सोलापूर लोकसभा मतदारसंघ खरंच शिंदेंच्या हातातून निसटलाय का?
परवा रोहित पवारांनी एक वक्तव्य केलं. सोलापूर लोकसभा मतदार संघ हा काँग्रेसने लढवायचा की राष्ट्रवादीने या संदर्भात महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा केली जाईल असं त्यांचं म्हणणं होतं. यासंदर्भात ज्यावेळी प्रणिती शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी थेट कोण रोहीत पवार? असा सवाल विचारला.
पुढे प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या,
“त्यांची पहिली टर्म आहे त्यामुळे, पोरकटपणा असतो काही जणांमध्ये. त्यांना थोडा वेळ द्या… मच्युरिटी येईल त्यांच्यामध्ये.”
आता थेट पोरकट म्हटल्यामुळे रोहित पवारांचे कार्यकर्ते पण जरा आक्रमक झाले… प्रणिती शिंदेंविषयी जरा संतप्त प्रतिक्रिया यायला लागल्या. मग रोहित पवारांनी ट्वीट करत संयमी भुमिका घेतली.
रोहीत पवार ट्वीटमध्ये म्हणाले, “आमदार प्रणिती शिंदे ताईंच्या वक्तव्यावरून नाराज झालेले कार्यकर्ते आपला राग व्यक्त करतायेत,पण कुणीही नाराज होऊ नये. त्या माझ्या मोठ्या भगिनी असून त्यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळं आपापसात वाद न करता बेरोजगारी हा आजचा मुख्य प्रश्न सोडवण्यासाठी आपण आपली शक्ती खर्च करूया!”
हा यांच्यातला वाद आता मिटल्यात जमा आहे. पण विचार करण्याची गोष्टी ही आहे की, सुशिलकुमार शिंदे यांच्यासारख्या काँग्रेसच्या दिग्गज नेत्याच्या मतदार संघाबाबत हे असं वक्तव्य का केलं गेलं? सोलापूर लोकसभेची जागा खरंच काँग्रेसच्या हातून निसटतेय का? या प्रश्नांची उत्तरं बघण्यासाठी आपल्याला मागच्या काही वर्षातला सोलापूरातल्या निवडणुकांचा डेटा बघावा लागेल.
सगळ्यात आधी सुशीलकुमार शिंदे यांची लोक सभेतले खासदार म्हणूनची कारकीर्द कशी राहिलीये ते बघुया.
सगळ्यात आधी १९९८ त्यानंतर लगेच १९९९ ते सोलापूर लोकसभा मतदार संघातून खासदार झाले. त्यानंतर २००३ साली टर्म पूर्ण होण्याआधीच राज्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी त्यांना लोकसभेचा राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रतापसिंह मोहिते-पाटील विजयी झाले.
मग २००४ साली सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली गेली. मात्र, त्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसचा पराभव झाला. भाजपच्या सुभाष देशमुखांचा विजय झाला. पण २००३ च्या पोटनिवडणुकीच्या तुलनेत २००४ ला भाजप उमेदवारानं घेतलेलं लीड प्रचंड घसरलं होतं. फक्त सहा हजार मताधिक्यानं सुभाष देशमुखांचा विजय झाला होता.
त्यानंतर २००९च्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे स्वत: लोक सभेला उभे होते. त्यावेळी पुन्हा त्यांचा विजय झाला. आतापर्यंतचा इतिहास बघितला तर, १९९८ साली ते पहिल्यांदा लोक सभेत पोहोचले. त्यानंतर ज्या ज्या लोक सभेच्या निवडणुका त्यांनी स्वत: लढवल्या, त्या त्या निवडणुकांमध्ये ते जिंकले.
परिस्थिती बदलली ती २०१४ साली.
२०१४ च्या लोक सभा निवडणुकीवेळी देशभरात मोदी लाट आली होती. देशात सत्ता पालट होईल असा अंदाज होता… मोदींच्या नावानं देशभरात जबरदस्त कँपेनिंग केलं गेलं.
सुशीलकुमार शिंदे २०१४ ची लोक सभेची निवडणूक हरले त्याचं कारण ही मोदी लाट असल्याचं बोललं जातं. २०१४ च्या लोक सभा निवडणुकीत सोलापूर मतदार संघातून भाजपचे उमेदवार शरद बनसोडे निवडून आले.
त्यानंतर, २०१९ मध्येही तसाच निकाल आला. सोलापूरातून सुशीलकुमार शिंदे पुन्हा पराभूत झाले. यावेळी भाजपचे उमेदवार असलेले जयसिद्धेश्वर स्वामी यांचा विजय झाला. या निवडणुकीत प्रकाश आंबेडकर हे १ लाख ७० हजार मतांसह तिसऱ्या स्थानावर होते.
बरं २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुकांमध्ये सुशीलकुमार शिंदे यांचा तब्बल दीड दीड लाखांच्या फरकाने पराभव झाला. २०१४ ला मोदी लाटेचा तर, २०१९ ला प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीचा फटका सुशीलकुमार शिंदेंना बसल्याचं सांगतिलं जातं.
आता मुद्दा येतो तो म्हणजे सोलापुरातल्या विधानसभा जागांची परिस्थिती काय आहे?
मोहोळ विधानसभा मतदारसंघात १९९९ पासून राष्ट्रवादीचा उमेदवार विजयी होत आलाय.
सोलापूर शहर-उत्तर या विधानसभा मतदार संघावर २००४ सालापासून भाजपची सत्ता आहे.
अक्कलकोट विधानसभा मतदार संघात २००४ ला काँग्रेस त्यानंतर २००९ ला भाजप मग २०१४ ला पुन्हा काँग्रेस आणि २०१९ मध्ये भाजप अशी सत्ता आलीये. त्यामुळे, या मतदार संघात कुण्या एका पक्षाचं वर्चस्व आहे असं सांगता येत नाही.
१९६२ पासून ते २०१४ पर्यंत सोलापूर दक्षिण विधानसभेत काँग्रेसचा उमेदवार फक्त एकदा पराभूत झाला होता. २०१४ आणि २०१९ मध्ये मात्र ही जागा काँग्रेसच्या हातून निसटली.
पंढरपूर विधानसभा मतदार संघात भारत भालके हे २००९ साली स्वाभिमानी पक्षाकडून, २०१४ ला काँग्रेसकडून आणि त्यानंतर २०१९ला राष्ट्रवादीतून निवडून आले होते. २०२० साली त्यांचा मृत्यू झाल्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत मात्र भाजपने बाजी मारली.
आता उरतोय तो मतदारसंघ आहे प्रणिती शिंदे यांचा.
तर, प्रणिती शिंदेंचा मतदार संघ आहे तो सोलापूर शहर- मध्यवर्ती हा मतदार संघ. आता हा मतदार संघच मुळात तयार झालाय तो २००९ साली. २००९ पासून या मतदार संघातून प्रणिती शिंदे या विजयी होतायत.
प्रणिती शिंदे या सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या असल्यामुळे या मतदार संघातले आकडे जरा डीटेलमध्ये बघुया.
२००९ साली झालेल्या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी ६८ हजार मतं मिळवत जवळपास ३४ हजार मतांनी विजय मिळवला होता. २०१४ ला तो आकडा ९ हजारांवर आला आणि २०१९ साली तो आकडा १३ हजारांच्या आसपास आहे. २०२४ च्या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांच्या आमदारकीलाही धोका निर्माण होऊ शकतो अशी चर्चाही दबक्या आवाजात सुरू आहे.
ही आकडेवारी बघितल्यावर रोहित पवारांच्या वक्तव्यामागचं कारण सहज लक्षात येऊ शकतं.
हे ही वाच भिडू:
- पैसे नाहीत म्हणून हॉस्पिटलने ढसाळांना उपचार नाकारले तेव्हा सुशीलकुमार शिंदे मदतीला धावले
- पाठीत खंजीर खुपसूनही वसंत दादांनी सुशीलकुमार शिंदेंना अर्थमंत्री बनवलं..
- शरद पवार आणि राजीव गांधी यांच्या भांडणात बिचाऱ्या सुशीलकुमार शिंदेंचा बळी गेला