म्हणून आपल्या पहिल्याच नॅशनल अवॉर्डवेळी मिळालेले पैसे स्मिताने दान देऊन टाकले

काही माणसं आपल्यातून फार लवकर निघून गेली याची एक खंत सतत मनाला बोचत असते. ज्या व्यक्तींनी कलाक्षेत्राला एक नवी ओळख मिळवून दिली, अशा माणसांच्या अकाली जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण होते. ती पोकळी कधीही भरून निघत नाही.

अशीच एक व्यक्ती, एक कलाकार म्हणजे स्मिता पाटील.

स्मिता पाटील किती प्रतिभावंत अभिनेत्री होती हे तिचे सिनेमे पाहून आपल्याला कळतं. स्मिता ही कलाकार म्हणून महान होतीच. तसेच कलाकाराच्या पलीकडे एक व्यक्ती म्हणून सुद्धा स्मिता ग्रेट होती.

स्मिताच्या आयुष्यात घडलेला असाच एक किस्सा …

आजही जेव्हा ‘उंबरठा’ सिनेमा पाहण्यात येतो, तेव्हा स्मिता पाटील ही किती प्रतिभासंपन्न अभिनेत्री होती याचा प्रत्यय येतो. या सिनेमात स्मिता फोटोंचा एक अल्बम चाळत असते, आणि बॅकग्राऊंडला लतादीदींच्या आवाजातील ‘सुन्या सुन्या मैफलीत माझ्या’ हे गाणं ऐकायला येतं.

यावेळेस स्मिताने एकही संवाद न बोलता फक्त डोळ्यांद्वारे केलेला अभिनय पाहणं, ही एक पर्वणीच.

स्मिता पाटीलने समांतर आणि व्यावसायिक असे दोन्ही सिनेमे केले. कधी स्मिता नसीरुद्दीन शहा यांच्यासोबत झळकली तर कधी त्याच आत्मविश्वासाने अमिताभ बच्चन यांच्यासमोर ती उभी राहिली. समोर कलाकार कोणीही असो, स्मिताचा अभिनय नेहमीच दर्जेदार असायचा.

स्मिताच्या कारकीर्दीतला अत्यंत महत्त्वपूर्ण सिनेमा म्हणजे श्याम बेनेगल यांचा ‘भूमिका’.

या सिनेमात स्मिताने उषा ही व्यक्तिरेखा रंगवली. अमोल पालेकर, सुलभा देशपांडे, नसिरुद्दीन शहा या कलाकारांच्या सुद्धा या सिनेमात भूमिका होत्या.

हंसा वाडकर यांच्या आयुष्यावर आधारित या सिनेमात स्मिताने अभिनयाचा जणू वस्तुपाठच घालून दिला. स्त्री म्हणून होणारी घुसमट, सोसावी लागत असलेली अवहेलना, स्मिताने प्रेक्षकांपर्यंत पोहचवली.

१९७७ साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमानंतर स्मिता एका गावात रामदास फुटाणे यांच्या ‘सर्वसाक्षी’ सिनेमाचं शुटिंग करत होती. ती घरी नसताना दिल्लीहून तिच्या घरी फोन आला. स्मिताच्या आईने फोन उचलला.

दिल्लीवरुन स्मिताला ‘भूमिका’ सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असल्याचं सांगण्यात आले.

आईने आणि बहिणीने स्मिता घरी आल्यावर तिला ही खुशखबर सांगितली.

इतका मोठा सन्मान जाहीर झाल्यामुळे स्मिताला निश्चितच आनंद झाला. १९७७ साली ‘भूमिका’ साठी स्मिताला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारासोबत स्मिताला एक ठराविक रक्कम मिळाली. त्या पैशांचा स्वीकार करताना स्मिताला काहीसं विचित्र वाटलं. स्मिता घरी आल्यावर कुटुंबीयांना म्हणाली,

“मला मिळालेले हे पैसे लोकांचे आहेत. शेवटी लोकांनी दिलेल्या पैशांमधून मला हा पुरस्कार मिळत आहे. लोकांनी माझ्यावर इतकं भरभरून प्रेम केलं की, त्यामुळेच एक अभिनेत्री म्हणून मला ओळख मिळाली. त्यामुळे मिळालेले हे पैसे आपण लोकांना परत केले पाहिजेत.”

स्मिताचा या भावनेचा तिच्या कुटुंबीयांनी सुद्धा आदर केला. अखेर राष्ट्रीय पुरस्कारासोबत मिळालेली रक्कम स्मिताने विविध सामाजिक संस्थांना दान केली. यानंतर स्मिताला खऱ्या अर्थाने समाधान वाटलं.

छोटासा सन्मान मिळाल्यावर हुरळुन जाणारे कलाकार इंडस्ट्रीत पाहायला मिळतात. परंतु स्मिता काहीशी वेगळी होती. प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळेच एखादा कलाकार मोठा होतो, याची स्मिताला पक्की जाण होती. आणि म्हणून स्मिताने अशी कृती केली.

स्मिता पाटील सारखी महान अभिनेत्री आज आपल्यात नाही. परंतु फार कमी काळ वाट्याला येऊनसुद्धा तिने करून ठेवलेलं दर्जेदार काम, पुढच्या अनेक पिढ्यांना स्मिताची अनोखी ओळख देत राहील, यात शंका नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.