जिथं हनिमूनसाठी जातात त्या उटीमध्ये इंग्रजांनी स्नूकर नावाच्या खेळाला जन्म दिलाय भिडू
उटी उर्फ उटकमंडलम. मध्यमवर्गीय भारतीयांचं हनिमून डेस्टिनेशन. मिथुनदा च गुंडा सारखे सिनेमे बनवण्याच लोकेशन. शाहरुखची छैंया छैंयाची ट्रेन, सल्लूच्या कबुतर जा जा वाल्या बागा, चहाचे मळे, हत्तीचे अस बरच काही काही गोष्टींनी आपण उटीला ओळखतो.
पण उटीची जगासमोर आणल इंग्रजांनी.
भारतातल्या कडक उन्हाळ्याला सहन न करू शकणारे इंग्रज अधिकारी अशा देशभरातल्या हिल स्टेशनवर वस्तीला जात. त्यांनीच उटकमंडलम म्हणता येत नाही म्हणून उटी हे सुटसुटीत नाव दिल.
तर या हिल स्टेशनवर पोस्टिंग म्हणजे इंग्रजांसाठी निवांत सुट्टी असायची. मग रिकाम्या डोकी नवनवीन उद्योग सुचायचे. यातच होता कर्नल नेव्हिल चेम्बरलेन (mpsc करणाऱ्या भिडूनो तो इंग्लंडचा पंतप्रधान झाला तो चेम्बरलेन वेगळा. उगीच परीक्षेत लिहून आम्हाला शिव्या घालू नका.)
तर या चेम्बरलेनला पूल खेळायची आवड होती. तेव्हा दोन प्रकारचे टेबल पूल असायचे. ब्लक पूल आणि पिरामिड पूल. हे दोन्ही तसे बिलियर्डसचेच प्रकार. एकात १५ रंगीत बॉल आणि स्ट्रायकर म्हणून एक काळा बॉल असायचा. तर दुसरीकडे १५ काळे बॉल आणि स्ट्रायकर म्हणून एक पांढरा बॉल.
चेम्बरलेन जबलपूरच्या मिलिटरी कँन्टीनमध्ये होता तेव्हा तिथे सैनिक हा खेळ खेळायचे.
कर्नल चेम्बरलेन थोडासा उलट्या डोक्याचा माणूस. त्याने विचार केला की जर दोन्ही गेम एकत्र केले तर. किती जरी झाल तरी चेम्बरलेन म्हणजे वरिष्ठ अधिकारी. त्याची आयडिया म्हटल्यावर नाही कोण म्हणणार.
मग त्याच्या इच्छेप्रमाणे पिवळा, निळा, हिरवा असे बाकीच्या रंगाचे बॉलसुद्धा खेळाच्या टेबलावर उतरले. चेम्बरलेनचा हा नवीन खेळ अनेकाना आवडला. चेम्बरलेन तर या खेळापायी झपाटून गेला होता.
पुढे त्याची नियुक्ती उटीला झाली. तिथल्या उबदार वातावरणात तो या पूल गेमचाच विचार करत बसायचा.
यातूनच त्याने खेळाचे अनेक नियम बनवले. जुन्या पूल गेम मधील काही संकल्पना पूर्णपणे मोडीस काढल्या. तेव्हा तरुण कनिष्ठ ब्रिटीश अधिकारी हा गेम भरपूर खेळायचे. त्यांना गंमतीने स्नूकर्स असे म्हटले जाई.
त्यांच्याच नावावरून कर्नल चेम्बरलेनने या खेळाच नाव स्नूकर अस ठेवलं. हे वर्ष होत १८७५.
एकदा जागतिक बिलियर्डस चॅम्पीयन जॉन रॉबर्टस भारतात आला होता. तेव्हा त्याला या चेम्बरलेनबद्दल आणि त्याच्या स्नूकर गेम बद्दल कोणी तरी सांगितल. रोबर्टसने उटीला जाऊन चेम्बरलेनची भेट घेतली, गेम समजावून घेतला. त्याला स्नूकर प्रचंड आवडला.
जॉन रोबर्टसने हा गेम इंग्लंड आणि युरोपमध्ये नेला.
पुढे १९१६ पासून याच्या अधिकृत स्पर्धा घेण्यात येऊ लागल्या. १९२७ मध्ये याची वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळवली जाऊ लागली. जगात बाकीचे बिलियर्डस गेम्स मागे पडले आणि हा स्नूकर सर्वात फेमस पूल गेम म्हणून ओळखला जाऊ लागला.
आजही जगभरात लब्धप्रतिष्ठित वातावरणात अदबशीरपणे ब्रिटीश कुलाचार नियम पाळत घडीव शिसवी लाकडी गडद हिरव्या कॅनव्हासवर रंगीबेरंगी चेंडू आणि लांबसडक काठीच्या साह्य़ाने स्नूकर हा गेम खेळला जातो.
आजही याच्या चॅम्पियनशिपच्या स्पर्धा होतात. त्यावर भलं मोठ बक्षीस असत. भारताचा पुण्यात जन्मलेला पंकज अडवाणी या मेड इन इंडिया गेमचा विश्वविजेता राहून गेलाय.
चेम्बरलेनने भारतात शोधलेला हा खेळ अजरामर होऊन बसलाय. त्याच स्नूकरवर एवढ प्रेम होतं की त्याने आपल्या एका लाडक्या घोड्याच नाव देखील स्नूकर असं ठेवलं होत.
आजही उटी मध्ये चेम्बरलेनच्या आठवणी जतन केलेल्या आहेत. उटी क्लबमध्ये त्याने लिहिलेले नियम व त्याचं स्नूकर टेबल आजही आहे तस आपल्याला पाहायला मिळत. उटीच्या जागतिक वैशिष्ट्यामध्ये गाईड लोकांना अभिमानाने सांगायला ही आणखी एक गोष्ट मिळाली आहे.
हे ही वाच भिडू.
- पुणेरी पोरांना खेळताना बघून इंग्रजांना बॅडमिंटनचा खेळ सुचला.
- मराठी मातीचा अभिमान असलेल्या खो-खो चा इतिहास महाभारता एवढा जुना आहे.
- आपल्याच देशात शोध लागलेल्या खेळात नंबर वन होण्यासाठी प्रकाश पदुकोण जन्मावा लागला.