पण शेवटपर्यंत रेखाने स्मिताशी मैत्री केली नाही…

बॉलिवूडमध्ये हिरोइन्समध्ये चालणारे कोल्डवॉर आपल्याला काही नवीन नाही. दररोजच्या पेपरांमधून म्हणा किंवा मासिकांमधून म्हणा हिरोईन्सच्या कॅट फाईटच्या चर्चा झडत असतात. पण अशा कोल्डवॉर आणि कॅट फाइट्स व्यतिरिक्त सुद्धा काही अभिनेत्र्या आपली ,मैत्री टिकवून ठेवतात. आजचा किस्सा अशाच एका अपूर्ण मैत्रीचा.

स्मिता पाटील हे नाव मराठी माणसांसाठी आणि दर्दी सिनेरसिकांसाठी नवीन नाही. स्मिता पाटील यांना रेखाबद्दल विशेष आकर्षण होतं. रेखाशी आपली मैत्री व्हावी असं स्मिताला फार वाटायचं. पण रेखाने स्मिताला एका ठराविक मर्यादेपलीकडे मैत्री करू दिली नाही.

स्मिता कायम रेखाबद्दल भरभरून बोलत असायची. स्मिता आणि रेखाची चांगली मैत्री आहे असं वरवर सगळ्यांना वाटायचं पण प्रत्यक्षात तस काहीही नव्हतं. रेखा स्मिता पासून जरा फटकून  वागायची. याचं स्मिताला वाईट वाटायचं. ठराविक मर्यादेपर्यंत मैत्री जपणाऱ्या रेखावर शेवटी एक वेगळीच जबाबदारी येऊन पडली होती त्याबद्दलची एक घटना.

१९८६ ची गोष्ट बी.आर. डबिंग थिएटरमध्ये रेखा सदा सुहागन’ चं डबिंग करत होत्या आणि त्याच थिएटरला स्मिताचं वारीस सिनेमाचं डबिंग सुरु होतं. तिथे गरोदर असलेली स्मिता रेखाला भेटायला आली. रेखा त्यावेळी सिनेमाचा शेवटचा डेथ सीन डब करत होती. त्यात श्वास लागलेल्या आवाजात बोलायचं होतं. तेव्हा रेखा स्मिताला मजेत म्हणाली,

करतेस का माझं डबिंग ?

स्मिता चटकन म्हणाली,

नको रे बाबा तूच कर. असं श्वास लागल्यासारखं बोलायचं ? मी एक तर मरुनच जाईल, नाहीतर माझं बाळंतपण इथेच करावं लागेल.

आणि काही दिवसानंतर स्मिता गेली. इतर वेळी स्मितासोबत जवळीक न करणारी रेखा भयंकर रडत बसली इतकंच नाही तर स्मिताच्या शेवटच्या काळात रक्ताची गरज असताना सगळ्यात आधी रेखा रक्त द्यायला पोहचली होती. स्मिताच्या वारीस सिनेमाचं डबिंग राहून गेलं होतं. स्मिताने त्या भूमिकेसाठी खूप मेहनत केली होती. गरोदर असतानाही तिने त्या सिनेमाचं शूट पूर्ण केलं होतं.

अखेर रेखालाच तिच्या सिनेमाचं डबींग करावं लागलं. रेखाने आपल्याला डबिंग जमणार नाही असं ठरवलं होतं पण स्मिताच्या आठवणी तिला गप्प बसू देत नव्हत्या. शेवटी तिने धीर एकवटून ते डबिंग पूर्ण केलं. स्मिताचा सशक्त अभिनय आणि त्यापुढे आपला आवाज काहीच नाही. डबिंग नीट झालं नाही तर तिच्या अभिनयाची मजा निघून जाईल.  या डबिंगच्या वेळेस सिनेमात एक वाक्य होतं

तुमने मुझे जीते जी जला दिया..

यावर रेखा मोठ्याने रडू लागली होती.

स्मिताला जाण्याचं दुःख सगळ्यात जास्त रेखाला झालं होतं. तिला दूर ठेवण्याचं कारण सांगताना रेखा म्हणते कि तिला माझ्यासारखं आयुष्य जगू द्यायचं नव्हतं. एकटं राहणं हे सगळ्यात मोठं धाडस आहे आणि वेडेपणा आहे. तिला माझ्यात गुंतू द्यायचं नव्हतं. 

पुढे खून भरी माँग या रेखाच्या चित्रपटाला अवॉर्ड मिळाला. रेखाला तो सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड स्मिताला वारीस साठी मिळेल असं वाटलं होत पण तो रेखाला मिळाला. रेखाने तिचा अवॉर्ड स्मिताला मिळावा म्हणून पुन्हा तो आयोजकांकडे सुपूर्त केला. रेखाने तो अवॉर्ड गुपचूपपणे स्मिताच्या मुलाला प्रतीकला पाठवून दिला होता.

स्मिताला रेखाची प्रत्येक गोष्ट आवडायची. पण रेखा तिच्या मागे असलेल्या अडचणींमुळे स्मिताला लांब ठेवायची. स्मिता तिला रागाने बोलायची कि इतर अभिनेत्र्यांशी जशी तुझी मैत्री आहे तशी माझ्याशी का करत नाही तू ? पण रेखा अशा वेळा टाळायची. आपल्या आयुष्यात झालेल्या घटनांचा समितीवर परिणाम होऊ नये याची काळजी रेखा जातीने घ्यायची.

काहीही करून स्मिताला रेखाशी मैत्री करायची होती. यासाठी ती अनेक प्रयत्न कर तसे. कधी कधी तर ती रात्री अपरात्री रेखाला फोन करत असे पण रेखा तिला तिसरेच कारण सांगून बोलणं टाळायची. शेवटपर्यँत रेखाने स्मिताशी मैत्री केली नाही.

मात्र स्मिताच्या शेवटच्या काळात रेखा पुरती हतबल झाली होती. स्मिताच्या मृत्यूनंतर रेखाला इतकं प्रेम वाटावं हेहि न उलगडणारं कोडंच होतं.

संदर्भ: स्मिता- ललिता ताम्हणे

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.