संजीव कुमारच्या निधनानंतर शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते, ‘तुझे उपकार आयुष्यभर विसरणार नाही’

असं म्हणतात खऱ्या मित्राची ओळख ही कसोटीच्या क्षणीच होते. असाच काहीसा अनुभव अभिनेते यांना शत्रुघ्न सिन्हा यांना आला होता. त्याचाच हा किस्सा. पुण्याच्या एफ टी आय मधून पास आऊट झाल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा हिंदी चित्रपटात आले. त्यांचा चेहरा तत्कालीन नायकाच्या प्रतिमेला साजेसा नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या कारकीर्दीची सुरुवात खलनायक म्हणून केली. 

सुरुवातीचे तीन चार वर्षे खलनायक रंगवल्यानंतर साहजिकच शत्रुघ्न सिन्हा नायकाच्या भूमिका ऑफर होऊ लागल्या. 

मेरे अपने, पत्थर और पायल, खिलौना, शिकार या चित्रपटातून जबरदस्त खलनायक रंगवला होता. शत्रुघ्न सिन्हा ची सिगारेट पिण्याची स्टाईल, पडद्यावरील बोलण्याची स्टाईल, ‘खामोश’,’अबे चपडपंजू’,’अरे मेरे ताश के तिरपनवे पत्ते’  म्हणतानाचा त्यांचा अंदाज… सर्वच अफलातून होता. पुढे सत्तरच्या दशकामध्ये नायक म्हणून ते पडद्यावर जरी आले असले तरी त्यांची स्टाईल भारी होती.हटके होती. वेगळी होती. नायिकेच्या  मागे पळणे, झाडाभोवती फिरत गाणे म्हणणे असा त्यांचा नायक नव्हता. 

तो रफ आणि टफ नायक होता. कालीचरण , विश्वनाथ हे त्यांचे चित्रपट जबरदस्त हिट ठरले. त्यानंतर अनेक मल्टीस्टारर सिनेमात देखील ते दिसू लागले. हा किस्सा त्यांनी त्यांच्या अलीकडेच आलेल्या आत्मचरित्रातला आहे. ‘एनीथिंग बट खामोश’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. यातला हा किस्सा खूप महत्त्वाचा आहे.  

सत्तरच्या दशकाच्या अखेरीस शत्रुघ्न सिन्हा यांना दहा लाख रुपयांची तातडीची गरज होती. 

शत्रुघ्न सिन्हाला कुठल्याही परिस्थितीत पैसे हवेच होते. त्यासाठी ते आपला मुंबईमधील फ्लॅट विकायला देखील तयार होते. परंतु त्यांची पत्नी पूनम यांचा त्याला विरोध होता. त्यावेळी शत्रुघ्न सिन्हा म्हणाले ,”मला कुणापुढे हात पसरायला आवडत नाही!” त्यावर पत्नीचे म्हणणे होते,” तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना विचारून बघा. काही तरी मार्ग नक्की निघेल.” 

शत्रुघ्न सिन्हांनी निर्माता दिग्दर्शक सुभाष घई यांना पैशाबाबत विचारणा केली. त्यांनी दोन दिवसात सांगतो असे सांगितले. दोन चे चार.. चार चे आठ असे दिवस होत गेले. नंतर शत्रुघ्न सिन्हाला त्यांनी सांगितले, “तुम्हाला पैसे देतो पण त्याचे तुम्हाला व्याज द्यावे लागेल!” शत्रुघ्न सिन्हा  यालाही देखील तयार झाले. परंतु पुन्हा घई यांची टोलवा टोलवी चालूच राहिली.

एके दिवशी त्यांनी सांगितले,” जी  व्यक्ती तुम्हाला पैसे देणार होती ती  तुमचे नाव पाहून पैसे द्यायला तयार नाहीत!” शत्रुघ्न सिन्हा च्या पुरते लक्षात आले. घई यांना पैसे द्यायचेच नाहीत  शिवाय त्यांना मध्यस्थी देखील करायची नाही. 

हे तेच सुभाष घई होते ज्यांच्यासोबत शत्रुघ्न सिन्हा यांनी कालीचरण, विश्वनाथ, गौतम गोविंदा… असे सुपरहिट सिनेमे केले होते! 

ज्यावेळी परिस्थिती चांगली असते त्यावेळेला एक कोटी रुपये जमा करणे देखील सोपे असतील पण ज्या वेळेला परिस्थिती आपल्या तोंड फिरवते त्यावेळेला शंभर दोनशे रुपये जमा करणे देखील अवघड होते त्याची प्रचिती शत्रुघ्न सिन्हा यांना येत होती.  

एकदा असेच संध्याकाळी एका स्टुडिओमध्ये संजीव कुमार सोबत बोलत होते. 

संजीव कुमारने त्यांचा राग रंग ओळखून त्यांच्या नाराजीचे कारण विचारले. त्यावर शत्रुघ्न सिन्हा यांनी  त्यांना पैशाची गरज आहे हे सांगितले. संजीव कुमार काही क्षण शांत झाले. नंतर शत्रुघ्न सिन्हाला त्यांनी विचारले, “हे पैसे तुम्ही परत कधी कराल?” त्यावर शत्रुघ्न चे उत्तर होते, “मलाच  माहित नाही!” पुढे दोन दिवसानंतर सकाळी एक व्यक्ती शत्रुघ्न यांच्या घरी  आली. 

ही व्यक्ती म्हणजे संजीव कुमारचे पर्सनल असिस्टंट भाई जी होते. त्यांनी एका वर्तमानपत्र लिफाफ्यात काहीतरी गुंडाळून आल्या होते. ते पॅकेट त्यांनी शत्रुघ्न च्या हाती दिले आणि सांगितले ,” सरांनी तुम्हाला ही व्हिडिओ कॅसेट दिली आहे. ती तुम्ही नक्की पहा.” असे सांगून  ते निघून गेले.

शत्रुघ्न ने जेव्हा ते  पॅकेट ओपन केले त्यावेळेला त्यात व्हिडिओ कॅसेट नव्हती तर चक्क दहा लाख रुपये होते! त्यांनी संजीव कुमारला फोन केला आणि म्हणाले, “मित्रा धन्यवाद! खूप मोठा काम केलं. पण या पैशाचा इंटरेस्ट किती द्यायचा?” त्यावर संजीव कुमार ने उत्तर दिले,”एकीकडे तू मित्रा म्हणतोस आणि इंटरेस्ट बद्दल देखील विचारतोस… मैत्रीमध्ये कुठला आला इंटरेस्ट?” शत्रुघ्न सिन्हा गदगदले.

तरी ते म्हणाले,” माझ्याकडे जसे जसे पैसे येतील त्या पद्धतीने आपल्याला पैसे परत करत जाईन.” संजीव कुमार म्हणाले, “त्याची अजिबात  काळजी करू नका तुमचे काम महत्वाचे!”  नंतर शत्रुघ्न नियमित हप्त्याने संजय कुमारकडे पैसे पोहोचवत राहिला. 

परंतु ६ नोव्हेंबर १९८५ रोजी  संजीव कुमार चे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आपल्या मित्राच्या अकाली निधनाने शत्रुघन सिन्हा यांना खूप धक्का बसला. ते म्हणाले, “माझे अजून काही पैसे द्यायचे आहेत पण आता मी ते कुणाला देऊ? त्याचे उपकार मी आयुष्यभर विसरू शकत नाही!”

-भिडू धनंजय कुलकर्णी 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.