प्रियांकाचे मिस्टर वापरतात मान्य आहे पण या जगप्रसिद्ध सोलापूर चादरीचा इतिहास काय आहे ?

भिडू मंडळी आम्हाला मेसेज करत असतात. आजच सकाळी सोलापूर वरून आम्हाला मेसेज आला.

 काय बे भिडू ते निकु दाजी आमच्या सोलापूरची चादर घालायला लागलंय कि बे. जरा आमच्या चादरीचा इतिहास सांग कि बे जनतेला.

आता निकु दाजी कोण काय प्रश्न पडला असेल तर ते आधी क्लियर करतो. निकु दाजी म्हणजेच आपल्या प्रियंका चोप्राचे मिस्टर निक जोनास. त्यानं इंस्टाग्रामवर एक नवीन फोटो टाकला. फोटो टाकला म्हणजे काय तसा तो नॉर्मलच फोटो.  पण या फोटोत एक खास गोष्ट होती.

सोलापुरी चादर 

साधीसुधी नाही तर सोलापूरच्या चाटलांची चादर…

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा सोलापुरी चादर नाही असं एकही घर सापडणार नाही. सोलापुरी चादरीने फक्त राज्यातच नाही तर संपूर्ण देशभरात आपलं नाव कमावलं आहे. सोलापूरला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देण्याचं काम केलं चादरीनेच.

अनेकदा प्रश्न पडतो सोलापूरच्या चादरीची स्पेशालिटी काय ? ही चादर बाकीच्यांच्यापेक्षा भारी का ठरते?

याच उत्तर मिळतं सोलापूरच्या इतिहासात.

सोळा गावांचे मिळून निर्माण झालेले शहर म्हणून ‘सोलापूर’ हे नाव पडलं असं म्हणतात. इ. स. पू. २०० पासून सातवाहन, बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य, देवगिरीचे यादव, बहमनी, निजामशाही, आदिलशाही, मराठे आणि शेवटी ब्रिटिश या विविध सत्तांनी सोलापूरवर राज्य केले.

इथला किल्ला अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार आहे. पुणे-हैदराबाद यांदरम्यान असलेल्या स्थानामुळेही याला महत्त्व आहे. आदिलशाही व निजामशाही यांच्यात या किल्ल्याच्या मालकीवरून सतत लढाया होत राहिल्या. इ. स. १५२३ मध्ये या दोन सत्ताधिशांमध्ये मैत्रीचा तह झाला. अनेक सत्ताधिशांचे मुक्काम या किल्ल्यात असत. दक्षिणेकडील स्वारीवर आलेल्या औरंगजेबाचा नेहमीचा मुक्काम या किल्ल्यात असे.

या सुलतानशाही राजवटीच्या काळात अनेक मुस्लिम मोमीन सोलापुरात येऊन वसले. त्यांचा मुख्य व्यवसाय विणकामाचा होता. अठराव्या शतकात मराठ्यांनी सोलापूर ताब्यात घेतलं.

१७५८ मध्ये उदगीरच्या लढाईत हैद्राबादच्या निजामाचा मराठ्यांनी चारी मुंड्या चित करून पराभव केला. यानंतर घाबरलेल्या खलिलुद्दीन खान या सोलापूरच्या किल्लेदाराने लाच खाऊन सोलापूर पेशव्याच्या हवाली केले. इथून पुढची साठ वर्षे सोलापुरवर मराठेशाहीचा झेंडा फडकला.

या काळात सोलापूरने उत्कर्ष अनुभवला.

विशेषतः माधवराव पेशव्यांनी आंध्र कर्नाटक सीमेवर असल्याचा फायदा घेण्यासाठी यागावात बाजारपेठ वसवली. इथल्या परगण्याचे मामलेदार उधोविश्वेश्वर यांच्या मागणी नुसार १७६८ साली माधव पेठ बनवण्यात आली. या पेठेची देखभाल करण्याची जबाबदारी कर्नाटकातून आलेल्या जोशी कुटुंबाकडे देण्यात आली.

पेशवे यांनी हातमागाच्या व्यवसायास उत्तेजन दिले. तेलगू भागातून आलेल्या पद्मशाली समाजातील विणकरांनी हातमागावर साडी आणि धोतर विणण्याचे काम सुरु केले. माधवराव पेशव्याच्या दूरदृष्टीमुळे आणि विणकर समाजाच्या मेहनतीच्या जोरावर सोलापुरात कापड उद्योग रुजला.

१८१८ साली पेशवाई बुडली आणि सोलापुरवर देखील इंग्रजांचा अंमल सुरु झाला. कंपनी सरकारच्या काळापासून सोलापूरने आधुनिक बनण्याकडे वाटचाल सुरु केली. त्यांनीच १८५२ मध्ये इथे नगरपालिकेची स्थापना केली. पिण्याच्या पाण्याचे, रस्त्याचे प्रश्न सोडवण्यास सुरवात झाली.

काही वर्षातच सोलापूरमध्ये रेल्वेचं आगमन झालं आणि या गावाचं भवितव्य बदलून गेलं.

सोलापूर अनेक मोठ्या शहरांशी जोडले गेले. इथल्या विणकरांनी बनवलेलं कापड देशभरात जाऊ लागलं. नगरपालिकेने गावातल्या हातमाग व्यवसायाचा सर्व्हे करून त्याचा अहवाल इंग्रज सरकारला पाठवला. अनेक आर्थिक पॅकेज देऊन हातमाग व्यवसाय वाढीस लावला.

येथील पहिली कापड गिरणी ‘सोलापूर स्पिनिंग ॲन्ड वीव्हिंग कंपनी ‘ने इ. स. १८७७ मध्ये स्थापन केली.  

यानंतरच्या काळात या गावातल्या वस्त्रोद्योगामध्ये दिवसेंदिवस आधुनिकता येत गेली. अनेक गिरण्या उभ्या राहू लागल्या. इंग्लंडच्या मँचेस्टरशी स्पर्धा करणारे एक औद्योगिक शहर म्हणून सोलापूरची ओळख बनली. पोटापाण्यासाठी या गावात येणाऱ्या कामगारांच प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं.

१९३५ साली सोलापूरच्या लोकसंख्येच्या एक पंचमांश लोक हातमागावर काम करत होते.

गांधीजींच्या सविनय कायदेभंगाचा काही प्रमाणात फटका सोलापूरच्या वस्त्रोद्योगावर पडला मात्र दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इथल्या कापडाची मागणी प्रचंड वाढली. दुसऱ्या महायुद्धाचे संकट या गावासाठी भरभराटीचे ठरले. इथल्या विणकरांनी प्रचंड प्रमाणात नफा कमावला. क्षीरसागर, चिलका, चाटला, वडनाल, दत्तोबा दिवटे, कमटम अशा उद्योजकांनी साड्या पासून चादरीपर्यंत निर्मिती सुरु केली.

आपल्या निकु जोनास दाजींनी परिधान केलेलं चादरीचा जाकीट याच चाटला उद्योगसमूहानेच बनवलय. म्हणजे जाकीट बनवलं नाही, चादर त्यांनी बनवलीय. नाव देखील दिसतयच.

चाटला वगैरे चादरीचे कारखाने उभे राहत होते साधारण याच काळात आंध्र प्रदेशातील वरंगल जिल्ह्यातल्या मेडक गावातून एक हातमागावर काम करणारा विणकर आपल्या कुटुंबासह सोलापुरात आला आणि व्यवसायाच्या निमित्याने इथेच स्थायिक झाला. त्यांचं नाव यंबय्या माल्ल्या पुलगम. सुरवातीला इतरांच्या मागावर काम केलं, थोडे पैसे गाठीला बांधले आणि १९४९ साली स्वतःचे माग टाकले.

अवघ्या चार लुम्सवर झाली. त्यांनी सुरवातीला फरसपेटी व जपानी किनारयांच्या साड्याच उत्पादन केल. पुढच्या काही दिवसातच चारचे आठ माग झाले. 

दहा वर्षातच पुलगम यांनी सोलापूरच्या साखरपेठेत पहिले दुकान उघडले. ‘लक्ष्मीनारायण छाप लुगडी’ या नावाने त्यांच्या नऊवारी साड्या प्रचंड फेमस झाल्या. स्त्रियांच्यात या साड्यांना प्रचंड मागणी वाढली. क्वालिटी टिकवून व्यवसाय केला यामुळे त्यांचे नाव बाजारपेठेत मोठे झाले.

साड्यांच्या यशानंतर १९६४ साली रामय्या पुलगम यांनी आठ मागावर चादरींचे उत्पादन सुरु केले. साड्यांमुळे नाव झालेच होते मयूर पंख छाप चादरीने पुलगमला मोठी ओळख मिळवून दिली.

चादरी पाठोपाठ टॉवेल, बेडशीट यांचे उत्पादन सुरु झाले. येत्या काळात आठाचे एकशेचार हातमाग झाले. सोलापूरच्या दाजी पेठेत शोरूम सुरु झालं. खास चादरी घेण्यासाठी आसपासच्या गावातून लोक सोलापूरला येऊ लागले.

सोलापूरच्या या जेकॉर्ड चादरी त्यांची गुणवत्ता, टिकाऊपणा, त्यांच्या रंगसंगती यामुळे त्यांचे वेगळेपण जपले जात होते. सूतगिरण्या बंद पडल्यामुळे विस्थापित झालेल्या कामगारांना या यंत्रमाग व्यवसायाने सावरले. फक्त पुलगमच नाही तर इतर अनेक कारखान्यात जेकॉर्ड चादरी, टर्किश टॉवेल्स बनू लागले.

पुलगमची खासियत आणि त्यांचं नाव मात्र सोलापूरच्या चादरींची पॉप्युलॅरीटी वाढवण्यासाठी उपयोगी ठरले.

त्यांनी एमआयडीसी परिसरात अत्याधुनिक कारखाना उभारला तर आजही त्यांचे गोडाऊन दाजीपेठेतील शोरूममध्ये आहे. दररोज महाराष्ट्र,कर्नाटक, आंध्र इथल्या खेड्यापाड्यातून शेकडो लोक या शोरूममध्ये चादरी खरेदी करण्यास येत असतात.

चादरीबरोबरच सोलापूरचे बेडशीट, सतरंज्या, टॉवेल, नॅपकिन, सुती लुगडी ही उत्पादने देशभरात फेमस झाल्या. फक्त भारतातच नाही तर भारताबाहेर रशिया, युरोप, आखाती देश, श्रीलंका, बांगलादेश या देशांमधूनही सोलापुरी चादरीला मागणी येऊ लागली.

सोलापूरची चादर हे महाराष्ट्रातील जीआय (जियोग्राफिक इंडिकेशन) मिळवणाऱ्या पहिल्या प्रॉडक्ट पैकी एक आहे. सोलापुरी चादरीचा ब्रँड बनवणे आणि तिला जगभरात पोहचवणे यात पुलगम कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे.  

त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी चादरीच्या व्यवसायात आधुनिकता आणण्यास प्राधान्य दिले. चादरीचे योग्य मार्केटिंग केलं. त्यांच्या मालाचा खप ,नवनवीनउत्पादने आणि quality ह्याची दखल घेत त्यांना इंडियन इकॉनॉमिक  and रिसर्च असोशिएशन (IEORA )ह्या संस्थेतर्फे “उद्योग रत्न” पुरस्काराने व दिल्लीतील  world इकॉनॉमिक प्रोग्रेस सोसायटी तर्फे बक्षीस देऊन गौरवण्यात आलय.  

मात्र गेल्या काही वर्षांपासून या चादरीच्या व्यवसायाला घरघर लागण्यास सुरवात झाली आहे.

एकेकाळी गिरणगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापुरात दहा ते पंधरा हजार यंत्रमागांवर दररोज दिड लाख चादरीचे उत्पादन व्हायचे. तेच आज सातशे ते आठशे माग सुरु आहेत आणि फक्त दहा हजार चादरींचे उत्पादन होत आहे. खास कौशल्य असणारे कामगार यांची संख्या कमी झाली. सोलापुरी चादरीच्या डिझाईन कॉपी करून ड्युप्लिकेट माल खपवण्याच्या उद्योगाचाही फटका इथल्या वस्त्रोद्योगाला बसला आहे.

पण सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बदलत्या जीवनशैली मुळे फॅशनेबल ब्लॅंकेट, प्रिंटेड बेडशीट, प्लास्टिक चटई ची मागणी वाढली आहे. दहा दहा वीस वीस वर्षे टिकणाऱ्या चादरीच्या ऐवजी काहीजण युज अँड थ्रो टाईपच्या सध्या कमी क्वालिटीच्या चादरी घेण्यास प्राधान्य देत आहेत.

मात्र एक मात्र खरं की धावपळीच्या जगात आपण कितीही महागडे मऊसूत ब्लॅंकेट वापरले तरी लहानपणीच्या सोलापुरी चादरीच्या मायेची ऊब त्यात कधीही मिळत  नाही.   

आवश्यक असताना शासकीय मदत न मिळाल्यामुळे सोलापूर चादर व्यवसाय शेवटचे आचके देताना दिसत आहे. नवीन रिसर्च सेंटर स्थापन करून सोलापूरच्या चादरीला आधुनिक बनवणे, इथल्या व्यावसायिकांना मार्केट उपलब्ध करून देणे ही राज्य व केंद्र सरकारची जबाबदारी आहे. पण ते यात कमी पडताना दिसत आहेत. 

फक्त सोलापूरची नाही तर संपूर्ण महाराष्ट्राची ओळख सातासमुद्रापार नेण्याऱ्या चादरीच्या व्यवसायाला जगवणे हि काळाची गरज आहे. 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.