स्वातंत्र्य आणि सोशल मीडिया.

सोशल मीडियामुळे आपल्याला एक नवं स्वातंत्र्य मिळालं आहे, कोणालाही, कधीही, कोणत्याही विषयावर, कोणत्याही पद्धतीनं व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य !

स्वतंत्र भारतामध्ये तत्वतः हे स्वातंत्र्य होतंच, पण प्रॅक्टिकली ते आचरणात आणणं हे केवळ सोशल मीडियामुळे शक्य झालं आहे. सोशल मीडिया येण्याआधी कोणत्याही विषयावर कोणाला काही मत मांडायचं असेल आणि ते हजारो लोकांपर्यंत पोचवायचं असेल, तर त्यासाठी वर्तमानपत्रं किंवा नियतकालिकांमध्ये लेख लिहावा लागायचा.

लेख लिहिणं, तो वर्तमानपत्र/नियतकालिकात नेऊन देणं, त्यांना तो आवडणं/पटणं, त्यांच्याकडे त्या विषयासाठी जागा असणं आणि मग त्यांनी तो छापणं अशी एक लांबलचक आणि किचकट प्रक्रिया होती साधं व्यक्त होण्यासाठी.

अर्थात छापिल माध्यमं व त्यातील जागा मर्यादित असायच्या आणि ही माध्यमं अफाट खर्चिकही असायची (अजूनही आहेत). त्यामुळे त्यात काय छापायचं हे ठरवणारे लोक खूप चोखंदळ असायचे, अन त्यात काय छापलं जाऊ शकतं यावर खूप मर्यादाही असायच्या. (अजूनही छापील विश्वात हे सारं सारं असंच आहे).

त्यामुळे तत्वतः आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं तरी ते वापरू शकू अशी व्यासपीठं आणि संधी अत्यंत मर्यादित होत्या. 

सोशल मीडियामुळे मात्र हे चित्र आमूलाग्र बदललं आहे. एक साधा स्मार्टफोन आणि छोटासा डेटा पॅक जिच्याकडे आहे अशी कोणीही व्यक्ती जगातल्या कोणत्याही विषयावर कधीही व्यक्त होऊ शकते अन ती अभिव्यक्ती हजारो-लाखो लोकांपर्यंत कोणत्याही अडथळ्याविना क्षणार्धात जाऊ शकते हे आजचं सत्य आहे.

अभिव्यक्तीचं हे खरंखुरं लोकशाहीकरण, खरंखुरं स्वातंत्र्य आहे. आपला धर्म, वर्ण, पंथ, जात, लिंग असे कोणतेही पारंपारिक भेद, जुन्या पुराण्या भिंती इथे लागू नाहीत. (या साऱ्यांवरून इथेही भांडणं होतात हे खरंय, पण तो मुद्दा नाहीये, मुद्दा असाय की यातल्या कोणत्याच भिंतींमुळे इथे कोणीही व्यक्त होण्यापासून आपल्याला थांबवू शकत नाही).

आपल्या आयुष्यात घडत असलेली ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची क्रांती विलक्षण महान आहे! 

मात्र ह्या स्वातंत्र्याचा आपण कसा वापर करतो आहोत ह्याचा आपला आपण विचार करायला हवा. “With great power comes great responsibility”. सोशल मीडियामुळे मिळालेल्या अनिर्बंध अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे अापल्याला अफाट ताकद मिळाली आहेच, पण त्या ताकदीसोबतच, ती उचित पद्धतीनं वापरण्याची जबाबदारीही आपल्यावरच आलेली आहे. आपल्याला ह्या ताकदीची, अन जबाबदारीची, दोन्हीची जाणीव आहे का? नसेल, तर ती असायला हवी ना? शिवाय, सोशल मीडियामुळे कधीही कशावरही व्यक्त होण्याची ताकद आपण कशासाठी वापरतो आहोत याचा आपण विचार करतो का? नसू, तर तो करायला हवा ना? 

एक नेहमीचं उदाहरणं घेऊया.

जगाच्या कोपऱ्यात कुठेही घडलेली एखादी लक्षणीय घटना आपल्यापर्यंत पोचते. पूर, दुष्काळ, अपघात, बॉम्बस्फोट, अतिरेकी हल्ला, खून, मारामाऱ्या, आत्महत्या अशी कोणतीही आपल्याला हेलावून सोडणारी घटना. त्या घटनेवर आपल्याला तात्काळ व्यक्त व्हावंसं वाटतं.

त्या घटनेविषयी, त्यातल्या व्यक्तींविषयी आपल्याला वाटत असलेली हळहळ, दुःख, राग, संताप, चिडचिड, वैताग, उपहास, प्रेम-द्वेष ह्या पैकी जे काही असेल ते सगळं क्षणार्धात मांडावंसं वाटतं. पटकन आपण मोबाईल उचलतो. सोशल मीडियावर जातो. अन जे काही वाटतं ते ओकून (पोस्टून) टाकतो. हे करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहेच, पण आपण जे करतो ते जबाबदारीनं करतो का भावनेच्या भरात करतो? अन आपण फक्त स्वातंत्र्य उपभोगत असू, पण त्यामुळे आपण करत असलेल्या कृत्यांची जबाबदारी घेत नसू तर त्या स्वातंत्र्याला काही अर्थ आहे का? 

सॉरी, मी फक्त प्रश्न विचारत आहे, उत्तरं देत नाहीये. कारण हे प्रश्न मला जेन्युईनली पडलेले आहेत आणि यांची उत्तरं मला मिळालेली नाहीयेत, मिळत नाहीयेत. सोशल मीडियामुळे आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची क्रांती घडली आहे. पण हे स्वातंत्र्य जबाबदारीनं कसं वापरायचं हे आपल्याला माहित नाहीये अन जमतही नाहीये असं मला वाटतं आहे. 

माझं हे मत चुकीचं ठरो अशी माझीच मनोमन इच्छा आहे! 

सोशल मीडियामुळे आपल्याला मिळालेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला जबाबदारीनं वापरता येवो अन ते चिरायू होवो ही मनोमन प्रार्थना!! 

  • प्रसाद शिरगांवकर

[लेखक मुक्तस्रोत तंत्रज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे प्रशिक्षक आणि वक्ते आहेत]

संपर्क: facebook.com/prasad.shir

[पहिलं ‘मराठी सोशल मीडिया संमेल’न येत्या वीकेडला घडत आहे. त्यात सहभागी होऊन ह्या आणि अशा अनेक प्रश्नांवर चर्चा करुया!!]

अधिक माहितीसाठी. 

कार्यक्रमस्थळ आणि दिनांक

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे सभागृह, नरीमन पॉईंट, मुंबई 

१७ ऑगस्ट: स. ११:०० ते दु. ४:०० आणि १८ ऑगस्ट: स. ११:०० ते सं. ७:००

नोंदणीसाठी संकेतस्थळ

नोंदणीसाठी ह्या संकेतस्थळाला भेट द्या:  http://greenpass.com/msm/web/

नोंदणी शुल्क (भोजनशुल्कासह): एका दिवसाचे रू. ३०० आणि दोन दिवसांचे रू. ५०० 

संपर्क

+९१ ८४८४८ ८९४४५  [email protected]

अधिकृत फेसबूक पेज: https://www.facebook.com/MarathiSocialMediaSammelan/

हे हि वाच भिडू. 

2 Comments
  1. Mahesh Desai says

    आपलं हे सोशल स्वातंत्र्य सरकार च्या हातात आहे
    ते नेट बंद केल्यावर आपन काय करनार

  2. मजहर खान says

    खूप छान आपण उत्तम प्रकारे Artical लिहीत असतात, मी आपले artical वाचत असतो,माझी ही मराठी/हिंदी website आहे ,जर इंटरेस्ट असेल तर वाचावे, https://sajagnagrikktimes.com

Leave A Reply

Your email address will not be published.