एक मित्र म्हणाला, “तू जया भादुरीसारखी दिसते” आणि मग स्मिता चित्रपटसृष्टीत आली.

गोष्ट आहे पुण्यातली. डेक्कन जिमखान्याजवळचं एक फेमस रेस्टॉरंट. फर्ग्युसन कॉलेजच्या होस्टेलमधल्या काही मुली तिथे कॉफीसाठी आल्या होत्या. नेहमीच्या गप्पा टप्पा हसन खिदळणे सुरु होतं. अचानक त्यांच्या टेबलजवळ एक मुलगा आला. तो या मुलींपैकी एकीचा मित्र होता. तो सुद्धा या ग्रुपमध्ये शामिल झाला. बोलता बोलता तो त्या ग्रुपमधल्या एका मुलीला म्हणाला,

‘तू चित्रपटात काम का नाही करत? तू अगदी जया भादुरीसारखी दिसतेस.’ 

तो मुलगा स्वतः फिल्म इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी होता आणि त्याच्या एका डिप्लोमा फिल्ममध्ये जया भादुरीने काम केलं होतं.

ही जया भादुरी म्हणजे आपल्या जया बच्चन. त्या फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिकल्या होत्या आणि सिनेमामध्ये त्यांचं नाव झळकत होतं. आपली तुलना थेट जया भादुरीशी झाल्यामुळे ती मुलगी अगदी भारावून गेली. त्या मुलाच्या बोलण्यामुळे कधी नव्हे ते तिच्या मोठ्या मोठ्या डोळ्यात हिरोईन बनण्याची स्वप्ने पडू लागली.

हि मुलगी म्हणजे स्मिता पाटील.

स्मिता पाटील मूळची धुळे जिल्ह्यातल्या शिरपूर इथली. तिचे वडील शिवाजीराव पाटील हे स्वातंत्र्यसैनिक,  सहकारक्षेत्रातील अग्रणी नेते व माजी मंत्री होते. तिची आई विद्याताई पाटील यासुद्धा सामाजिक कार्याशी जोडल्या गेलेल्या होत्या. पुण्यात राष्ट्र सेवा दलाच्या सांस्कृतिक कार्यात स्मिताची जडणघडण झाली होती.

असा वैचारिक व राजकीय वारसा असलेली स्मिता तेव्हा फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत होती, होस्टेलला राहत होती. इतर मुलींप्रमाणे तिचं आयुष्य सुरु होतं पण पुढे काय करायचं हे निश्चित नव्हतं. त्या दिवशी मित्राने डोक्यात सोडलेला अभिनयाचा किडा मात्र घर करून गेला.

मागचा-पुढचा कसलाही विचार न करता, आई-वडिलांची संमती न घेता, ती दुसऱ्या दिवशी त्या मैत्रिणीबरोबर फिल्म इन्स्टिटयूटला गेली. तिथे स्मिताचं एक फोटो सेशनसुद्धा झालं. पण तिच्या आईला जेव्हा हे सगळं कळलं, तेव्हा ती तिला खूप रागवली. म्हणाली,

 ‘सिनेमा-बिनेमा या सगळ्या फालतू गोष्टी आहेत. हे वेड तू डोक्यातून काढून टाक आणि अभ्यास कर. हीच वेळ आहे अभ्यास करायची.’ 

आई एवढी रागवली म्हणून स्मिताने चित्रपटात काम करायचा विचारच सोडून दिला. स्मिताचे नशीब त्यावेळी निश्चितच तिच्याकडे बघून हसलं असेल. वर्षा-दोन वर्षांतच स्मिताच्या अवघ्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. 

स्मिता पुण्याहून मुंबईला आली आणि एक दिवस ध्यानी-मनी नसताना वृत्तनिवेदिका म्हणून मुंबई दूरदर्शनच्या पडद्यावर झळकली. तिथून तीच आयुष्य पालटून गेलं. स्मिताचा सावळा पण तजेलदार चेहरा, टपोरे, भावदर्शी डोळे आणि बोलायला उत्सुक असल्यासारखे वाटणारे ओठ – स्मिताची साधी राहणी आणि चेहर्यावरच प्रसन्न स्मित – तिची बातम्या सांगण्याची पद्धत यामुळे लवकरची ती प्रचंड पॉप्युलर बनली होती. सोबतच एफटीआयआय मध्ये डिप्लोमा फिल्ममध्ये काम करणं सुरूच होतं. 

इथेच तिचे सुप्त गुण हेरून दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी निशांत (१९७५) व चरणदास चोर (१९७५) या चित्रपटांत त्यांना अभिनयाची संधी दिली. आणि पुढचा इतिहास तर आपल्याला ठाऊकच आहे..

संदर्भ- स्मिता स्मित आणि मी ललिता ताम्हणे 

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.