कात्रजच्या स्मशानात सर्पोद्यान सुरू करणारा कलंदर माणूस….

रस्त्यावर चालताना वाटेत साप आडवा आला तर आपली घाबरगुंडी उडते. कपाळावर दरदरुन घाम फुटतो. पण महाराष्ट्रात एक माणुस असा आहे की ज्याने ७२ तास ७२ विषारी सापांसोबत एका काचेच्या खोलीत राहण्याचा विक्रम केला आहे. या माणसाचं नाव नीलिमकुमार खैरे.

नीलिमकुमार फक्त सर्पमित्र नाही तर टाकाऊपासुन टिकाऊ वस्तु तयार करणारा एक कलंदर माणुस म्हणुनही त्यांची ओळख आहे.

अशी झाली सर्पप्रेमाची सुरुवात

पुण्यात राहत असणा-या नीलिमकुमार यांना वयाच्या १८ व्या वर्षी माथेरानमध्ये नोकरी लागली. नोकरी झाल्यानंतर तिकडच्याच एका घरात नीलिमकुमार राहायचे. माथेरान हि निसर्गरम्य जागा. खुपदा पावसाळ्यात सगळा परिसर धुक्याने न्हाऊन निघालेला असे. नीलिमकुमार यांच्या खिडकीची काच फुटली असल्याने बाहेरचं धुकं त्यांच्या घरात येई. त्यावर उपाय म्हणुन बंगल्याच्या मागे असलेल्या अडगळीत खिडकीच्या मापाची काच शोधण्यासाठी ते त्याच्या सहका-यासह बंगल्याच्या मागे आले.

सहकारी शोधत होता इतक्यात त्याने हातातली एक काच पटकन खाली फेकली. त्या अडगळीत एक साप होता. हे कळताच आसपासचे लोकं गोळा झाले. सापाला काठी, दगड मारत होते.

नीलिमकुमार यांना ते बघवलं नाही. त्यांनी पत्त्यांच्या मदतीने स्वतः सापाला उचललं. तुम्ही सापाला जंगलात सोडल्यावर तो डुख धरुन आमच्यावर हल्ला करेन, असा तिथल्या लोकांनी आरडाओरडा केला. नीलिमकुमार शांतपणे त्याला घरी घेऊन आले. एका काचेच्या बाटलीत त्यांनी सापाला ठेवलं.

मुंबईत परळ येथे असलेल्या हाफकिन संस्थेत ते साप सोडायला घेऊन आले. तेव्हा तिथे असलेल्या मोठ्या साहेबांनी त्यांना केबिनमध्ये बोलावलं. नीलिमकुमारांनी जो साप पकडला होता तो मण्यार जातीचा विषारी साप होता. नीलिमकुमारांनी काहीच माहित नसताना, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता विषारी सापाला हात लावला होता. ‘तु जा इथुन आणि यापुढे असं करु नकोस’, असं मोठ्या साहेबांनी त्यांना सांगीतलं. हे ऐकुन नीलिमकुमार खिन्न झाले. त्यांनी माथेरान गाठलं. कोणतीही भिती मनात न आणता मण्यार पकडला तर मी इतर साप सुद्धा पकडु शकतो, असा त्यांना विश्वास बसला. तिथुन पुढे त्यांनी साप पकडायला सुरुवात केली आणि एक सर्पप्रेमी म्हणुन त्यांना ओळख मिळु लागली.

सापांसाठी घर आणि कुटूंबाला मागे सोडलं

नीलिमकुमार माथेरानला नोकरी करत होते. त्यांचे आई-वडील पुण्यात राहत असत. त्यांचे वडील पुण्यात डेप्युटी कलेक्टर म्हणुन नोकरी करायचे. सर्पमित्र म्हणुन नीलिमकुमारांची ख्याती होती. वडिलांच्या नोकरीमध्ये त्यांचे इतर सहकारी ‘तुझा मुलगा गारुडी झालाय’ असं म्हणायचे. त्यांच्या वडिलांना हे बोलणं लागायचं. त्यांनी मुलाला पुण्याला बोलावुन घेतलं.

‘साप तरी सोड नाहीतर घर तरी सोड’, असा पर्याय त्यांनी मुलासमोर ठेवला. साप हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला होता. त्यांनी वडिलांना समजावलं पण वडील ऐकले नाहीत. अखेर त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतला.

१८ व्या वर्षी ज्या वयात मुलांना कुटूंबाची खरी गरज असते, त्या वयात नीलिमकुमार एकटे माथेरानला राहत होते. माथेरानच्या जंगलाने त्यांना सांभाळलं, असे ते मानतात. त्यांचं मन एकटेपणानं खुपदा दुःखी व्हायचं. तेव्हा ते माथेरानच्या जंगलात एका खडकावर जाऊन बसायचे. तिकडच्या स्थानिक लोकांनी नीलिमकुमारांच्या नावाला अनुसरुन त्या जागेला ‘NSK पाॅईंट’ हे नाव दिलं.

बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली भेट

त्यावेळी सापांविषयी काहीच पुस्तकं वगैरे नसल्याने नीलिमकुमार केवळ निरीक्षणातुन सापांचा स्वभाव, त्यांच्या प्रजातींविषयी माहिती घ्यायचे. सापांविषयीच्या बारीकसारीक गोष्टी एका डायरीमध्ये ते नोंदवुन ठेवायचे. १९७३ साली दूरदर्शनवर अभिनेत्री भक्ती बर्वेंनी नीलिमकुमारांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीमुळे नीलिमकुमारांचं सर्पप्रेम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं.

याच वर्षी  मिनाताई, उद्धव ठाकरेंसह बाळासाहेब ठाकरे माथेरानला नीलिमकुमारांच्या घरी गेल्याची आठवण आहे. तिथे जाऊन बाळासाहेबांनी नीलिमकुमारांजवळ असलेल्या सापांची माहिती घेतली. उद्धव ठाकरे त्यावेळेस अवघे 10 वर्षांचे होते.

विक्रमाच्या दिशेने वाटचाल

भक्ती बर्वेंच्या मुलाखतीमुळे नीलिमकुमार यांच्या सर्पप्रेमाविषयी अधिकाधिक लोकांना कळाले. त्यांच्या वडिलांच्या वरिष्ठ साहेबांनी याची दखल घेतली. मुलाचं कौतुक चक्क वरिष्ठ साहेब करत असल्याने वडिलांचा विरोध मावळला. त्यांनी माथेरानला मुलाची भेट घेतली आणि त्याला प्रेमाने घरी घेऊन आले.

१९८० सालची गोष्ट. एका बड्या वृत्तपत्राचे संपादक यांनी नीलिमकुमारांना ऑफीसमध्ये बोलावुन एक बातमी वाचायला दिली. जोहान्सबर्ग येथे एक तरुण १८ तास १८ विषारी सापांसह राहिला होता, अशी बातमी होती. ‘तु असं करु शकशील का ?’ संपादकांनी नीलिमकुमारांना विचारलं. ‘हो .. मी ७२ तास ७२ सापांसोबत राहील’ असं नीलिमकुमार सहज म्हणुन गेले.

दुस-या दिवशी संपादकांनी मोठी बातमी छापली. यामुळे संपुर्ण भारतात याविषयी चर्चा झाली. काचेची एक खोली बनवण्यात आली. संपुर्ण भारतभरातील प्रयोगशाळांमधुन ७२ विषारी साप सोडण्यात आले. नीलिमकुमार आत गेले. बाहेरुन दार सील करण्यात आलं.

सर्पमय झालेले ते ७२ तास

खोलीत आत गेल्यावर संपुर्ण खोली सापांनी भरुन गेली होती. पहिले सहा तास नीलिमकुमारांना बसायला जागा नव्हती. लोकलमध्ये जसं आपण माणसांना सरकवुन चौथी सीट घेतो तसंच सापांना सरकवुन हळुहळु नीलिकुमार खुर्चीवर बसले. पहिला दिवस झाला.

दुस-या दिवशी सकाळी उठल्यावर काचेपलीकडे त्यांच्या मित्रांनी धरलेली पाटी त्यांच्या नजरेत आली. ‘हलु नकोस, मानेवर घोणस आहे’ दोन घोणस त्यांच्या मानेवर बसले होते. चार तास न हलता नीलिमकुमार स्तब्ध बसुन होते. चार तासांनी घोणस मानेवरुन खाली आल्या. नीलिमकुमार यांनी आसपास बघितलं तर दोन-तीन सापांशिवाय बाकीचे साप कुठे दिसत नव्हते.

इतक्यात त्यांचं लक्ष खाली गेलं. नीलिमकुमारांचं शर्ट फुगलं होतं. शर्टाच्या आत पोटावर सर्व साप एकत्र झाले होते. पुण्यात त्यावेळी थंडीचं वातावरण होतं. ऊब मिळवण्यासाठी सर्व सापांनी नीलिमकुमारांच्या पोटावर आश्रय घेतला होता. रात्रभर हे साप पोटावर बसुन होते. परंतु एकाही सापाने त्यांना इजा केली नव्हती.

७२ तास झाले. घराबाहेरचं सील काढण्यात आलं. नीलिमकुमारांनी बाहेर जाताना खोलीत असलेल्या त्या सापांकडे पाहिलं. ७२ तास काहीही अघटित न होता जणु सापांनी त्यांच्यावर विश्वास ठेऊन त्यांना जीवदान दिलं होतं. ‘खोलीत आत जाताना मी माणसांचा प्रतिनिधी म्हणुन आलो होतो, बाहेर येताना सापांचा प्रतिनिधी झालो होतो’, असं नीलिमकुमार सांगतात.

हात गमवावा लागला

प्रकल्पातल्या एका सापाला नीलिमकुमार अन्न भरवत होते. तोच दुसरा एक विषारी साप नीलिमकुमारांजवळ येऊन त्याने आक्रमक पवित्र घेतला. त्याचे दात नीलिमकुमारांच्या शर्टात अडकले. डाव्या हाताने त्याला बाजुला काढताना सापाने त्या हातावर नीलिमकुमारांना दंश केला. विषारी सापाने चावा घेतल्याने हाॅस्पीटलला जाण्याची गरज होती.

हाॅस्पीटलला गेल्यावर तिथल्या डाॅक्टरच्या आडमुठेपणामुळे उपचार सुरु व्हायला ४ तास लागले. डाॅक्टरने हात वर बांधला आणि दंडाला आवळपट्टी बांधली. यामुळे विष जास्त पसरत गेलं आणि आवळपट्टीच्या ठिकाणी गँगरीन झालं. पुढे उपचारासाठी दुस-या हाॅस्पीटलला नेण्यात आलं. परंतु तोवर विष मानेपर्यंत पसरुन नीलिमकुमार बेशुद्ध झाले होते. हात कापला नसता तर जीवावर बेतलं असतं. अखेर डाॅक्टरांना नीलिमकुमारांचा डावा हात कापावा लागला.

तीन महिन्यांनी जेव्हा नीलिमकुमार घरी आले तेव्हा त्यांनी घरातल्या सापांकडे पाहिलं. हात-पाय नसुनही शेकडो वर्ष जगभरात स्वतःचं अस्तित्व निर्माण करणा-या सापांपासुन त्यांनी प्रेरणा घेतली.

इतका मोठा शारीरीक आघात होऊनही खचुन न जाता त्यांनी सर्पप्रेमाचं कार्य सुरु ठेवलं.

१९८६ साली पुणे महानगरपालिकेने दिलेल्या जागेवर नीलिमकुमारांनी कात्रजला सर्पोद्यानाची निर्मिती केली. आश्चर्य म्हणजे महानगरपालिकेने दिलेली जागा स्मशानाची होती. याच स्माशानाच्या जागेवर झाडंझुडूपं लावुन नीलिमकुमार यांनी या जागेचं नंदनवन केलं. तिथेच त्यांनी प्राण्यांसाठी अनाथालय सुरु केलं आहे. इतकंच नव्हे तर लोणावळ्याला ‘उत्तरा पर्यावरण शाळा’ त्यांनी निर्माण केली आहे. या शाळेत कच-यापासुन आणि टाकाऊ गोष्टींपासुन जीवनोपयोगी वस्तु बनवल्या जातात.

वर्षभरात १८-१९ लाख माणसं त्यांच्या या प्रकल्पांना भेटी देतात. सापांच्या एका दुर्मिळ प्रजातीला त्यांच्या नावावरुन ‘खैरेयी’ हे नाव ठेवण्यात आलं आहे.

नीलिमकुमारांच्या सर्पप्रेमाचा हा बहुमान म्हणता येईल. डाॅ. नरेंद्र दाभोलकरांबरोबर त्यांनी सापांविषयीच्या लोकांच्या मनात असलेल्या गैरसमजुती दूर करण्याचा प्रयत्न केला. एरवी छोट्या गोष्टींवरुन निराश होणा-या आपल्यासाठी नीलिमकुमारांचं हे थक्क करणारं आयुष्य नक्कीच प्रेरणादायी आहे.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.