भारताची ‘लाडकी बहु’ राहुल गांधीना पराभूत करणाऱ्या राजकीय नेता कशा बनल्या?

साल होत २०००.

बालाजी टेलिफिल्म्सची सिरीयल  “क्योंकी सांस भी कभी बहु थी” सुरु होऊन काहीच दिवस झाले होते.

भलं मोठ गुजराती कुटुंब, त्या सगळ्यांना सामावून घेणारं भला मोठा महाल, त्या महालात अंगावर लाखो करोडोचे दागिने घालून दिवसभर कुचाळक्या करत असणाऱ्या बायका.

दूरदर्शनवर लागणाऱ्या मिडल क्लास सिरीयल बघणाऱ्या पब्लिकसाठी हे नवीन होत. खेडोपाड्या पासून मेट्रोसिटी पर्यंत आयामाया डोळे दिपून ही सिरीयल पाहात होत्या. सुरवातीपासूनच क्योंकी सांस भी कभी बहु थीने ग्रीप पकडली. या सिरीयलचं लीड कॅरेक्टर तुलसी विराणी तर घराघराची लाडकी झालेली.

मुंबईच्या एका दुपारी एक रिक्षा बालाजी टेलिफिल्म्सच्या ऑफिस बाहेर येऊन थांबली. तिथल्या चौकीदारने पाहिलं एक फाटक्या जीन्स मधली केस कसेबसे बांधलेली मुलगी त्या रिक्षातून बाहेर आली आणि गेट मधून आत घुसू लागली. चौकीदाराने तिला हटकले,

“कहा घूस रही हो?”

ती मुलगी म्हणाली,

“मै वो तुलसी “

चौकीदार खेकसला,

“अरे वो बडी मेमसाब है. वो ऐसे किसी को भी नही मिलती. चले जाव. “

ती पोरगी बिचारी समजावत राहिली पण चौकीदार ऐकून घ्यायच्या मूड मध्येच नव्हता. अखेर गेटवर दुसरा कोणीतरी कलाकार आला आणि त्याने चौकीदाराला सांगितलं ,

“अरे तुम जिसे रोक राहे हो यही तो तुलसी. इनका नाम है स्मृती मल्होत्रा. “

दिल्लीच्या अजय मल्होत्रा आणि आई शिबानी यांच्या तीन मुलीपैकी स्मृती सर्वात थोरली मुलगी. लहानपणापासून बंडखोर. स्मृती अभ्यासात विशेष हुशार नव्हती. तीच लक्ष अभ्यास सोडून इतर गोष्टीमध्ये जास्त असायचं. त्यांचे आजोबा राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये होते. तिच्या घरचं वातावरण एकदम कर्मठ. एकूण काय तर रोज ओरडा खाणाऱ्या स्मृतीबद्दल घरच्यांना बरीच चिंता असायची.

स्मृतीने लहानपणीच ठरवलेलं की आपण मुंबईला जावून मॉडेल बनायचं. घरच्यांचा विरोध होताच. पोरगी महा खटपटी होती. घरच्यांची नजर चुकवून दिल्लीमध्ये इंडिया गेटच्या समोर कॉस्मेटीक्स विकायला जाऊन उभी राहिली. त्यातून २०० रुपये कमावले. पण तिच्या कुठल्यातरी मावशीन म्हटलच, 

“ये आगे जाके कुल का नाम मिट्टी में मिलायेगी.”

बारावी नंतर तर तिने कॉलेज सोडल. घरच्यांना न सांगता मुंबईला पळून आली. इथे आल्यावर न्युज चॅनल पासून बऱ्याच ठिकाणी हातपाय मारून झालं. पण कुठे डाळ शिजली नाही. अखेर पोट भरण्यापुरती मॅकडोनाल्ड मध्ये पार्टटाईम नोकरी मिळाली. मॉडेलिंगच्या मागे लागली.

मुंबईमध्ये तिने बराच स्ट्रगल केला. या दिवसात अनेक चांगले वाईट अनुभव आले. घरचे तिला म्हणायचे बस झालं तुझ आता ये परत घरी. स्मृतीमध्ये मात्र काही तरी बनूनचं परत जाणार यावर ठाम होती. घरच्यांना, तिच्या पाहुण्यांना, जगाला काही तरी प्रुव्ह करून दाखवायचं होत.

अखेर तीच आयुष्य बदलून टाकणारी एक संधी तिला मिळाली. मिस इंडिया १९९८.

स्मृतीचं त्यात सिलेक्शन झालं. ती खुश झाली पण लक्षात आलं या स्पर्धेत उतरायचं तर भरपूर तयारी करावी लागते आणि त्यासाठी बरेच पैसे लागणार. अखेर मन घट्ट करून घरी फोन लावला. बाबांकडे दोन लाख रुपये मागितले. ऐकूनच त्यांनी वेड्यात काढलं.

“शिक्षणासाठी मागितलं असत तर एखाद्यावेळी दिलेही असते पण याकामासाठी पैसे मिळणार नाहीत.”

स्मृती खूप रडली. अखेर तिच्या आईला दया आली. तिने आपल्या नवऱ्याला तयार केलं. अजय मल्होत्रा स्मृतीला म्हणाले,

“एकाच अटीवर पैसे देणारं. एका वर्षात काहीही करून हे पैसे परत करायचे. नाही जमलं दिल्लीला परत यायचं आणि मी सांगतो त्या मुलाशी लग्न करायचं”

स्मृतीनं आव्हान स्वीकारलं. पर्यायच नव्हता. हे पैसे घेऊन सुप्रसिध्द कॉस्च्युम डिझायनर मनिष मल्होत्राकडे गेली. त्यांनी स्टायलिंग केलेल्या कपड्यांमधून फोटोशूट केलं. पण दुर्दैव स्मृती मिस इंडियाच्या फायनल राउंडपर्यंतसुद्धा पोहचू शकली नाही. हे तिने आयुष्यात पाहिलेलं शेवटच अपयश असेल. या नंतरही तिला अपयश आले असतील पण त्यातही तिचा विजयच होता.

मिस इंडियाच्या अपयशाने देखील तिला काही छोटी मोठी कामे मिळवून दिली.

मिक्का सिंगच्या सावन मै लग गयी आग या अल्बम मधल्या एका गाण्यात ती दिसली. त्या नंतर तिने टीव्ही सिरीयल वर कोन्सट्रेट केलं. स्टारवरच्या काही सिरीयल मध्ये तिला भूमिका ही मिळाल्या. याच दरम्यान तिला नीलम कोठारी करत असलेली “उह ला ला” हा फेमस टॉक शो मिळाला. 

स्मृतीचा उह ला ला शो काही चालला नाही. पण तिला एका मुलीने टीव्हीवर पाहिलं. ही पोरगी देखील साधारण स्मृतीच्याच वयाची होती. पण लहान वयातच तिने टीव्ही सिरीयलची राजकुमारी म्हणून स्वतःची ओळख मिळवली होती. तिला या स्मृतीचा कॉन्फिडंस आवडला. तिला एका ऑडीशन साठी बोलावलं. स्मृती तिथे पोहचली. ही ऑडीशन होती भारतातली सर्वात मोठी मिडिया संस्था बालाजी टेलिफिल्म्सच्या एका महत्वाकांक्षी सिरीयलची आणि ती मुलगी होती सुपरस्टार जितेंद्रची मुलगी एकता कपूर.

साधारण तेवीस चोवीस वर्षाची एकता आता बालाजीचा कारभार एकहाती सांभाळत होती. क्योंकी सास भी  कभी बहु थी हा तिचाच ड्रीम प्रोजेक्ट होता. तिच्या सगळ्या सहकार्यांनी या मॉडर्ण कपड्यातल्या स्मृतीला बघताच रिजेक्ट करून टाकलं. पण एकताला स्मृतीवर खूप विश्वास होता. तिने  तिला ऑडिशनसाठी पाठवण्यात आलं. 

स्क्रीन टेस्ट घेणाऱ्या असिस्टंट डायरेक्टरने आपल्या यादीत स्मृतीच नाव शोधलं पण काही केल्या त्याला सापडेना. स्मृतीने ती लिस्ट आपल्या हाती घेतली . तिला आपले नाव दिसले. खरंतर तो असिस्टंट साईड कलाकारांच्या यादीत नाव स्मृतीचं नाव शोधत होता. त्याला विश्वासच नव्हता ही पोरगी तुलसी विराणीच्या मुख्य भूमिकेसाठी आली आहे.

स्मृतीची त्या टेस्ट मध्ये पास झाली. तिला मुख्य भूमिका मिळाली. हा तिच्या वडिलांनी दिलेल्या मुदतीचा शेवटचा दिवस होता. तिच्या साखरपुड्याची देखील तयारी झाली होती. पण स्मृतीच्या नशिबात काही वेगळच लिहिलं होत.

क्योंकी सास भी कभी बहु थी स्टार टीव्हीवर अवतरली. आल्या आल्या सिरीयलने धुमाकूळ घातला. सगळ्यात महत्वाच म्हणजे स्मृती पूर्ण भारत भरातल्या घराघरात पोहचली. या सिरियलची ओळखच मुळी “तुलसीची सिरीयल” अशी झाली होती. टीव्ही सिरीयलची ती हायेस्ट पेड अक्ट्रेस झाली. भारताच्या इतिहासात असं पहिल्यांदाच झालं होत की एक महिला कलाकार पुरुषांपेक्षा जास्त मानधन घेत होती.

याचं काळात स्मृतीसुद्धा आपल्या लहानपणीच्या मित्राबरोबर झुबीन इराणी बरोबर लग्न करून स्मृती इराणी झाली होती. तिच्या नवऱ्याच हे दुसर लग्न होतं. यापूर्वी त्याच लग्न स्मृतीच्याच बेस्ट फ्रेंड बरोबर झालं होतं.

106

सिरीयल अनेक वर्षे टीव्हीवर सुपरहिट होती. पण स्मृतीच्या महत्वाकांक्षाना हा छोटा पडदा सांभाळू शकत नव्हता.

अचानक एक दिवस बातमी आली प्रमोद महाजन यांच्या आग्रहांनंतर स्मृती इराणी राजकारणात. आल्या आल्या तिला महराष्ट्र भाजपा युवा मोर्चाची महिला उपाध्यक्ष करण्यात आलं. सगळ्यांना वाटलं ही टीपिकल हिरोईन आहे. गर्दी जमवण्यासाठी तिचा वापर होईल आणि पुढे कुठल्यातरी कोपऱ्यात पडून जाईल. अनेकांचा हा गैरसमज होता.

तिला कॉंग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांच्या विरुद्धचे लोकसभा तिकीट मिळाल.

त्यात तिचा पराभव झाला. पण महाजन मुंडे याच्यामुळे तिला वाजपेयी गटाच्या मुख्य वर्तुळात प्रवेश मिळाला. महाजन यांच्याशी स्पर्धा करू पाहणाऱ्या भाजपच्याच नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध तिने २००४ साली जोरदार आंदोलन केले. गुजरात दंगलीची माफी मागत नाही तोपर्यंत उपोषणाला बसणार म्हणून धमकी दिली.

smruti enters in politics

पण काही दिवसात गणिते बदलली गेली. तीचे मार्गदर्शक प्रमोद महाजन यांचं दुर्दैवी निधन झालं. पक्ष भविष्यात कुठे जाणार हे सरळ होत. स्मृतीने नरेंद्र भाईंशी आपला वाद मिटवला. आपल्या विरोधकांना कधीही माफ न करणारे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नरेंद्र मोदींनी मोठ मन दाखवून तिला माफ केलं. एवढच नव्हे तर जाहीर कार्यक्रमात मेरी छोटी बहेन असं म्हणून तिच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला.

बघता बघता स्मृती इराणी यांची पार्टीमधली ताकद वाढत गेली. भाजपच्या मोठमोठ्या नेत्यांना मागे सारून २०१४ च्या निवडणुकीत तर खुद्द राहुल गांधी यांच्या विरुद्ध त्यांना तिकीट मिळालं. या निवडणुकीत राहुल गांधी यांच्या तोंडच पाणी त्यांनी पळवल होत. याचं बक्षीस म्हणून मोदींनी पंतप्रधान झाल्यावर एच.आर.डी खात्याचे मंत्री केले.

या मंत्रिपदाच्या काळात त्यांच्यावरून अनेक वाद निर्माण झाले. तरीही मोदींचा त्यांच्यावरच विश्वास कमी झाला नाही. पुढे त्यांचं मंत्रालय बदलण्यात आलं. त्या टेक्स्टाईल मंत्री बनल्या. या सगळ्यात त्यांनी टार्गेट राहुल गांधीना केलं होतं.

अखेर पाच वर्षे केलेल्या मेहनतीला फळ आलं. राहुल गांधींना त्यांच्या घरच्या मतदारसंघात स्मृती इराणीने अमेठीमध्ये पाडलं. त्या वेळच्या सर्वात मोठ्या जायंट किलर म्हणून स्मृती इराणींना ओळखलं जाऊ लागलं.

आज ती पुन्हा नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मिनिस्टर आहे. एकेकाळी तिच्या कर्तुत्वावर शंका घेणारे विरोधक ही तिच्या जिद्दीला तिच्या लढाऊ वृत्तीला सलाम करतील हे नक्की.

हे ही वाच भिडू.

1 Comment
  1. Pradeep Athavale . says

    दुनिया झुकती है | स्मृृृृृति इराणी झुकानेवाली निकली | और तो और , कहाँ , कैसे झुकना ये भी सिख गयी ! ! !

Leave A Reply

Your email address will not be published.