पाकिस्तानला कोर्टात हरवलं पण दुर्दैवाने कोरोनाची लढाई जिंकू शकले नाहीत..

१० ऑगस्ट १९९९. सकाळचे दहा वाजून ५१ मिनिटे झाली असतील. भारतीय हवाई दलाच्या रडारला  गुजरात आणि सिंधच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषे लगत एक विमान घुटमळताना दिसले. ते फ्रेंच बनावटीचे पाकिस्तानी अटलांटिक ९१ हे विमान होते. या विमानाने दोन वेळा हवाई सीमा रेषेचे उल्लंघन केलं.

भारत पाकिस्तानमधील कारगिल युद्धाला एक महिना देखील उलटला नव्हता. भारतीय आर्मीने पाकला चांगलाच धडा शिकवला होता. काश्मीर मध्ये घुसलेल्या घुसखोरांची पळता भुई थोडी झाली होती. तरीही हे विमान आगाऊपण करून भारतीय हद्दीत  शिरायचा प्रयत्न करत होते.

आंतरराष्ट्रीय नियमांप्रमाणे दोन्ही देशाच्या सीमारेषेपलीकडे १० किलोमीटर पर्यंत हवाई हद्दीचे पालन करणे आवश्यक असते. या भागात लष्करी विमाने भटकू शकत नाहीत. पाकिस्तानी विमान याचे उल्लंघन करत होते.

भारतीय हवाई दलाने हि गोष्ट गंभीरपणे घेतली. स्क्वाड्रन लीडर बुंदेला यांना सोबत २ मिग २१ विमान घेऊन संपूर्ण प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पाठवून देण्यात आले. त्यांनी अटलांटिक विमानाशी संपर्क साधला पण  पाकिस्तानी विमानाने त्यांना सहकार्य केलं नाही. उलट आपली दिशा बदलून भारतीय मिग २१ विमानाच्या दिशेने चालून आले.

स्क्वाड्रन लीडर बुंदेला यांनी त्या विमानाला वॉर्निंग देण्याचा प्रयत्न केला आणि विमान लँड करायला सांगितलं.  पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

अखेर कंट्रोल रूमच्या आदेशानुसार बुंदेला यांनी आपल्या मिग-२१ विमानाने एअर टू एअर मिसाईल पाकिस्तानी विमानाच्या दिशेने डागले. त्याने अचूक वेध घेतला आणि बरोबर ११ वाजून ३७ मिनिटांनी अटलांटिक विमान जमिनीवर कोसळले. कोसळल्यावर हे विमान ५ किलोमीटर भारतीय हद्दीत पडले होते.

त्या पाकिस्तानी विमानातील १६ जण जागीच ठार झाले. यात ५ ऑफिसर्सचा समावेश होता. 

ही घडली आणि पाकिस्तानने जगभरात बोंबाबोंब सुरु केली. भारताने नियम मोडून आमचे विमान पाडल्याचा दावा केला. नेहमी त्यांची पक्षपाती भूमिका घेणाऱ्या अमेरिका चीन या देशांनी पाकिस्तानच्या म्हणण्याला पाठिंबा दिला.

अखेर पाकिस्तान ने आंतरराष्ट्रीय विमानात भारताविरुद्ध खटला दाखल केला. त्यात ६० मिलियन डॉलरची नुकसान भरपाई मागितली. खरे तर विमानाची किंमत ३५ मिलियन डॉलर पेक्षा जास्त नव्हती तरी अमेरिकेची फूस असल्यामुळे आत आत्मविश्वासात पाकिस्तानने दावा केला.

जमिनीवरची लढाई जिंकल्यावर देशासाठी हि कोर्टातली लढाई आत्मसन्मानाची बनली होती. भारतातर्फे हि लढाई लढण्यासाठी उतरले देशाचे सर्वात अनुभवी वकील आणि ऍटर्नी जनरल सोली सोराबजी.

२१ जून १९९९ रोजी आंतरराष्ट्रीय कोर्टात केस उभी राहिली. सोली सोराबजी यांनी अतिशय कौशल्याने खटला हाताळला. १९९१ साली भारत पाकिस्तान सीमा कराराचा त्यांनी दाखला दिला. अनेक वाद प्रतिवाद झाले. भारताने कितीही दबाव आला तरी माघार घेतली नाही.

अखेर १४ विरुद्ध २ ज्युरींनी भारताच्या बाजूने निकाल दिला. स्वाड्रन लीडर बुंदेला आणि भारतीय हवाई दलाची या मानहानीकारक खटल्यातून सहीसलामत सुटका झाली. सोली सोराबजी यांच्या हुशारीचा हा विजय होता. या गाजलेल्या खटल्यामुळे संपूर्ण जगभरात त्यांचं नाव झालं. 

सोली सोराबजी मूळचे मुंबईचे. १९५३ मध्ये मुंबई उच्च न्यायालयातून वकिली क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९७१ मध्ये त्यांची सुप्रीम कोर्टात ज्येष्ठ वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. आणीबाणी नंतर इंदिरा गांधी पडल्या आणि मोरारजी देसाई यांचं जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं.

पहिल्यांदाच सत्तेत आलेल्या बिगर काँग्रेसी सरकारचे सॉलिसिटर जनरल म्हणून सोली सोराबजी यांची निवड करण्यात आली. १९७७ ते १९८० दरम्यान ते या पदावर होते. मनेका गांधी यांच्या पासपोर्टचा सुप्रसिद्ध खटला त्यांनीच लढवला.

१९८९-९० मध्ये दुसऱ्यांदा बिगर काँग्रेसी सरकार आल्यावर ते भारताचे अ‍ॅटर्नी जनरलपदी नियुक्त झाले. यानंतर १९९८ ते २००४ दरम्यान वाजपेयी सरकार वेळी देखील ते भारताचे अ‍ॅटर्नी जनरल होते. १९९७ मध्ये नायजेरियासाठी सोराबजी यांची संयुक्त राष्ट्रसंघाचे विशेष प्रतिनिधी म्हणूनही नियुक्ती करण्यात आली होती.

कायद्याच्या अभ्यासाबरोबर त्यांना जॅझ संगीताची देखील आवड होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन जेव्हा भारत भेटीवर आले होते तेव्हा राष्ट्रपती भवनात सोली सोराबजी यांनी क्लिंटन यांच्याशी जॅझ संगीताबद्दल गप्पा मारल्या होत्या. भारताच्या अ‍ॅटर्नी जनरलला पाश्चात्य संगीताची आवड आहे हे पाहून राष्ट्राध्यक्षांना सुखद धक्का बसला. त्यांनाही जॅझ संगीत आवडत असल्यामुळे दोघे बराच वेळ बोलत  राहिले.  दोघांची हि मैत्री निवृत्ती नंतर देखील तशीच कायम राहिली.

सोली सोराबजी असेच बिनधास्त होते. त्यांनी लढवले खटले, राजकीय घडामोडी बद्दल त्यांची स्पष्ट आणि बेधडक मते यामुळे ते कायम चर्चेत राहिले. त्यांचे विरोधक देखील त्यांचा कायद्यांचे ज्ञान आणि त्यांचा अभ्यास यामुळे दबकून असायचे. सोली सोराबजी यांचे कायदे वर्तुळातील जेष्ठत्व शेवट्पर्यंत अबाधित होतं.

आज सोली सोराबजी यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी कोरोना संसर्ग झाल्यामुळे निधन झाले.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.