मर्यादित नव्हता. तर तेलुगू, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषेतील विविध सिनेमांमध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. कदाचित या सगळ्यामुळे गणेशन तमिळ सिनेमाचे सुपरस्टार त्रिमूर्तींपैकी एक होते. तमिळ सिनेमात त्यांचे जॅमिनी आणि एमजीआर यांचे तेच स्थान आहे. जे हिंदी सिनेमात राज कपूर दिलीप कुमार आणि देव आनंद यांचे आहे.

मोठे संवाद आणि भारतीय पौराणिक ग्रंथांची जाण असलेले अभिनेते म्हणून पण त्यांना ओळखल जायचं. या सोबतच गणेशन यांनी भरतनाट्यम, कथ्थक आणि मणिपुरी नृत्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. करिअरच्या सुरुवातीच्या काळात गणेशन यांनी काही नकारात्मक भूमिका देखील साकारल्या. या भूमिकापण लक्षवेधी ठरल्या.

१९६० मध्ये “वीरपांडिया कट्टाबोम्मन”साठी त्यांना एफ्रो-एशियन फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेताचा पुरस्कार मिळाला. कोणत्याही आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेता पुरस्कार जिंकणारे ते पहिले भारतीय अभिनेते होते. आपल्या मेथड अॅक्टिंगसाठी प्रसिद्ध सिवाजी गणेशन यांना Los Angeles Times ने भारताचा “भारताचा मार्लन ब्रांडो” असं म्हंटलं होतं.

१९९९ मध्ये त्यांचा शेवटचा चित्रपट रिलीज झाला होता. २१ जुलै २००१ रोजी ७२ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.