पूर स्थितीत मदत हे सोशल मिडीयाच काम आहेच, पण पूर येण्याची पुर्वकल्पना देण्याची अधिक गरज आहे.
सोशल मीडियाची ताकद आपण गेली कित्येक वर्षं अनुभवतोय. वापरतोय. संकट आलं की एकवटतो. देशभक्ती दाखवायची वेळ आली की जग हादरून जाईल असे एकत्र येतो. पण आपल्या एक लक्षात येत नाही की आपण फक्त संकट आलं की एकत्र येतो. आपण अडचणीत आलो की एकत्र येतो.
संकट नसताना पण खूप महत्वाच्या गोष्टी घडत असतात.
उदाहरणार्थ देशात मतदान होतं. नवीन कायदे येतात. नवीन प्रकल्प येतात. या प्रत्येकवेळी आपल्यात उभी फूट पडलेली असते. आपण शत्रू असल्यासारखे वागत असतो. तुम्ही म्हणाल मतदानाच्यावेळी फूट पडणारच. ती पडते. लोकशाहीची गरज आहे. पण ते शत्रुत्व असायला हवं का? कुणी देशभक्त आणि कुणी देशद्रोही असं विभाजन कसं असेल?
देशावर संकट आलं की सगळे धावून येतात. मग देशाचा विकास करण्यासाठी एखादी निवडणूक असेल, कायदा असेल तेंव्हा ही एकी कुठे जाते ?
एकी म्हणजे सगळ्यांनी एका सुरात बोलणे असा अर्थ नाही. सगळ्यांनी एका मुद्द्यावर समंजसपणे बोलणे असा अर्थ अपेक्षित आहे. लगेच आपला विरोधक देशद्रोही ठरवून आपण मोकळे होऊ शकत नाही. एखादी निवडणूक, एखादी योजना, एखादा कायदा प्रत्येक माणसाला विश्वासात घेऊन, त्याच्या मताची दखल घेऊन होणार असेल तर कुणाचा काही विरोध असण्याचं कारण नाही. पण आपल्याला विश्वासात घ्यायची गरज वाटली पाहिजे हे महत्वाचं आहे. आणि त्या दृष्टीने आपण सामान्य माणसं सोशल मिडीयावर तेवढे प्रभावी नसतो.
आपल्याला गृहीत धरायची गरज प्रत्येक सरकारला, प्रत्येक कंपनीला, प्रत्येक सरकारी खात्याला वाटली पाहिजे. तेवढा आपला दबाव गट असला पाहिजे.
केबल टीव्हीचे नियम बनवताना आपला काही विचार झाला का? टोल नाक्याच्या बाबतीत सामान्य माणसाच्या भावना समजून घेतल्या जातात का? पुराच्या पाण्याचा सगळ्यात जास्त त्रास सामान्य माणसाला होतो आणि निर्णय कुठल्यातरी राज्याचं सरकार घेतं. कर्नाटक असो किंवा महाराष्ट्र सरकार असो. पूर परिस्थिती निर्माण होताना किंवा होणार आहे हे ठळकपणे दिसत असताना आजवरच्या इतिहासात सामान्य माणसाला किती महत्व दिलं गेलंय? सुनामीची सुद्धा कल्पना येते आधी आजकाल. पूर तर सरकारी निर्णय असतो. तरीही एवढ नुकसान होत असेल तर आपण सगळेच सोशल मिडीयाचा वापर करण्यात कमी पडतोय हे स्पष्ट आहे.
धरणातून पाणी सोडलं जाणार आहे, ते किती वेगाने पोचणार आहे, किती काळ असणार आहे या गोष्टी आपण सोशल मीडियातून पोचवू शकत नसलो तर आपण निष्क्रिय आहोत. आपल्याला खरोखर सोशल मिडिया अजून कळलेला नाही.
अशावेळी सोशल मिडीयाचा खरा उपयोग समजून घेण्याची आवश्यकता निर्माण होते. पूर परिस्थितीत मदत हे सोशल मिडियाचे काम आहे. त्यात खूप अफवासुद्धा विनाकारण पसरतात. पण प्रचंड प्रमाणात मदतसुद्धा गोळा होते. ते जास्त महत्वाचं आहे. पण पूर येऊ नये किंवा पूर आला तरी खूप नुकसान होऊ नये ही खरी सोशल मीडियाची जबाबदारी आहे. कुठलंही संकट आल्यावर धावून जाण्यासाठी आपण सगळे तत्पर आहोत.
पण सोशल मिडिया संकट येण्याआधी त्याची चाहूल देऊ शकतो.
प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मिडियापेक्षा जास्त वेगवान सोशल मिडिया आहे. मग या वेगाचा वापर फक्त अफवा पसरवण्यासाठी नाही हे कधी सांगायचं जगाला?
आपल्याला जबाबदार नागरिक होण्यासाठी नागरिकशास्त्र आहे. पण आजकाल आपण समाजापेक्षा जास्त समाजमाध्यमावर वावरतो. समाजमाध्यम अर्थात सोशल मिडिया. मग या सोशल मिडीयावर पण आपलं नागरिक शास्त्र असायला हवं. शहरी बोलण्यात ज्याला सिव्हिक सेन्स म्हणतात. तो सोशल मिडीयावर असायलाच हवा.
कारण लग्नपत्रिका, वाढदिवस, श्रद्धांजली या गोष्टी आपण सोशल मिडीयावर उरकून घेतो. माणूस गेला की आर आय पी वगैरे ठीक आहे. पण जिवंत माणसांसाठी यापेक्षा खूप जास्त प्रमाणात व्यक्त व्हायला लागेल.
सोशल मिडीयाने short कट शिकवलेत. chatting साठी उपयोगी असतील पण जगण्यात ते उपयोगी नाहीत. थोडं सविस्तर बोलायला पाहिजे. चर्चा करायला पाहिजे.
सोशल मिडिया नीट समजून घेतला पाहिजे. पण सांगणार कोण?
सोशल मिडिया संमेलन एवढ्यासाठी आहे. आणि एक नाही दोन दिवस आहे. आपल्याला सोशल मिडियासंदर्भात पडणाऱ्या सगळ्या प्रश्नांना समजून घेणारं संमेलन.
सोशल मीडियात काय चांगलं काम करता येतं, काय लिहिलं पाहिजे, कसं लिहिलं पाहिजे, आणि काय लिहायला नको हे सगळं समजून घेता येईल. कारण सोशल मिडीयावर टक्के टोणपे खाणारी, कधी ट्रोल झालेली, कधी व्हायरल झालेली, कधी टीकेची धनी झालेली, कधी कौतुकाची वाटेकरी झालेली माणसं आपले अनुभव सांगणार आहेत. सोशल मिडीयावर घडणाऱ्या फसवणूक आणि गुन्ह्यांच्या संदर्भात काम करणारी माणसं, प्रत्यक्ष सरकार आणि पोलीस सहभागी आहेत. आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे.
आपण जर सोशल मिडियाचं गांभीर्य समजत असू तर हे संमेलन चुकवून चालणार नाही. कारण सोशल मिडियासंदर्भातल्या प्रत्येक विषयाला इथे वाचा फोडली जाणार आहे. उत्तर शोधायला समोर योग्य माणसं भेटणार आहेत. फक्त एक अडचण आहे. तिथे तुम्हाला स्वतः यावं लागेल. कारण फेक अकाऊन्ट चालणार नाही. येणारे लोक तेवढे जाणकार आहेत. स्वतः या. स्वतःची ओळख असणारी माणसं येणार आहेत.
तुम्हीही या. सोशल मिडीयावर आपली आणी आपल्या कामाची खरी ओळख निर्माण करायची असेल तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल. अशी असंख्य माणसं भेटतील जी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देऊ शकतील. फक्त यावं लागेल.
कार्यक्रमस्थळ आणि दिनांक
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सभागृह, नरीमन पॉईंट, मुंबई
१७ ऑगस्ट: स. ११:०० ते दु. ४:०० आणि १८ ऑगस्ट: स. ११:०० ते सं. ७:००
नोंदणीसाठी संकेतस्थळ :
नोंदणीसाठी ह्या संकेतस्थळाला भेट द्या: http://greenpass.com/msm/web/
नोंदणी शुल्क (भोजनशुल्कासह): एका दिवसाचे रू. ३०० आणि दोन दिवसांचे रू. ५००
संपर्क : +९१ ८४८४८ ८९४४५ info@dimipremi.com
अधिकृत फेसबूक पेज: https://www.facebook.com/MarathiSocialMediaSammelan/