आईवडिलांना दिली जाणारी कोरोनाची लस लहान लेकरांना का चालत नाही?

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जगभरात लसीकरण मोहीम राबवली जात आहे. भारतातही 16 जानेवारी 2021 पासून लसीकरणाला सुरूवात झाली. सध्या 1 मे पासून पाचव्या टप्प्यात 18 वर्षांवरील लोकांसाठी लसीकरण सुरू झाले आहे. मात्र, अद्याप बऱ्याच राज्यांमध्ये लस नसल्याच्या तक्रारी आहे. या दरम्यान, लहान मुलांनाही लस लावण्याविषयी चर्चा आहे. जगातील काही निवडक देशांनी लहान मुलांना देखील लस सुरू केल्या आहेत.

या साखळीत कॅनडा हा जगातील पहिला देश आहे ज्याने मुलांना लसी देण्याची परवानगी दिली आहे.

कॅनेडियन ड्रग रेग्युलेटर हेल्थने 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी फायझरच्या लसीला परवानगी दिली आहे. यापूर्वी ही लस 16 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना दिली जात होती. फायझरच्या लसीच्या मुलांवरील चाचण्या जानेवारी ते मार्च या कालावधीत घेण्यात आल्या होत्या,

एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार फायझरने मार्च 2021 च्या उत्तरार्धात 12 ते 15 वयाच्या 2260 स्वयंसेवकांवर लसीच्या चाचणीचा प्रारंभिक निकाल जाहीर केला. निकाल सकारात्मक आला.

ज्या मुलांना लसीचे दोन्ही डोस दिले गेले त्यांना कोरोना इन्फेक्शन झाले नाही, तर ज्या मुलांना डमी इंजेक्शन दिलं गेलं त्यांना इन्फेक्शन झालेलं पहायला मिळालं. लसी घेणाऱ्यांमध्ये ताप आणि थंडीचे साइड इफेक्ट देखील दिसून आले. पुढील दोन वर्ष या मुलांच्या आरोग्यावर लक्ष ठेवले जाईल.

अमेरिकेतही देण्यात आली मान्यता :

अमेरिकेतही फायझर-बायोएनटेकची कोरोना लस 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना देण्याची परवानगी देण्यात आली आहे. यूएस फूड अँण्ड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन (एफडीए) ने 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी फायझर लसीच्या आपात्कालीन वापरास मान्यता दिली आहे.

एफडीएचे कार्यकारी आयुक्त डॉ. जेनेट वुडकोक म्हणाले की,

लसीच्या वापरासंदर्भात घेतलेल्या या निर्णयामुळे सामान्य स्थितीत परत जाण्यास मदत होईल. ते म्हणाले की, एफडीएने उपलब्ध आकडेवारीकडे गांभीर्याने पाहिले आहे यावर मुलांच्या पालकांना विश्वास असू शकतो.

अमेरिकेत फायझर व्यतिरिक्त, मॉडर्ना आणि जॉन्सन अँड जॉन्सनची लसीची देखील मुलांमध्ये चाचणी घेतली जात आहे. मॉडर्नाने सांगितले की, त्यांच्या लसीच्या लहान मुलांवर चाचण्या सुरू आहेत. प्रारंभिक निकाल जून-जुलैमध्ये येईल. जॉन्सन अँड जॉन्सन देखील पीडियाट्रिक चाचण्या आखत आहेत. माध्यमांच्या वृत्तानुसार, नोव्हावाक्स या अमेरिकन कंपनीने 12-17 वयोगटातील 3000 किशोरवयीन मुलांवर लसीची चाचणी सुरू केली आहे.

भारतातली परिस्थिती

कोरोना लसीवरील विषय तज्ज्ञ समितीने (एसईसी) मंगळवारी (11 मे) 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर भारत बायोटेकच्या कोवाक्सिनच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या चाचणीस मान्यता दिली. एम्स दिल्ली, एम्स पटना आणि मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स नागपूर येथे 525 जणांवर ही चाचणी केली जाईल.

भारत बायोटेकला फेज 3 ची सुरू करण्यापूर्वी फेज 2 चा संपूर्ण डेटा द्यावा लागेल.

यापूर्वी 24 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा झाली होती. भारत बायोटेकला सुधारित क्लिनिकल ट्रायल प्रोटोकॉल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) च्या सहकार्याने भारत बायोटेकने विकसित केलेली कोवाक्सिन 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी भारतात वापरली जात आहे.

मुलांना का नाही दिली जाऊ शकत लस ?

सध्या प्रौढांसाठी आणि तरुणांसाठी लस उपलब्ध आहे, तर मग ती मुलांना का दिली जाऊ शकत नाही? हे जाणून घेण्यासाठी बोल भिडूच्या टीमने डॉ. अविनाश भोंडवे यांच्याशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की,

भारतात 2 ते 18 वर्षांच्या मुलांना कोवॅक्सीन लसीच्या वापरासाठी चाचणीस परवानगी देण्यात आली. जी चाचणी पूर्ण होऊन 3 – 4 महिन्यात आपल्याला निकाल मिळेल. ज्यानंतर लहान मुलांची देखील लस उपलब्ध होईल.

ते म्हणाले की, मोठ्या माणसांची लस लहान मुलांनाही चालतेचं असं नाही. ती वेगळ्या प्रकारे विकसित करावी लागते. त्यात मुलांसाठी आवश्यक डोस, त्याचे साइड इफेक्ट काय आहेत ते पाहतात, आणि मगचं परवानगी दिली जाते. लसीचे साइड इफेक्ट जे कॉमन आहेत तेच असतील. जसं की अंग दूखणं , सूज येणं ताप येणं. पण काही ठिकाणी म्हणतात की, रक्ताच्या गाठी होणं किंवा वेगळ्या रिअॅक्शन आहेत का? हेच चाचणीत तपासलं जातं.

त्यामुळे आता परवानगी दिल्यानंतर चाचणी जेव्हा होतील, तेव्हा सगळं लक्षात येईल. आणि जर चाचणीत गंभीर परिणाम दिसून आले तर पून्हा त्यावर काम करून त्याच्या घटकांत बदल करून पुन्हा लस विकसित केली जाते.

भारतात फायझरच्या लसीविषयी ते म्हणाले की,

फायझरची लस 16 ते 18 वयाच्या मुलांच्या वापरासाठी होती, जिच्यावर संशोधन करून ती आता 12 ते 16 वयाच्या मुलांच्या वापरासाठी परवानगी देण्यात आली. फायझरची लस आपल्याला मागवावी लागेल.

कंपनीने त्यासाठी कधीच अर्ज करून ठेवलाय, पण आपल्या सरकारने त्याला मान्यता दिली नाही. हे सरकारचं धोरण आहे, ज्याला आपण काहीच करू शकत नाही. ती खरं तर मान्य करायला हवी, पण अडचण अशी आहे की, फायझरची लस साठविण्यासाठी जी शितसाखळी असते. त्यासाठी – 70 ° ची आवश्यकता आहे, आणि आपल्या आत्ता ज्या लसी आहेत, त्या सगळ्या 2 ते 8 डिग्रीमध्ये साठवता येतात.

अर्थात साध्या फ्रीजमध्ये साठवता येतात. तर – 70 ° मध्ये साठविण्याची सुविधा भारतात नाही. मुख्यत: भारतासारख्या ठिकाणी जिथे ग्रामीण भाग मोठ्या प्रमाणावर आहे, जिथे अशा प्रकारची सोयचं नाही, एवढचं काय निवडक मेट्रो शहर सोडली तर इतर शहरात सुद्धा – 70 ° शक्य नाही. त्यामुळे फायझर लस भारतात येत नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.