भारताच्या क्रिकेट इतिहासात हा एकमेव खेळाडू होता जो पब्लिक डिमांडवर सिक्सर मारायचा..

काही देशांमध्ये उत्तम खेळाडू जन्माला येतात , आपल्या देशाकडून खेळावं हेच त्यांचं स्वप्न असतं, देशाचं नाव गाजवावं पण परिस्थिती आणि इतर काही गोष्टींमुळे तो योग्य काही जुळून येत नाही. आजचा किस्सा त्याबद्दलचं. हा खेळाडू क्रिकेट क्षेत्रातला स्टार खेळाडू म्हणून फेमस होता.

जगातल्या १० सर्वोत्तम लोकांमधील देखणा क्रिकेटर म्हणून नोंद असलेले सलीम दुर्राणी. सलीम दुर्राणी हे सगळ्यात जास्त चर्चेत असणारे खेळाडू म्हणून प्रसिद्ध होते. १२ वर्षांच्या क्रिकेट करिअरमध्ये क्रिकेट तर एन्जॉय केलंच पण लोकांकडून जे प्रेम मिळत गेलं ते त्याकाळी अपवादानेच इतर कोणत्या खेळाडूंना मिळालं असेल.

सलीम दुर्राणी यांचं निधन झालं आहे.  भारताकडून क्रिकेट खेळणारे दिग्गज क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांनी वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.. २ एप्रिल रोजी गुजरातमधील जामनगर येथे त्यांचं निधन झालं आहे. सलीम दुर्राणी हे पहिले भारतीय क्रिकेटपटू होते, ज्यांचा अर्जुन पुरस्काराने गौरव करण्यात आला. 

भारतीय संघासाठी, त्यांनी एकूण २९ कसोटी सामने खेळले आणि त्यात १२०२ धावा केल्या. या १२०२ धावांमध्ये एक शतक आणि ७ अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय त्यांनी ७५ विकेट्सही घेतल्या आहेत.

आज त्यांच्याबद्दल जाणून घेऊया, सलीम दुर्राणी हे मूळचे अफगाणिस्थानचे. अफगाणिस्तानच्या काबूलमध्ये त्यांचा जन्म झाला. पुढे सलीम दुर्राणी हे ३ वर्षाचे असताना त्यांचा परिवार सौराष्ट्रातल्या जामनगरमध्ये स्थलांतरित झाला. त्यानंतर मात्र ते कधीच परत अफगाणिस्तानला गेले नाही.

मागच्या काही वर्षांच्या काळातील अफगाणिस्तानचा संघ ज्यावेळी भारतातल्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर पहिली टेस्ट खेळण्यासाठी मैदानात उतरली होती तेव्हा सलीम दुर्राणी तिथे उपस्थित होते, अफगाण खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शनही केलं होतं. बीसीसीआयने त्यांना त्यासाठी विशेष निमंत्रण पाठवलं होतं.

ज्यावेळी सलीम दुर्राणी यांचा जन्म झाला त्याच वेळेस त्यांच्या वडिलांनी घोषणा केली होती कि मी एका टेस्ट क्रिकेटरचा बाप झालो आहे. भारत पाकिस्तान फाळणीच्या काळात सलीम दुर्राणीचे वडील कराचीत गेले पण सलीम मागेच राहिला. त्यावेळी ते १३ वर्षांचे होते.

वडिलांच्या स्वप्नाला सत्यात उतरविण्यासाठी सलीम दुर्राणी यांनी क्रिकेट खेळायला सुरवात केली. क्रिकेटची सगळी तंत्रं आत्मसात केली. १९६१-६२ साली इंग्लंडच्या दौऱ्यावर भारतीय संघ गेला असताना तिथे सलीम दुर्राणी आणि त्यांच्या वडिलांची भेट झाली. हि भेट तब्बल १४ वर्षांनी झाली होती.

१९६१ साली भारतामध्ये अर्जुन अवॉर्डची सुरवात झाली होती. खेळांमध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार प्रदान करण्यात येई. त्यावेळी हा अर्जुन अवॉर्ड पहिल्यांदा मिळवणारे सलीम दुर्राणी होते. ज्यावेळी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा ते वेस्ट इंडिज दौऱ्यावर होते. त्यामुळे ते अवॉर्ड घेण्यासाठी काय गेलेच नाही.

अर्जुन अवॉर्ड सलीम दुर्राणी यांना तब्बल ४७ वर्षांनी मिळाला. २००९ साली भारताच्या खेळ मंत्रालयाने पुन्हा रेकॉर्ड तपासून हा पुरस्कार त्यांना दिला.

आता विषय सिक्सर मारण्याचा.

सलीम दुर्राणी हे एकमेव खेळाडू होते कि जे पब्लिक डिमांडवर सिक्सर मारायचे. ते खेळत असताना स्टेडियममधल्या ज्या भागातून प्रेक्षक सिक्सर मारायची मागणी करायचे त्या ठिकाणी दुर्राणी षटकार ठोकायचे. त्यांची स्टाईल प्रचंड फेमस झालेली.

ज्यावेळी एका पत्रकाराने त्यांना प्रश्न विचारला कि प्रेक्षक ज्या ठिकाणी म्हणतील त्याच ठिकाणी सिक्सर मारता हे कस जमतं तुम्हाला ? त्यावेळी दुर्राणी म्हणाले होते कि , पब्लिक डिमांडवर चौके- छक्के मारणे अवघड नाहीए पण टेक्निक आणि मेहनत यांच्या जोरावर हे शक्य आहे. मी खेळ एन्जॉय करण्यासाठी खेळतो, लोकांना माझ्या गेममधे जास्त इंटरेस्ट आहे आणि त्यांची मागणी पूर्ण करायला मला मजा येते.

त्यावेळी भारताच्या टेस्ट टीमची सलीम दुर्राणी यांच्याशिवाय कल्पना केली जात नव्हती. संघातील सगळ्यात महत्वाचा खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पहिले जात असे. १९७३ साली कानपूरच्या एका टेस्टमध्ये सलीम दुर्राणी यांची निवड होऊ शकली नाही.

संघात सलीम दुर्राणी यांचा पत्ता कट केला म्हणून प्रेक्षक रागात होते. प्रेक्षकांनी सगळ्या स्टेडियममध्ये पोस्टर आणि फ्लेक्स लावलेले होते आणि त्यावर

NO SALIM DURANI

NO TEST

असा मजकूर लिहिलेला होता.

सलीम दुर्राणी पुढे अभिनेतेही झाले. चरित्र या चित्रपटात त्यांनी अभिनय केला तोही परवीन बाबीसोबत. या चित्रपटासाठी त्यांना १८००० रुपये मानधन मिळालं होतं. क्रिकेटर आणि अभिनय दोन्ही क्षेत्रात ते चमकले. सलीम दुर्राणी हे जास्त लक्षात राहिले ते ऑन डिमांड सिक्सरसाठीच.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.