सायकल स्मार्ट, सिटी स्मार्ट, फोन स्मार्ट पण सरकार ?

परवा मित्रानं एक फोटो पाठवला, शाळेतल्या काही पोरांना पुण्यात सुरु झालेल्या सायकल शेअरिंगच्या हिरव्या सायकली चालवायच्या होत्या. ती पोरं अशीच सायकलींभोवती सुट्टीच्या दिवशी घिरट्या घालत होती. मला ती माझ्या बालपणात घेवून गेली. खाऊचे आठ आणे – रूपया खिशात जमेपर्यंत आम्हीही अशाच घिरट्या घालायचो. एक सायकल भाड्याने घेवून तिच्यामागे तीन चार जण पळत आळी-पाळीने तिला चालवायचो. दिलेला वेळ बघायला घड्याळं कुणाकडं होती ? असंच आनंदान हुंदडत घरात जावून घड्याळं बघत बघत झालेल्या अर्ध्या तासाच्या उशिराला भाटांचा सायकलवाला काय म्हणत नसे. पुढे घरच्यांची मोठी 24 इंची सायकल शेअर करायला मिळायची, पहिले मातीत पडलो तर पडलो आणि चालवायला त्याचा तर आनंदच निराळा.

आताच्या लहानग्या पोरांना घरात सायकल विकतच मिळत असली तरी, ज्या इच्छुक लहानग्यांना सायकल भाड्यावर हवी असेल तर त्यांचे स्मार्ट सिटीत कसे ह्यावर मी विचारात पडतो. शहरातील जेष्ठ नागरिक ज्यांच्याकडे स्मार्ट फोन नाहीत त्यांचेही कसे? पुण्यात तसेच पिंपरी चिंचवडात समस्त मोटार तसेच दुचाकी धारकांच्या सर्कशीत सायकल धारकांना मान राहू दे थोडाबहुत रस्ता मिळेल का ? याचाही विचार डोक्यात येतो. कारण आजपर्यतचा माझा अनुभव रस्त्यावर पादचारी व सायकलस्वारांना कोण विचारात घेतो?

गेल्या रविवारी बायकोच्या मामाच्या शेतात एक दिवस मुक्काम करून लवकर घरी यायचं, म्हणून मी सायकलवर यवतला जाणार होतो. पण बारक्यासोबत (अवांत) तुम्ही जरा वेळ घालवाल म्हणत बायकोनं मला मोटारीत मागच्या शिटावर कोंबून नेलं. आसु दे… उद्या लवकर परत यायला कायतरी गाडीघोडं मिळलं, अशी स्वतःची समजूत घालत मी मुकाट गेलो.

ऑफिसात अमेरिकन बॉससोबत कॉल संपल्यावर बॉस आणि आम्ही आपापसात आपापल्या संस्कृत्या ट्रेंड करत असतो. ट्रेंड म्हणजे कसं? तर कालच आमचा बॉस जॉन म्हणत होता, “कॉलोरेडोच्या मोठ्या डोंगरावर नेपाळी रेस्टंरॉ कस्ल भारी आहे.”

मग मी आमच्या हॉटेलातल्या नेपाळी लोकांच काहीच न सांगता, “ओ वॉव” आसं म्हणतो.

“सायकलिंगला बायकोला सोबत नेत का नाहीस ? एकटाच फिरतोस, बघुन घेतो तुला…” असा दमही तो मला देतो.

आमचं अवांत फक्त ११ महिन्याचं आहे वो… अशी कारणे मी दिल्यावर तो “ओ कम ऑन, थिंक अबाऊट ए लॉरी…” असे म्हणतो.

मग मी अवांत’ला लॉरीत बसवून हडपसरच्या ट्राफिकमधून यवत, भुलेश्वरला सायकलवर चालल्याची कल्पना करतो, आणि भयानक ट्राफीक, वेगवेगळ्या कारणांनी बुजलेले सायकल त्र्याक, तसेच अस्ताव्यस्त रहदारीतून ती लॉरी कशी प्रवास करेल, या फक्त विचारानेच मनाचा थरकाप उडून मी भयभीत होवून जातो. मग भानावर येत बॉसला म्हणतो, “बॉस नेक्स्ट टाईम तुझ्याकडेच येतो.”

सायकल दौरा कुठे भारी आणि कुठं, कुठं, कसं, कसं, काय, काय… तो आवर्जुन सांगतो. कुटुंब कबिल्यावाली अमेरिकन मंडळी बायका पोरांना सोडून ट्रेकिंग किंवा एडव्हेंचर अशा कशाचाही अजीबात विचार करूच शकत नाहीत. मग मी भारतात जन्मलोय… असे म्हणत अशा संस्कृत्यांच ट्रेडींग क्रमश करतो. असो…

एक दिवस शेतात साजरा करुन दुस-या दिवशी मी यवत वरून पुण्याची ट्रेन पकडतो. तासाभरात पुण्यात पोचल्यावर जवळपास राहणा-या हितचिंतक मित्रांना फोन करून.. भेटूयात का ? म्हणून विचारतो.

पुण्यात सायकल शेअरिंग चालू झालंय आणि त्यामुळे मी आत्ता माझ्याकडे स्वतःची सायकल नसूनही सायकलवर फिरणार या विचाराने खुश होतो. तिकडून मित्रही मी कार ऐवजी अशाच सायकलीने डेक्कनला येणार असल्याचे सांगतो. त्याला वेळ लागणार म्हणून मी आजूबाजूला कुठे सायकल स्टेशन आहे का ? याचा ऑनलाईन शोध घेतो.

रेल्वे स्टेशनजवळ सायकली नसणे, हा लोकांचा धंदेवाईक स्मार्टपणा मला उमगतो. थोडं चालत येवून आरटीओ, सीओईपीजवळ आजुबाजुला विचारपूसही करतो. शेवटी सर्वात जवळच सायकल स्टेशन जंगली महाराज रस्त्यावर आहे, असे समजल्यावर मी तिथपर्यत चालत जातो.

“वॉव आत्ता मी सायकलीने फिरणार” म्हणून वेबअॅपवर सायकल अनलॉक करायला जातो. तर माझा ५ वर्षे जुन्या आयफोनचा स्मार्ट क्यामेरा बंद असल्याचे मला कळते आणि माझा सायकलवरच जायचा प्लान फ्लॉप होतो.

मी हताश न होता बाजुलाच उभ्या असणा-या विद्यार्थ्याला माझ्यासाठी सायकल बुक करशील का ? मी इच्छित स्थळी पोचताच तुला फोन करून सायकल लॉक करायला कळवतो. पैसे इथेच देतो किंवा माझ्या अकांऊंटवरून काय करता येईल का.. ते विचारतो. त्यावर तो काहीच न ऐकता गोंधळलेल्या अवस्थेत तो पळून जातो. तरीही मी पुन्हा हताश न होता ह्यांच्या ओला आटोनं इच्छित स्थळी पोहचतो.

माझं ठिक आहे, मी चांगला स्मार्ट फोन वापरायला पाहिजे. आपली सिटी पण स्मार्ट झाली पाहिजे. पण आपल्या मुलभूत गरजा कधी स्मार्ट होणार हे कोण पाहणार ?

abhijeet
भिडू अभिजीत कुपाटे
2 Comments
  1. Pranit k Mane says

    Bhaari

  2. Suresh Shekatkar. says

    Lekhan prapanch Sundar..

Leave A Reply

Your email address will not be published.