हाफिज सईदच्या पोरासकट चीननं आतापर्यंत पाकिस्तानातल्या ५ दहशतवाद्यांना वाचवलंय..

१८ ऑक्टोबर आणि १९ ऑक्टोबरला भारत व अमेरिकेनं पाकिस्तानातील २ दहशतवाद्यांना यूएनच्या ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यासाठी संयुक्त राष्ट्रात प्रस्ताव मांडले होते. या दोन्ही प्रस्तावांवर चीनने व्हेटोचा वापर केला आणि दोन्ही दहशतवाद्यांना कारवाईपासून वाचवलंय.

चीनने ज्या दहशतवाद्यांना वाचवलंय त्यांच्यात लष्कर-ए-तैय्यबाचा दहशतवादी शाहिद महमूद आणि हाफिज सईदचा मुलगा तलहा सईद यांचा समावेश आहे 

आतापर्यंत जेव्हा जेव्हा भारताने यूएनमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांना यूएनच्या ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा प्रस्ताव आणला आहे. तेव्हा तेव्हा चीनने स्वतःच्या व्हेटोचा वापर केला आहे. चीनने शाहिद महमूद आणि तलहा सईद या दोघांसोबत अब्दुल रहमान मक्की, अब्दुल रऊफ अजहर आणि साजिद मीर या ३ दहशतवाद्यांना सुद्धा ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यापासून वाचवलं होतं.

पण चीन नेहमी पाकिस्तानी दहशतवाद्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यापासून का वाचवतोय?

तर पाकिस्तान आणि चीनचे संबंध कायम भारत विरोधी राहिलेले आहेत. ज्या देशाकडून फायदा मिळतो त्या देशाबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचं पाकिस्तानचं परराष्ट्र धोरण राहिलं आहे. यात अमेरिका, चीन आणि रशिया या कट्टर विरोधी देशांसोबत पाकिस्तानचे मैत्रीसंबंध आहेत. याच माध्यमातून चीनने पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलीय. इकॉनॉमिक कॉरिडोर बांधण्यापासून कर्ज देण्यापर्यंत चीनने पाकिस्तानला मदत केलीय. 

चीन स्वतःच्या महत्वाकांक्षी सिल्क रूट प्रोजेक्ट अंतर्गत पाकिस्तानमध्ये चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर बांधतोय. 

चीन बांधत असलेला हा इकॉनॉमिक कॉरिडोर पाकव्याप्त काश्मीरमधुन सुरु होतो आणि पाकिस्तानच्या ग्वादर बंदरावर संपतो. हा कॉरीडोर ज्या भागातून जातो त्यातील बराचसा भाग दहशतवाद्यांच्या प्रभावाखाली आहे. जोडीस जोड पाकिस्तान सरकारचं सुद्धा या दहशतवाद्यांना पाठबळ आहे. त्यामुळे सोईनुसार सहकारी देश बदलणाऱ्या पाकिस्तानच्या विरोधात जाणे चीनला परवडणारं नाही.

आर्थिक कारणांसोबतच चीनकडून उगेर मुस्लिमांवर जे अत्याचार सुरु आहेत त्यावर चीनला पाकिस्तानची दखल नकोय.

चीनच्या क्षीनझियांग प्रांतात चीन सरकारकडून उगेर मुस्लिमांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार केले जात आहेत असे आरोप चीनवर होतात. उगेर मुस्लिमांच्या मस्जिदी बंद करणे, त्यांना छावण्यांमध्ये ठेऊन त्यांच्यावर अत्याचार करणे, त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याची पायमल्ली करण्यावरून चीनच्या विरोधात सुद्धा यूएनमध्ये ठराव मांडण्यात आले आहेत. पण या ठरावावर पाकिस्तानने चीनची पाठराखण केलीय.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांनी, चीन सरकारकडून उगेर मुस्लिमांवर राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पांची स्तुती केली होती. तसेच चीनचं हे मॉडेल पाश्चिमात्य विकासाच्या मॉडेलला पर्याय आहे, असं सुद्धा म्हटलं होतं.   

हितसंबंधांमुळे चीन प्रत्येक वेळी पाकिस्तानी दहशतवाद्यांची पाठराखण करतोय. परंतु या दहशतवाद्यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकल्याशिवाय भारत आणि अमेरिकेत असलेल्या दहशतवादाला आळा बसणार नाही. कारण भारत आणि अमेरिकेने ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यासाठी प्रस्ताव आणलेले दहशतवादी दोन्ही देशांसाठी धोकादायक आहेत. 

दहशतवादी शाहिद महमूदने भारत आणि अमेरिकेसोबतच जगातील अनेक देशांमध्ये दहशतवादी कारवाया केल्या आहेत.

अमेरिकेच्या ट्रेजरी डिपार्टमेंटच्या माहितीनुसार, शाहिद महमूद २००७ पासून लष्कर ए तैय्यबा या दहशतवादी संघटनेत काम करतोय. आधी तो संघटनेच्या पब्लिकेशन विभागात काम करत होता. शाहिद हा २६/११ च्या मुंबई हल्ल्यामागचा मास्टरमाइंड साजिद मीरचा विश्वासू आहे. तो २०१३ पासून लष्कर ए तैय्यबाच्या परराष्ट्र ऑपरेशन टीममध्ये काम करतोय. यातूनच तो भारताशेजारी असलेल्या बांगलादेश आणि म्यानमारमधील मुस्लिम दहशतवादी संघटनांसोबत जवळीक वाढवतोय.

शाहिद २०१५-१६ मध्ये लष्कर ए तैय्यबाची फाउंडेशन असलेल्या फलाह ए इन्सानियतचा उपाध्यक्ष राहिलाय. या फाउंडेशनच्या माध्यमातून तो संघटनेसाठी पैसे गोळा करण्याचं काम सुद्धा त्याने केलंय. २०१६ पासून बांगलादेशातील रोहिंग्यांना लष्कर ए तैय्यबामध्ये भरती करण्यासाठी सुद्धा तो प्रयत्न करतोय. सोबतच गाझा, सीरिया आणि तुर्कीतील युवकांना सुद्धा त्याने दहशतवादी बनवलंय.

त्याच्या या कारवायांमुळेच भारत आणि अमेरिकेने त्याला दहशतवादी घोषित केलंय.

२०१६ मध्ये अमेरिकेच्या ट्रेजरी डिपार्टमेंटने शाहिद महमूदला दहशतवादी घोषित केलं होतं. तर २०२० मध्ये भारताने हिजबुल मुजाहिद्दीन, लष्कर ए तैय्यबा, जैश ए मुहम्मद यांसारख्या १८ दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांवर युएपीए अंतर्गत दहशतवादी घोषित केलं होतं. यात शाहिद महमूदचा सुद्धा समावेश आहे

शाहिद सोबतच पाचवा प्रस्ताव हाफिज सईदच्या मुलाला सुद्धा ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याचा होता.

२६/११ च्या मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि लष्कर ए तैय्यबाचा प्रमुख हाफिज सईदचा मुलगा तलहा सईद हा सुद्धा दहशतवादीच आहे. तो लष्कर ए तैय्यबाच्या मौलवी विंगचा प्रमुख आहे. अफगाणिस्तानात राहणाऱ्या भारतीयांवर हल्ला करून त्यांना करण्यामध्ये तलहा सईदचा हात होता. काश्मीरमध्ये युवकांना लष्कर ए तैय्यबात भरती करणे आणि काश्मिरात दहशतवादी कारवाया करण्यात सुद्धा त्याचा सहभाग होता.

पाकिस्तानातील वेगवेगळ्या कॅम्पमध्ये जाऊन तिथल्या युवकांना भारत, अमेरिकन आणि इस्रायली लोकांच्या विरोधात जिहाद करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम तो करतोय. त्यामुळे भारत सरकारने तलहा सईदला सुद्धा दहशतवादी घोषित केलंय. 

या दोघांपूर्वी अब्दुल रहमान मक्की, अब्दुल रऊफ अजहर आणि साजिद मीर या तिघांना सुद्धा ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याचा प्रस्ताव भारत आणि अमेरिकेने यूएनमध्ये मांडला होता. 

यात लष्कर ए तैय्यबाचा दहशतवादी साजिद मीर हा २६/११ चा मास्टरमाइंड होता. 

सप्टेंबर महिन्यात यूएनमध्ये साजिद मीर याला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्याला सुद्धा चीनने व्हिटोचा वापर करून वाचवलं होतं. मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याची प्लॅनिंग यानेच केली होती. त्यामुळे भारताने साजिदला मोस्ट वॉन्टेड दहशतवादी घोषित केलंय. २६/११ मध्ये साजिदची भूमिका असल्यामुळे अमेरिकेने त्याच्यावर ४१ करोड रुपयांचं बक्षीस ठेवलं आहे.

मीरने भारतासोबतच पाकिस्तानात सुद्धा दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग घेतलाय. त्यामुळे जून २०२२ मध्ये पाकिस्तानातील दहशतवादी विरोधी न्यायालयाने त्याला १५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती. पण पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी साजिद मीरचा मृत्यू झालाय असा दावा केला होता. परंतु इंटेलिजन्सच्या माहितीनुसार मीर सध्या एलटीई मध्येच दहशतवादी कारवायांचा प्रमुख म्हणून काम करतोय.

तर ऑगस्ट महिन्यात ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा प्रस्ताव अब्दुल रौफ अजहर याच्यासाठी मांडण्यात आला होता.

अब्दुल रौफने २००७ मध्ये जैश ए मुहम्मदाचा असिटिंग कमांडर म्हणून दहशतवादी कारवाया सुरु केल्या. तो भारतात जैशचा गुप्तहेर म्हणून काम करत होता. २००८ सालात अब्दूलने काश्मीरसह भारतात आत्मघाती हल्ले करण्याची प्लॅनिंग केली होती. १९९९ मध्ये एअर इंडियाच्या विमानाचं अपहरण करण्यामध्ये सुद्धा अब्दुलचा हात होता. यासोबतच अब्दुल रौफ जैशच्या पोलिटिकल विंगमध्ये सुद्धा काम करत होता. २०१० मध्ये अमेरिकेने अब्दुल रौफवर दहशतवादी घोषित करून त्याच्यावर बंदी घातली होती.  

जून २०२२ मध्ये भारत अमेरिकेने अब्दुल रहमान मक्खीला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याची मागणी केली होती. 

अब्दुल रहमान मक्खी हा हाफिज सईद याचा मेहुणा आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणे, लष्कर ए तैय्यबामध्ये दहशतवाद्यांची भर्ती करणे, युवकांचा भारतविरोधी कारवाया करण्यासाठी भांडवणे आणि त्यांना दहशतवादी बनवण्याचे आरोप अब्दुल रहमान मक्खी वर आहेत. भारताने युएपीए कायद्यानुसार २०२० मध्ये मक्खीला दहशतवादी घोषित केलंय. तर अमेरिकेने सुद्धा याला दहशतवादी घोषित केलंय.

भारत आणि अमेरिका या सगळ्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न करत आहेत कारण दहशतवाद्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करणे सोप्पं होतं.

युनायटेड नेशनने दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी १९९९ मध्ये यूएनएससी कायद्याची निर्मिती केली होती. या कायद्यानुसार जगभरातील दहशतवाद्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं जातं. जेव्हा या कायद्यानुसार दहशतवाद्यांवर बॅन लावलं जातं तेव्हा हे बॅन जगभरात लागू होतात.

यात बॅन केलेल्या दहशतवाद्यांना कोणत्याही देशात प्रवेश मिळत नाही. दहशतवादी कोणत्याही देशात आर्थिक उत्पन्न मिळवू शकत नाही. दहशतवाद्यांचे जगभरातील सगळे बँक खाते फ्रिज करण्यात येतात. दहशतवाद्यांशी संबंधित असलेल्या सर्व संस्थांवर बंदी घातली जाते.

जर या दहशतवाद्यांना जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत म्हणजेच ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात आलं असतं तर पाकिस्तानला या सर्व दहशतवाद्यांच्या संस्था, बँक खाते आणि प्रवेशावर बंदी घालावी लागली असती. परंतु यूएनमध्ये पाकिस्तानला हा प्रस्ताव रोखता येत नाही त्यामुळे चीनने स्वतःच्या व्हेटो पॉवरचा उपयोग करून हे सर्व दहशतवादी ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यापासून वाचवले आहेत.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.