या अस्सल गावरान शब्दांचा नेमका अर्थ काय ?

भिडू कार्यकर्त्यानो खेंबडा, कोलदांडा, बोकांडी, धसकट, हुबलाक आणि भाडखाऊ या गावरान शब्दांचे अर्थ तुम्हाला माहित आहेत का?

कार्यकर्त्यानो अर्थ माहित नसतील पण तुम्हाला कोणीतरी आत्तापर्यत म्हणलचं असेल की, कसलं खेंबड आहे रे हे. नाहीतर लहानपणी लईच येड्यावनी केल्यानंतर किंवा शाळेचा अभ्यास पुर्ण नाही केल्या म्हणून मास्तर किंवा घरचे म्हणलेच असतील कोलदांडा घालु का तुला?

नाहीतर बसतोस का आमच्या बोकांडी? असंही कोणीतरी म्हणलंच असेल. किंवा सातारच्या लोकांस्नी भेटले असाल तर ते कधीतरी म्हणले असतील हुबलाक हाईस का रं तू.

पण ह्या वरच्या चार शब्दाचं सोडा वो. पण ह्यो पाचवा शब्द तुम्ही ऐकलाच नाही असं होऊ शकत नाही. कारण मित्र तर रोज ह्या ‘भाडखाऊ’ शब्दांनी पार खोलून मारतेत. देवांच्या नावाचा जप कमी होत असेल मात्र हा शब्दाचा जप तुमच्या आयुष्यात कमी नसेल होत.

मात्र या पाचही शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? हे आपण पाहू.

खेंबडा

‘खेंबडा’ या शब्दाचा अर्थ वेडावाकडा, कुरूप, किंवा सौष्ठवपुर्ण शरीर नसलेला असा होतो. तसंच ज्याचे दात वेडेवाकडे आहेत. डोळे मोेठं मोठे आणि बाहेर आलेले आहेत. ज्यांंच्या शरीराला आकर्षक असं रूप नाही त्यांच्यासाठी हा शब्द वापरला जातो.

संस्कृतातील ‘खेड’ या शब्दापासून हा शब्द तयार झालेला आहे. तसंच फारशीतल्या ‘खमीदा’ या शब्दाचा अर्थ वेडावाकडा असा होता. त्याचाही संदर्भ या नावासाठी दिला जातो.

मात्र, सरळ अशा या शब्दाला आता वेगळा अर्थ प्राप्त झाला आहे. खेंबडा नसलेल्या लोकांनाही शिवी म्हणून हा शब्द सध्या वापरला जातोय.

उदा.

कसलं खेंबडं हाय रं हे.

या अर्थानं.

कोलदांडा

कोलदांडा या शब्दाचा अर्थ आहे आडकाठी किंवा प्रतिबंध. मुळात जे नाठाळ जनावरं असतील त्यांच्या गळ्यात आणि पायात अडकवयाचा लाडकी दांडका म्हणजेच कोलदांडा होय. एखादी गाय दुध काढून देत नसेल तीला कोलदांडा घातला जातो.

तंसच जनावरं रस्तानं चालतांना येड्यावानी करत असतील तर तीच्या गळ्यात दांडकं घातलं जातं त्यामुळे त्याच्या चालण्यात अडथळा येतो. खेड्यात याला लोढणंही म्हणतात.

मात्र मुळात हा शब्द शाळेत जास्त प्रचलित होता. शाळेत जर वात्रंट मुलं असतील तर मास्तर जुन्या काळी त्यांना कोलदांडा घालायचा. पोराला खाली बसवून दोन्ही पायाच्या मधून हात काढून ते बांधले जायचे. त्यानंतर कोपरे आणि गुडघ्यातून काठी घातली जायची त्यालाच कोलदांडा म्हणलं जायचं. जेलमध्यल्या भुरट्या चोरांनाही या कोलदांड्याचा आस्वाद दिला जायचा. असा या प्रचलित कोलदांडा शब्दाचा अर्थ आहे.

उदा.

लई माजलास व्हंय तुला कोलदांडा घालूनच सरळ करतो.

या अर्थानं.

बोकांडी

बोकांडी या शब्द साधा सरळ वाटत असला तरीही त्याच्यामध्ये सुक्ष्म अशा अर्थछटा आहेत. मान, पाठ, उर आणि पार्श्वभाग या शब्दांचा अर्थ म्हणजे बोकांडी. ‘वृकौ’ या शब्दापासून प्राकृतात ‘वक्कम’ रूप तयार झाले व त्याचे ‘बक्कम’ अन् त्याला ई प्रत्यय लावून ‘बोकाई’ झाले. त्यानंतर रोजच्या वापरांमुळे बोकांडी असं झालं, असं द.ता भोसले यांनी ‘ग्रामीण बोलीचा शब्दकोश’ या पुस्तकात सांगितलेलं आहे.

तंसच एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणं, एखाद्यास जखडून ठेवणं या अर्थानंही बोकांडी शब्द वापरला जातो.

रोजच्या वापरात आपण या शब्दाचा वापर करतोच की,

पैसे देत नाही व्हंय मपले, बोकाडी बसूनच घेतो त्याच्याकडून

या अर्थानं.

धसकट

‘धसकट’ हा शब्द ‘धस’ या प्राकृत नावापासून तयार झालेला आहे. धस म्हणजे टोक, खुंटी, पुढे आलेला अणकुचीदार पदार्थ. 

मात्र हा शब्द ग्रामीण भागातच जास्त वापरला जातो. ज्वारीचे जमिनीच्यावर उरलेले ताट,खुंट, या अर्थानं हा शब्द वापरण्यात येतो. जमीनीपासून वरती पाच- सहा इंच ज्वारीचा ताटाचा जो वाळलेला भाग असतो त्यालाच ‘धसकट’ असं म्हणतात.

उदा.

वावरातल्या धसकटाला अडकून पडलो राव

या अर्थानं.

हुबलाक

‘हुबलाक’ या शब्दाचा अर्थ अडाणी, रानपट, वेडपट किंवा हुकलेला असा होता. कानडीमध्ये ‘हुंब’ असा शब्द आहे. या शब्दापासुन ‘हुंबलाक’, ‘हुबलाक’ असं बोली रूप तयार झालेलं असावं असं मानलं जातंय. कारण कानडीमध्ये ‘हुंब’ या शब्दाचा अर्थ अडाणी, वेडा असा होता. 

सध्या झी-मराठीवर सुरू असलेल्या लागीर झालं जी मालिकात हा शब्द जास्त प्रमाणात वापरलेला आहे.

राहुल्या तु हुबलाक हाईस का रं.

या अर्थानं.

भाडखाऊ

‘भाडखाऊ’ हा शब्द ग्रामिण भागापासून ते शहरातल्या प्रत्येक माणसाच्या परिचयाचा आहे. त्याहीपेक्षा रोजच्या वापरातला म्हणलं तरी वावगं ठरणार नाही.

‘भाड’ या शब्दाचा अर्थ वेश्येचा दर असा आहे. संस्कृतमधील ‘भाटम’ किंवा ‘भाटी’ या शब्दापासून ‘भाड’ हा शब्द तयार झालेला आहे. कारण ‘भाटी’ या शब्दाचा अर्थ व्यभिचाराचा पैसा असाच होतो. हे द. ता भोसले यांनी ‘ग्रामीण बोलीचा शब्दकोश’ यामध्ये लिहिलेलं आहे.

‘भाडखाऊ’ या शब्दाचा अर्थ घरच्या स्रियांना उपभोगार्थ देऊन पैसे मिळविणारा माणूस. किंवा आजच्या भाषेत कुटंणखाना चालवून त्यावर जगणारा माणूस असा आहे.

उदा.

भाडखाऊ हायं रं त्यो.

या अर्थानं. त्यामुळे कार्यकर्त्यांनो रोजच्या बोलण्यात सर्रासपणे वापरल्या जाणाऱ्या ग्रामीण बोलीभाषेचा अर्थ समजून घ्या. नाहीतर,

कुणाला तरी भाडखाऊ म्हणतान अन् त्यो तुमच्या बोकांडी बसून कोलदांडा घालून तुम्हाला खेंबडा करीन. 

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.